शुक्राणुदोष

डॉ. अमित करकरे
Sunday, 22 July 2018

बदलत्या जीवनशैलीचा मोठा विपरित परिणाम म्हणा, पण अलीकडे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे ही समस्या वाढलेली दिसते. याची कारणे समजून घेण्याची व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

बदलत्या जीवनशैलीचा मोठा विपरित परिणाम म्हणा, पण अलीकडे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे ही समस्या वाढलेली दिसते. याची कारणे समजून घेण्याची व त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

मूल होणे हा विषय आपल्या समाजात अजूनही संवेदनशील आहे. लग्नानंतर दोन-तीन वर्षात मूल झाले नाही की, स्त्रीकडे चौकस नजरा वळू लागतात. मूल न होण्यामागे ती स्त्रीच कारणीभूत आहे, असाच समज असतो. प्रयत्न करुनही मूल होत नसले की आपल्याकडे आधी तपासणी आणि उपचार होतात ते स्त्रीवर. तिच्या बाबतीत सर्व गोष्टी (गर्भाशयापासून ते हॉर्मोन्सचे प्रमाणापर्यंत) यथायोग्य असल्या की वीर्यतपासणीसाठी नवरा तयार होतो आणि बरेचदा त्या तपासणीत वीर्यामधे शुक्राणुंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणुंचे प्रमाण कमी असणे याप्रकारचे दोष आढळतात. अर्थातच, नाइलाजाने त्या ‘पुरूषा’वर उपचार घेण्याची वेळ येते. 

मूळ विषयाची चर्चा करण्याआधी वीर्य व शुक्राणू यांच्यातील फरक समजून घ्यायला हवा; कारण अनेकदा या दोन्ही संज्ञा रुग्णांकडून एकमेकांना पूरक म्हणूनच वापरल्या जात असतात. वीर्य हा एक पांढऱ्या रंगाचा द्रवपदार्थ असतो, जो आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. वीर्य हा शुक्राणू वाहून नेणारा, शुक्राणूंना शरीराबाहेर सक्रिय ठेवणारा, त्यांची 

निगा राखणारा स्त्राव आहे. शुक्राणू म्हणजे फक्त मायक्रोस्कोपखाली दिसू शकणाऱ्या अतीसूक्ष्म प्रजोत्पादक पेशी आहेत. वीर्याचा रंग, घट्टपणा किंवा प्रमाण यांवरुन शुक्राणूंच्या आरोग्याबाबत आडाखे बांधता येत नाहीत. वीर्याचे प्रमाण जरी पुरेसे असले तरी त्यात शुक्राणू असतीलच असे नाही.
निरोगी व्यक्तीच्या एक मिली वीर्यामधे साधारण दीड ते वीस कोटी शुक्राणू असतात. यातील सर्वच पूर्ण वाढ झालेले असतीलच असे नाही. त्याहून कमी शुक्राणू असतील तर तो दोष मानला जातो. अर्थात, प्रजननासाठी केवळ एक निरोगी शुक्राणूही पुरेसा असतो, त्यामुळे शुक्राणूंच्या संख्येपेक्षा त्यांची पुरेशी झालेली वाढ आणि गर्भाशयाच्या आतवर पोहोचण्याची शक्ती यांवर गर्भधारणा अवलंबून असते. म्हणजेच प्रजोत्पादनासाठी सक्षम शुक्राणुंची गरज असते.

वैद्यकीय कारणे
शुक्राणू कमी अथवा पुरेसे निरोगी नसतील तरी त्याची शारीरिक लक्षणे काहीच दिसत नाहीत. योग्य प्रयत्न करुनही मूल न होऊ शकणे हेच एकमेव लक्षण दिसते. शुक्राणूंची संख्या आणि त्यांचे आरोग्य अनेक कारणांमुळे बिघडू शकते. यामागची वैद्यकीय कारणे समजून घेऊ.
व्हेरिकोसील - अंडाशयाभोवतालच्या नीलांमधील दोष
जंतूसंसर्ग - गालगुंड, एडस्‌, गुप्तरोग
संप्रेरकांतील असमतोल
शुक्राणू-मार्गातील दोष
सीलीॲक डीसीज
मधुमेह
जनुकीय आजार
काही औषधांचा दुष्परीणाम
वातावरण व जीवनशैली यांचाही खूप मोठा परिणाम शुक्राणुंच्या संख्येवर व क्षमतेवर होतो. 
दारू व तंबाखू / सिगारेटचे व्यसन
इतर नशा
स्थूलता
रासायनिक खते किंवा रंगांचे साहित्य, शिसे, बेन्झीन अशा रसायनांशी सततचा संपर्क 
एक्‍स-रे अथवा रेडीएशन
सतत उष्णता असलेल्या जागी काम करणे (उदा. भट्टी) किंवा घट्ट अंतर्वस्त्र घालणे, सतत मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने त्याच्या उष्णतेमुळे सुद्धा शुक्राणूंत दोष दिसून आले आहेत.

याशिवायही अनेक केसेस अशाही आढळतात जेथे वरवर पाहता कोणतेच कारण सापडत नाही, पण तरीही प्रकृतीदोषामुळे शुक्राणूंची संख्या अथवा आरोग्य कमी असते. होमिओपॅथीचा उपयोग अशा रुग्णांत सर्वात जास्त होऊ शकतो. शुक्राणूदोषावर उपयोगी ठरू शकतील अशी होमिओपॅथी मधे साधारण पस्तीसहून अधीक औषधे आहेत. कॅलेडीयम, कॅन्थॅरीस, कोनायम, डामिआना, फेरमब्रोम, न्यूफर, फॉस्फरिक ॲसीड, सेलेनीयम व झींकम ही त्यातीलच काही. बाराक्षारांपैकी कल्केरिया फॉस, सिलीका व नॅट्रमफॉस यांचा वापर प्रामुख्याने होतो.

प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांप्रमाणे व प्रकृतीनिदानानुसार योग्य ते औषध व त्याची मात्रा निवडली तरच गुण येऊ शकतो. मात्र ऐकीव माहीतीवरुन स्वतःच स्वतःवर औषधोपचार करणे टाळावे. 

तसेच, उपचार सुरू करण्याआधी हा दोष निर्माण होण्यामागील कारणांचा तपास करावा लागतो. यातील जनुकीय आजार किंवा शुक्राणू मार्गातील दोष यांसारख्या कारणांवर औषधाचा फारसा उपयोग होत नाही. व्यसनाधीनता, उष्णता, रासायनिक संपर्क किंवा रेडीएशन या कारणांना दूर केल्याशिवाय दोष बरा होत नाही.

अनेकदा यामुळे येणारे वंध्यत्व नैराश्‍याला कारणीभूत ठरते, अशावेळी योग्य पुष्पौषधी वापरुन त्यावर मात करता येते.

बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता व इतर काही दोषांमुळे शुक्राणूंची संख्या व आरोग्यावर घातक परीणाम होत असतो. त्यामुळे निर्माण होणारे वंध्यत्व दूर करण्यासाठी वेळीच योग्य उपाय योजना करणे हाच एक परीणामकारक पर्याय ठरु शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spermatozoon