संपूर्ण आरोग्यासाठी ‘सोम’योग 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 24 January 2020

एकाच वेळी शरीर, मन आणि भावना वगैरे अनेक स्तरांवर काम करण्यासाठी ‘योग’ हा एक सर्वोत्तम उपाय असतो. सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा ‘सोम’ उपासनेत समावेश केलेला आहे. पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का न लावता आणि मनावर सकारात्मक परिणाम व्हावा अशा दृष्टीने या योगक्रिया केल्या आहेत. 

 

एकाच वेळी शरीर, मन आणि भावना वगैरे अनेक स्तरांवर काम करण्यासाठी ‘योग’ हा एक सर्वोत्तम उपाय असतो. सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा ‘सोम’ उपासनेत समावेश केलेला आहे. पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का न लावता आणि मनावर सकारात्मक परिणाम व्हावा अशा दृष्टीने या योगक्रिया केल्या आहेत. 

 

एकाच वेळी शरीर, मन आणि भावना वगैरे अनेक स्तरांवर काम करण्यासाठी ‘योग’ हा एक सर्वोत्तम उपाय असतो. ‘सोम’ उपासनेमध्ये कमीत कमी वेळात अधिकाधिक फायदा होईल, करायला सोप्या असल्याने सर्वांना सहजतेने करता येतील, मनाची सकारात्मकता वाढायला मदत मिळेल अशा दृष्टीने काही निवडक योगक्रियांचा समावेश केलेला आहे. मागच्या वेळी आपण यातील काही योगक्रिया पाहिल्या. आज यापुढच्या काही क्रिया पाहूया. 

सूर्यनमस्कार (विश्वप्रार्थना) 
सूर्यनमस्काराला विश्वप्रार्थना म्हणण्याचे कारण असे, की ही एक सर्वांगसंपूर्ण आणि समग्र अशी योगक्रिया आहे. यामध्ये अशा सर्व प्रभावी व सामर्थ्यशाली आसनांचा अंतर्भाव आहे, की सूर्यनमस्कार करणे म्हणजे एखादा संपूर्ण ‘वर्क-आउट’ करण्यासारखे असते. तेव्हा वेळ कमी असला तर इतर कोणताही व्यायाम न करता केवळ सूर्यनमस्कार केले तरी चालतात. प्रकाश व ज्ञानाच्या स्रोताचे आपल्याला कायम स्मरण राहावे, त्यापुढे आपण कायम नतमस्तक राहावे, त्याप्रती मनात कायम आदरभाव राहावा, हा सूर्यनमस्काराचा उद्देश असतो. 

सूर्यातून अनेक महत्त्वाची किरणे उत्सर्जित होत असतात, जी स्वीकारली गेली की आरोग्य देणारी असतात. ही क्रिया शरीर, मन व आत्मा या सर्व स्तरांना संतुलित अवस्थेत आणते आणि संपूर्ण चेतासंस्थेसाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. यामुळे शरीराची लवचिकता वाढते, शरीरधातू बनतात, पचन सुधारते आणि सकारात्मकतेला चालना मिळते. यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते, हृदयाची शक्‍ती वाढते, रोगप्रतिकारशक्‍तीसुद्धा सुधारते. नियमित सूर्यनमस्कार करण्याने आयुष्य वाढते असेही म्हटले जाते. 

सुरुवातीला ही क्रिया तीन-चार वेळा करावी व करताना प्रत्येक स्थिती, प्रत्येक आसन पूर्णत्वाने होण्याकडे लक्ष केंद्रित करावे. क्रमाक्रमाने ही संख्या वाढवत बारापर्यंत न्यावी. शक्‍य असेल, तेवढी शक्‍ती असेल, तर चोवीस सूर्यनमस्कार केले तरी चालतील. सरावाने श्वासाची लय व सूर्यनमस्काराच्या स्थिती या दोन्हींत समन्वय व सुसूत्रता तयार होते. सूर्यनमस्कार करताना थकवा आला किंवा कपाळावर घाम आला तर थांबावे. 
सूर्यनमस्कार हा केवळ एक व्यायाम नाही, तर प्रकाशाचे ध्यान-स्वरूप असा आहे. हे संपूर्ण विश्व सूर्याभोवती कसे फिरते हे समजण्यास तो मदत करतो. आपण जर निसर्गचक्राची तत्त्वे अनुसरली, तर निसर्गही आपले सर्व बाजूंनी संरक्षण करेल ही शिकवण देतो. ‘स्व’शी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत या विश्वप्रार्थनेचे मोठे योगदान असते. 

क्रिया करण्याची पद्धत 
1. सरळ उभे राहावे. पावले जवळजवळ एकमेकांना जोडलेली असावीत. नजर सरळ दिशेत स्थिर असावी. 
2. हात ‘नमस्ते’च्या स्थितीत जोडून कोपरातून वाकवून छातीसमोर आणावेत व दोन्ही तळवे एकमेकांवर असे दाबावेत, की त्यात हलके कंपन जाणवेल. मनातल्या मनात सूर्यशक्‍तीला अभिवादन करावे. 
3. आता पायापासून सुरुवात करून संपूर्ण शरीरात ताठरता प्रतीत होऊ द्यावी. यासाठी प्रथम पायाच्या बोटांनी व नंतर टाचांनी जमिनीवर दाब द्यावा, नंतर क्रमाक्रमाने पोटऱ्या, मांड्या, नितंब आणि पोटाच्या ठिकाणी ताठरता येऊ द्यावी. पोट आत आणि वर खेचावे आणि छाती तसेच मान ताठ करावी. 
4. सावकाश श्वास घेण्यास सुरुवात करावी, उगवता सूर्य किंवा शक्‍तीचे इतर कोणतेही प्रतीक डोळ्यांसमोर आणावे. शक्‍तीच्या या स्रोताप्रती कृतज्ञ भाव आणून चेहऱ्यावर हलकेसे स्मित येऊ द्यावे. 
5. दोन्ही हात सरळ दिशेने वर न्यावेत, हलकेसे मागच्या बाजूला झुकावे आणि वर बघावे. ही क्रिया करताना श्वास आत घ्यावा. 
6. श्वास सावकाश सोडत, कंबरेतून पुढे वाकावे, मात्र या वेळी हात आणि पाठीचा कणा ताठ असू द्यावा. तळहात जमिनीवर अशा प्रकारे टेकवावेत, की ते पायाच्या दोन्ही बाजूला आणि पायाच्या बोटांच्या रेषेच्या थोडे पुढे राहतील. 
7. पाय शक्‍य तितके सरळ ठेवून कपाळ गुडघ्यांपर्यंत आणावे. 
8. आता उजवा पाय मागे न्यावा, डावा पाय गुडघ्यात वाकवावा. या अवस्थेत डावा नितंब डाव्या टाचेकडे येणे अपेक्षित असते. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकू येऊ नये. आता छाती व डोके वर घ्यावे, जेणेकरून पाठीचा कणा मागच्या बाजूने थोडासा वक्राकार होईल. 
9. नजर सरळ ठेवून श्वास आत घ्यावा व शरीराचा भार डाव्या पायावर घ्यावा. 
10. आता डावा पायसुद्धा मागे घ्यावा व दोन्ही पावले एकमेकांना जुळवावीत. पाठीचा कणा आणि पाय सरळ असावेत. दोन्ही नितंब वर उचलावेत. यामुळे शरीर उलट्या V च्या आकारात येते. या अवस्थेत दोन्ही टाचा शक्‍य तितक्‍या जमिनीजवळ यायला हव्यात. 
11. श्वास धरून ठेवून दोन्ही हातांच्या मधून डोके आत घ्यावे. 
12. श्वास हळूहळू सोडत शरीराचा भार दोन्ही हात व पायांच्या बोटांवर तोलत शरीर जमिनीकडे खाली आणावे. जमिनीला प्रथम कपाळ, मग नाक, मग छाती व नाभीचा क्रमाक्रमाने हलकासा स्पर्श करत डोके वर न्यावे. (ही क्रिया जणू एखाद्या लाटेच्या हालचालीप्रमाणे किंवा पाण्यात सूर मारल्याप्रमाणे व्हायला हवी.) 
13. हात सरळ असावे, पाठीचा कणा मागच्या बाजूला शक्‍य तितका वक्राकार करून मग आकाशाकडे बघावे आणि श्वास आत घ्यावा. या स्थितीत फक्‍त हाताचे तळवे आणि पायाची बोटे यांचा जमिनीला स्पर्श झालेला असावा. 
14. नितंब पुन्हा उचलावेत आणि पुन्हा एकदा उलट्या V च्या आकारात जावे. श्वास धरून ठेवावा. 
15. उजवा पाय गुडघ्यात वाकवून पुढे घ्यावा, उजव्या हाताच्या आतल्या बाजूला आणि मनगटाच्या रेषेत पायाच्या बोटांची टोके येतील अशा पद्धतीने ठेवावा. श्वास सोडावा. या स्थितीत पाठीचा कणा सरळ असावा व नजर समोर स्थिर असावी. 
16. डावा पाय पुढे आणावा, दोन्ही पाय शक्‍य तितके सरळ ठेवून कपाळ गुडघ्यांना टेकविण्याचा प्रयत्न करावा. 
17. श्वास आत घेत उभे राहावे, हात ‘नमस्ते’च्या स्थितीत छातीसमोर ठेवून पूर्वस्थितीत यावे. 
18. हीच क्रिया पुन्हा करावी. 
सूचना 
- सुरुवातीला एकदा जमिनीवर तळवे टेकले, की ते नमस्कार पूर्ण होईपर्यंत तेथेच असावेत. 
- आठव्या क्रियेमध्ये पाय मागे घेताना नंतर सूर मारण्यासाठी हात व पाय यांत पुरेसे अंतर राहील याचे भान ठेवावे लागते, कारण हे अंतर पुन्हा बदलता येत नाही. 
- सूर मारण्याच्या क्रियेमध्ये जर हातांना वजन पेलवत नसेल, तर गुडघे जमिनीवर टेकवता येतील. तेराव्या क्रमांकाच्या क्रियेत गुडघे पुन्हा सरळ करावेत. 

शाबास 
शाबास ही एक अशी विशेष योगक्रिया आहे, ज्यामुळे संपूर्ण शरीर यंत्रणेत चैतन्य येते. क्रियेत समजावल्याप्रमाणे जेव्हा हात शरीराच्या समोर गोलाकार फिरतात, तेव्हा त्याचे कार्य एखाद्या मोटारप्रमाणे होते आणि शक्‍ती पायापासून वरच्या बाजूला प्रेरित होते. यामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली, की पायांवरची सूज कमी होण्यास, तसेच हृदयापर्यंत रक्‍त सहजतेने पोचण्यासही मदत मिळते. आपण शाबासकी देताना पाठीवर ज्या ठिकाणी थाप देतो, त्या स्नायूला मैत्रीचा स्नायू असेही म्हटले जाते. या स्नायूवर थाप मारल्याने रक्‍ताभिसरणाला आणखी उत्तेजना मिळते. आपणा सर्वांना स्वतःच्या आप्तांकडून, स्वकीयांकडून, जगाकडून व विद्वानांकडून प्रशंसेची आशा असते. आपली आपण शाबासकीची थाप देण्याने ही आशा पूर्ण होऊ शकते. या क्रियेमुळे शरीरातील चुंबकीयत्व कार्यान्वित होते आणि श्वास सखोल घेण्याची क्षमता वाढते. या क्रियेमुळे स्नायूंमधील तणाव कमी होतो, शाबासकी मिळण्याची आशा पूर्ण होते आणि आत्मविश्वास वाढतो. 
क्रिया करण्याची पद्धत (दोन्ही बाजूंनी चार-चार वेळा) 
1. दोन्ही पाय जवळ घेऊन ताठ उभे राहावे. दोन्ही हात शरीरालगत सरळ असावेत, मुठी वळलेल्या असाव्यात आणि अंगठ्यांचे अग्र जमिनीच्या दिशेला असावेत. 
2. श्वास आत घेत उजवा हात खांद्याच्या रेषेत वर उचलावा, पुन्हा खाली आणून घड्याळाच्या दिशेने तीन ते पाच वेळा पूर्ण गोलाकार असा फिरवावा, जेणेकरून दंडाचा नाकाला पुसटसा स्पर्श होईल. हात कोपरातून सरळ असू द्यावा. 
3. शेवटचे वर्तुळ पूर्ण झाले की मूठ उघडावी, हाताचे कोपर खांद्याच्या थोडे वर नेऊन उजवा तळहात डाव्या खांद्यावर शाबासकी दिल्याप्रमाणे थोपटावा आणि श्वास सोडावा. थाप देताना स्वतःला आतल्या आत ‘शाबास’ म्हणावे. 
4. हात पुन्हा खाली आणावा. 
5. उजव्या हाताने ही क्रिया तीन-चार वेळा केली, की डाव्या हाताने हीच क्रिया करावी. यासाठी डावा हात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने गोलाकार फिरवून उजव्या खांद्यावर थाप द्यावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: `SOM`YOG for the complete health article written by Dr Shree Balaji Tambe