`SOM`Yog (6) for the whole health
`SOM`Yog (6) for the whole health

संपूर्ण आरोग्यासाठी ‘सोम’योग (६) 

 मन व आत्मा प्रसन्न असणे आवश्‍यक आहे. प्रसन्न असणे म्हणजे नेहमी आनंदात असणे, नेहमी अनुकूल असणे आवश्‍यक आहे. जोपर्यंत मनुष्य अत्यंत निरागस होऊन सतत चेहऱ्यावर हास्य ठेवून परमेश्वराचे आभार मानत नाही किंवा निसर्गाशी एकरूपता साधत जीवन जगत नाही, तोपर्यंत आरोग्य पूर्ण होत नाही. त्यासाठी ‘सोम’ ध्यान आवश्यक आहे. ‘सोम’च्या अभ्यासाने शरीर, शरीराचा अग्नी, शरीराची शुद्धी, शरीराचे संरक्षण, जीवन जगण्यासाठी वा इह-परलोक जाणण्यासाठी लागणारे ध्यान, सरतेशेवटी आत्मज्ञान-आत्मशांती या सगळ्या गोष्टी मिळवण्याची शक्‍यता असते. 
 

सोमयोगाची सर्व तयारी आपण पाहिली. त्यात ॐकार गुंजन, दीपध्यान, ज्योतिध्यान, योग, रिलॅक्‍सेशन (मेंदूला मानसिक ताणातून मुक्‍ती देणे), शांत झोप हे सर्व आपण पाहिले. यांचा उपयोग होईलच. आरोग्य, ऐश्वर्य, मनासारख्या घटना घडत जाणे, ज्ञान मिळणे, यासाठीसुद्धा याचा फायदा होऊ शकतो. परंतु एक मुख्य लक्ष्य, जे सर्वसाधारणपणे दुर्लक्षिले जाते, ज्याला आत्मशांती, आत्मसंवाद किंवा निसर्गाची इच्छा जाणून घेऊन त्यानुसार काम करण्याची प्रेरणा होणे हेसुद्धा ‘सोम’ साधनेद्वारा प्राप्त होऊ शकते. 

सर्वसामान्य माणसे स्वतःच्या शरीरापुरते किंवा स्वतःच्या स्वार्थापुरते पाहताना दिसतात. म्हणजे जेवणखाण, ऐहिक उपभोग, इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करणे यालाच जीवन समजून त्यातच गुंतून राहिलेले दिसतात. जीव जेथे खऱ्या अर्थाने जोडलेला आहे, त्या आत्मभावाकडे लक्ष दिले जात नाही किंवा तेथपर्यंत जाण्यासाठी काही केलेही जात नाही. तेथे जाण्यासाठी केलेल्या गोष्टींना आध्यात्मिक वगैरे काही नाव दिले जाते. आणि त्यामुळे अध्यात्म हे जीवनाच्या शेवटी, जेव्हा सर्व इंद्रिये थकली आहेत, आता काही करण्यासारखे उरले नाही, अशा वेळी करायचे असते असा समज दृढ झालेला दिसतो. परंतु आत्मशांती, आत्मसंवाद हे तर जीवनाचे व संपूर्ण आरोग्याचे मुख्य लक्ष्य आहे. 

निसर्गामध्ये सर्वत्र परमेश्वर व्याप्त आहे. या परमेश्वराच्या स्वभावाशी मिळण्याचा योग साधता येणे हेच जीवनातील मुख्य कर्तव्य आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लहानपणापासूनच यासाठी आपल्याला आचरण कसे असावे हे ठरवावे लागेल. लहानपणी बालकाला चाला-बोलायला शिकवले जाते, नंतर ते बालक शाळेत जायला लागल्यावर कसे बसावे, कसे उठावे, चारचौघांमध्ये कसे वागावे, काय खावे, काय खाऊ नये वगैरे गोष्टी त्याला सांगितल्या जातात. असे करत करत मनुष्य व्यवहाराच्या गोष्टीत पारंगत होतो. परंतु, या डोळ्यांनी दिसणाऱ्या बाह्यजगाच्या पलीकडेही विश्वाचा पसारा आहे हे त्याला समजून घ्यावे लागते. नवल म्हणजे हा विश्वाचा पसारा डोळे मिटून दिसू शकतो, कारण तो स्वतःच्या आत पाहावा लागतो. 

आत्मा म्हणजे काय? शक्‍तीचा स्रोत व संकल्पना यांच्या मिश्रणातून जो तयार झालेला असतो, मोठ्याहूनही मोठा व अणूहून लहान जो आहे असा जो तो आत्मा, त्यालाच परमेश्वर असेही म्हणता येते. तो कुठे एका ठिकाणी आहे असे नाही, तर तो चराचरांत व्यापलेला आहे. म्हणून मनुष्यमात्रामध्ये, नदीनाल्यामध्ये, गवताच्या पात्यात, प्राण्यामध्ये, फुलामध्ये, पक्ष्यामध्ये परमेश्वर पाहता येणे आवश्‍यक आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्‍तीमध्ये परमेश्वर पाहणे, या व्यक्‍तींची सेवा करून परमेश्वराला आपलेसे करणे, या मार्गाने आपले आत्मशांती मिळविण्याचे काम साधणे आवश्‍यक असते. आयुर्वेदाने आरोग्याची व्याख्या करताना म्हटले आहे की, 
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः। 
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।

म्हणजे मन व आत्मा प्रसन्न असणे आवश्‍यक आहे. प्रसन्न असणे म्हणजे नेहमी आनंदात असणे, नेहमी अनुकूल असणे आवश्‍यक आहे. जोपर्यंत मनुष्य अत्यंत निरागस होऊन सतत चेहऱ्यावर हास्य ठेवून परमेश्वराचे आभार मानत नाही किंवा निसर्गाशी एकरूपता साधत जीवन जगत नाही, तोपर्यंत आरोग्य पूर्ण होत नाही. म्हणून आरोग्याला वाहिलेल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’ या साप्ताहिक पुरवणीत सोम ध्यानाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

‘सोम’ ध्यान एवढ्यासाठी की सोमच्या अभ्यासाने शरीर, शरीराचा अग्नी, शरीराची शुद्धी, शरीराचे संरक्षण, जीवन जगण्यासाठी वा इह-परलोक जाणण्यासाठी लागणारे ध्यान, सरतेशेवटी आत्मज्ञान-आत्मशांती या सगळ्या गोष्टी मिळवण्याची शक्‍यता असते. 
एखाद्याच्या वाढदिवसाला किती मित्र जमले आहेत यावरून त्याला किती मित्र आहेत हे समजू शकत नाही. तर त्याने किती लोकांशी मैत्री जोडलेली आहे, किती मित्रांना भेटले नाही तर तो हळहळतो, किती मित्रांना भेटले नाही तर तो बेचैन होतो यावरून त्याच्या खऱ्या मित्रांशी संख्या ठरते, यावरून त्याच्यात किती मैत्रीभाव आहे हे समजून येते. 

सतत चिडचिड करणे, हे मिळाले नाही, ते मिळाले नाही अशी वसवस करणे योग्य नसते, योग्य वेळी, योग्य वयात योग्य ते घडत जाते. हव्या असणाऱ्या गोष्टी मिळोत वा न मिळोत, आपण आनंदात राहावे. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा अनुभव यावा यासाठी मार्गदर्शन मिळणे आवश्‍यक असते. 

सेवा करणे, जेथे दुःख असेल तेथे दुःखाचा वाटेकरी होता येणे हे व्हायला हवे. याचा अर्थ स्वतः दुःख करून घेणे असे नव्हे, तर दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे दुःखाचा वाटेकरी होणे. मुळातच दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होणे खूप महत्त्वाचे असते, पण हे खूप अवघडही असते. प्रत्येक जण स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचा प्रयत्न करत असतो. आपल्या नात्यागोत्यात नसलेल्या, आपल्या मित्रमंडळींत नसलेल्या व्यक्‍तीला -प्राण्यालाही मदत करण्यासाठी हृदयात प्रेम उत्पन्न व्हायला हवे, म्हणजेच करुणा उत्पन्न व्हायला हवी. प्रेमातून झालेली कृती म्हणजे करुणा. दुसऱ्याच्या दुःखाने मन व्याकूळ होणे आवश्‍यक असते व मन व्याकूळ झाल्यावर त्यातून योग्य ती कृती होणेही आवश्‍यक असते. 

सर्व गोष्टी मला मिळाव्यात, सर्व गोष्टी माझ्यासाठीच आहेत, मी मोठा, सगळ्या ठिकाणी माझा हक्क आहे असे न म्हणता वस्तूंची, निदान आपल्याला न झेपणाऱ्या गोष्टींची उपेक्षा करण्याचा भाव, त्यांच्याविषयी इच्छा-वासना न बाळगण्याचा भाव तयार व्हायला हवा. या भावात जगत असताना नंतर सकारात्मक भाव असला पाहिजे. असा सकारात्मक भाव कायमसाठी असणे आवश्‍यक आहे. ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे वर्षातून एकदा म्हणून गोड बोलण्याचे आश्वासन सोडून चालत नाही, तर दुसऱ्यांबद्दल कायम चांगला विचार मनात यायला पाहिजे. चांगला विचार मनात आला की आचारही चांगला व्हायला पाहिजे. 

लग्नकार्यात किंवा समारंभात छायाचित्र घेतले जात असताना काही व्यक्‍ती ते प्रत्येक छायाचित्रात कसे अंतर्भूत होतील याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीराचे अस्तित्व दाखवण्यासाठी पुढे पुढे करणे बरोबर नाही. शरीर म्हणजे मनुष्य नव्हे. या शरीराकडून इतरांसाठी कोणती चांगली कृती घडली आहे ते पाहणे अधिक महत्त्वाचे असते. मी कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही त्यामुळे मी चांगला असा भाव उत्पन्न होऊ न देता निसर्गनियमाने जगायला शिकणे महत्त्वाचे असते. 

कुठल्याही गोष्टीशी इतके तादात्म्य होणे की, ती गोष्ट हरवल्यास दोन-दोन दिवस न जेवणे, आपल्या घरातील कुत्रे-मांजर (त्याचे आयुष्य पूर्ण करून) मेले तर ओक्‍साबोक्‍शी रडून स्वतःला अपाय करून घेणे अशा तऱ्हेचे वस्तूंना-गोष्टींना धरून ठेवण्याचे भाव नसावेत. प्रत्येक व्यक्‍तीला व्यक्‍तिस्वातंत्र्य असते हे समजून घेऊन कुणाच्याही व्यक्‍तिस्वातंत्र्यावर गदा आणता उपयोगाचे नाही. 

प्रत्येकाचे अंतरंग ओळखणे, केवळ माणसांना समजते असे नव्हे, तर झाडांना, प्राण्यांना, खुर्ची वगैरे गोष्टींनाही समजते हे लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी-वस्तू चांगल्या अवस्थेत ठेवणे आवश्‍यक असते. उदा. आपल्या मनात येईल त्याप्रमाणे झाडांना न कापता त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाढू देणे आवश्‍यक आहे. झाडांची वाढ नीट व्हावी, यादृष्टीने त्यांची छाटणी करणे वेगळे आणि जंगलेच्या जंगले नष्ट करणे, घरातील कचरा बाहेर रस्यावर फेकणे, आपल्या घरातच अस्वच्छता असणे वगैरे गोष्टी टाळायला हव्यात. घर अस्वच्छ ठेवल्यास घराला काय वाटत असेल, वास्तू कशी दुःखी होत असेल याचा विचार करणे आवश्‍यक आहे. घर, खुर्ची वगैरे जड वस्तूंनाही समजते हेच मुळी आपल्याला उमजत नाही. या सर्व गोष्टींबाबत योग्य तसे आचरण ठेवल्यावर रोज एका ध्यानाच्या अवस्थेत राहून शांतीचा अनुभव घेता येणे शक्‍य होईल. ध्यानावस्थेत असताना आत्मसंवाद साधून जीवनाची इतिकर्तव्यता साधता येईल. हे सर्व साधले की ‘पूर्ण आरोग्य’ मिळाले असे म्हणता येईल. 

‘सोम’योगाची अंगे जमतील त्या पद्धतीने केली, त्यासाठी रोजचा एक तास दिला, तर व्यक्‍तीच्या अवस्थेनुसार, काही कालावधीनंतर जीवन सार्थक नक्कीच होऊ शकते. हे सर्व करत असताना दिलेला एक तासाचा वेळ शांत, गाढ व आत्मसंवाद साधून; पण सामान्य झोपेचा एक तास वेळ कमी करून परत मिळविता येईल. हाच खरा ‘संपूर्ण आरोग्या’चा अनुभव. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com