उन्हाळी फळे 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 24 March 2017

उन्हाळ्यातल्या उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड पेय प्यायची ओढ रास्त असते आणि ही ओढ पूर्ण करण्यासाठी निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे भरभरून देत असतो. 

उन्हाळा सुरू झाला की तहान लागण्याचे प्रमाण आपोआप वाढते. उन्हाळ्यातल्या उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काहीतरी थंड पेय प्यायची ओढ रास्त असते आणि ही ओढ पूर्ण करण्यासाठी निसर्ग उन्हाळ्यात रसाळ फळे भरभरून देत असतो. 

वास्तविक रणरणत्या उन्हामुळे सर्वत्र कोरडेपणा वाढत असताना आंबा, द्राक्षे, कलिंगडसारखी रसरसशीत फळे निसर्ग उत्पन्न करतो हे एक आश्‍चर्यच वाटावे, पण उन्हाळ्यातील उष्णतेला आणि कोरडेपणाला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी निसर्गाची ही खास योजना आहे. प्रत्येकाने या योजनेचा उपयोग करून घ्यायला हवा. 

शरीरशक्तीसाठी आंबा 
उन्हाळ्यात येणारे सर्वात लोकप्रिय फळ म्हणजे आंबा. "फळांचा राजा' ही उपाधी लाभलेल्या या फळामुळे उन्हाळा सुसह्य तर होतोच, शिवाय उन्हाळ्यातील उष्णता आंबा पचविण्यास मदत करते. 
पक्वमात्रं जयेद्वायुं मांसशुक्रबलप्रदम्‌ ।...चरक सूत्रस्थान 
पिकलेला आंबा वातदोषाला जिंकतो, मांसधातू तसेच शुक्रधातूची ताकद वाढवतो, एकंदर शरीरशक्‍तीही वाढवतो. 
पिकलेला आंबा तास-दोन तास साध्या पाण्यात बुडवून ठेवावा व नंतर त्याचा रस काढून, दोन चमचे साजूक तूप, एक-दोन चिमूट मिऱ्याची पूड, सुंठीचे चूर्ण टाकून दुपारच्या जेवणात घ्यावा. यामुळे उन्हाळ्यामुळे वाढणारी रुक्षता आटोक्‍यात राहते, रक्‍तादी धातूंचे पोषण होते, उन्हाळ्यामुळे कोमेजलेल्या चित्तवृत्ती पुन्हा उल्हसित होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी, वजन जास्ती असलेल्या व्यक्‍तींनी मात्र वैद्यांच्या सल्ल्याशिवाय आंबा खाऊ नये. 

पित्तदोषहारी द्राक्षे 
"उन्हाळ्यातील वरदान' असे ज्याच्याबद्दल सांगता येईल ते फळ म्हणजे द्राक्ष होय. सर्व फळांत उत्तम सांगितलेली द्राक्षे उन्हाळ्यात प्रत्येकाने अवश्‍य खावीत. 
तृष्णादाहज्वरश्वासरक्‍तपित्तक्षतक्षान्‌ । वातपित्तमुदावर्तं स्वरभेदं मदात्ययम्‌ ।।...चरक सूत्रस्थान 
पिकलेली गोड द्राक्षे वात-पित्तदोषांचे शमन करतात, उन्हाळ्यात लागणारी तहान शमवतात, उष्णतेमुळे होणारे दाह, ताप, रक्‍त-पित्त वगैरे त्रासांवर औषधाप्रमाणे उपयुक्‍त असतात, आवाज सुधरवतात, क्षत-क्षय वगैरे धातूंच्या अशक्‍ततेमुळे होणाऱ्या रोगांना दूर करतात. द्राक्षाचा रस उन्हाळ्यात उत्तम असतो. यामुळे उन्हाळ्यात लघवीला होणारी जळजळ, तोंडाला पडणारा शोष, हातापायांची व डोळ्यांची आग वगैरे लक्षणे शमतात. बिया-विरहित द्राक्षांऐवजी बीजयुक्‍त द्राक्षे शुक्रधातूसाठी विशेषत्वाने हितकर असतात. काळ्या मनुकाही शुक्रधातूसाठी उत्तम असतात. द्राक्षेसुद्धा मीठ विरघळविलेल्या पाण्यात सुमारे एक तास भिजत घालावीत, नंतर वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावीत व मगच वापरावीत. 

बल्यवान शहाळे 
शहाळे तसेच नारळ ही फळेही उन्हाळ्यात नित्य सेवन करण्यास उत्तम असतात. 
बृंहणस्निग्धशीतानि बल्यानि मधुराणि च ।...चरक सूत्रस्थान 
नारळ पौष्टिक, स्निग्ध गुणाचे, शीत वीर्याचे व गोड चवीचे असते, बल्य म्हणजे शरीरशक्‍ती वाढविणारे असते. विशेषतः शहाळ्याचे पाणी शरीरात चटकन शोषले जाते. तहान शमत नसल्यास उष्णतेने लघवीचा दाह होत असल्यास, शरीरात कोठेही जळजळ होत असल्यास शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी शरीर-मनाची तगमग होते अशा वेळी चहा-कॉफीऐवजी शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम होय. उन्हाळ्याच्या दिवसांत नारळाचे दूध, ओले नारळ यांचा स्वयंपाकात नियमित वापर करणेही उत्तम असते. 

लिंबू आणि रातांबा 
लिंबू बाराही महिने मिळत असले तरी उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्‌भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते, भूक वाढवते, दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्यामुळे पचन सुधरवते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात लिंबाचा नियमित समावेश असू द्यावा. शिवाय साखर, मीठ, जिऱ्याची पूड टाकून केलेले लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते. 
लिंबाप्रमाणेच उन्हाळ्यात कोकम (रातांबा) हे फळही उपयुक्‍त असते. उन्हाळ्यात तयार होणाऱ्या ओल्या, ताज्या फळाचे सरबत चवदार तर होतेच, पण उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो. 

तृप्तिकर डाळिंब 
उन्हाळ्यामध्ये मिळणारे अजून एक फळ म्हणजे डाळिंब. 
पित्तनुत्तेषां पूर्वं दाडिममुत्तमम्‌ ।।...चरक सूत्रस्थान 
गोड चवीचे डाळिंब पित्तशामक असते. उन्हाळ्यात गोड डाळिंबाचा रस तृप्तिकर तर असतोच, पण उष्णतेचे निवारण करण्यासाठीही उत्तम असतो. उन्हामुळे पित्त वाढून डोके दुखत असल्यास, मळमळत असल्यास, खडीसाखर घातलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. तहान फार लागत असल्यास व लघवी उष्ण होत असल्यासही डाळिंबाचा रस थोडा थोडा घेण्याने बरे वाटते. 
फणससुद्धा उन्हाळ्यात येणारे फळ होय. चवीला गोड व शीत वीर्याचा फणस शरीरपोषक असतो. 
स्वादूनि सकषायाणि स्निग्धशीतगुरूणि च ।...चरक सूत्रस्थान 
अतिरिक्‍त उष्णतेमुळे शरीराची शक्‍ती कमी होणे स्वाभाविक असते. अशा वेळी फणसाचे गरे खाण्याचा उपयोग होतो, मात्र फणस पचायला जड असल्यामुळे अग्नी व पचनशक्‍तीचा विचार करूनच खाणे बरे. 

रसाळ कलिंगड 
उन्हाळ्यामध्ये कलिंगडे ही मोठ्या प्रमाणावर तयार होतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता उद्भवू नये म्हणून जणू निसर्गाने या फळाची योजना केलेली आहे. कलिंगडाचा गर लाल रंगाचा असतो. चवीला गोड व अतिशय रसाळ असतो. दुपारच्या वेळी जेव्हा उष्णतेचे प्रमाण वाढते अशा वेळी कलिंगडाच्या रसात थोडेसे काळे मीठ टाकून घोट घोट घेण्यानेही उन्हाळा सुसह्य व्हायला मदत होते. 
कालिङ्‌ग शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।गुरु पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तम्भकरं तथा ।। 
कफकृत्‌ दृष्टिपित्ते च शुक्रधातोश्‍च नाशकम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर 
कलिंगड शीतल, बल्य, मधुर, तृप्ति देणारे, गुरु, पुष्टिकर, मलप्रवृत्ती बांधून करणारे व कफ वाढविणारे आहे, तसेच पित्त, दृष्टी व शुक्रधातूचा नाश करणारे आहे. 

गोड खरबूज 
कलिंगडाप्रमाणे उन्हाळ्यात खरबूजही मिळते. हे रसाळ फळ कलिंगडापेक्षा गोड असते. खरबूज खाणे तर उन्हाळ्यात चांगले असतेच पण उन्हाच्या झळा लागल्यास खरबुजाच्या बिया वाटून डोक्‍यावर लावण्याचा व खरबुजाचा रस अंगाला लावण्याचा फायदा होतो. 
पक्वं तु खर्बुजं तृप्तिकारकं पौष्टिकं मतम्‌ । कफकृन्मूत्रलं बल्यं कोष्ठशुद्धिकरं गुरु ।। 
स्निग्धं सुस्वादु शीतं च वृष्यं दाहश्रमापहम्‌ । वातं पित्तं तथोन्मादं नाशयेदिति च स्मृतम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर 
पिकलेले खरबूज तृप्तिकर, पौष्टिक, कफकारक, मूत्रल, बलदायक, कोष्ठाची शुद्धी करणारे व गुरू आहे. खरबूज स्निग्ध गुणाचे, मधुर रसाचे, शीत वीर्याचे असून वृष्य (शुक्रवर्धक), दाहशामक, श्रमनाशक, वात-पित्तशामक व उन्मादनाशक आहे. 

शरीरपोषक अंजीर 
अंजीर हे फळही उन्हाळ्यात तयार होते. चवीने गोड व वीर्याने शीत असणारे अंजीर शरीरपोषक असते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते. उष्णतेपाठोपाठ येणाऱ्या कोरडेपणामुळे शरीरातील रसधातू क्षीण होणे स्वाभाविक असते. क्षीण रसधातूमुळे जीभ सुकते, तोंड कोरडे पडते, काही करू नये असे वाटते. अशा वेळी अंजीर खाण्याचा चांगला उपयोग होतो. 

उत्साह देणारे मोसंबी 
गोड मोसंबीचा रस वीर्याने शीत तसेच सत्वर तृप्ती देणारा असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येऊन शरीरातील जलांश कमी होतो, याचा परिणाम रसधातूवर होऊन थकवा, अनुत्साह जाणवू शकतो. अशा वेळी गोड मोसंबीचा रस घेणे उत्तम असते. विशेषतः दुपारच्या वेळी चहा-कॉफीसारखे गरम पेय घेण्याऐवजी मोसंबीचा रस घेणे चांगले. 

उष्णतानिवारक ऊस 
उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याची मजा काही औरच असते. 
वृष्यः शीतः रसः स्निग्धो बृंहणो मधुरो रसः । श्‍लेष्मलो भक्षितस्य इक्षोर्यात्रिकस्तु विदह्यते ।।...चरक 
ऊस चवीला गोड, वीर्याने शीत, गुणाने स्निग्ध, पौष्टिक, शुक्रवर्धक व कफवर्धक असतो. या सर्व गुणांमुळे उन्हाळ्यातील उष्णतेचे निवारण करण्यासाठी तसेच शरीरशक्‍ती टिकविण्यासाठी ऊस दातांनी चावून खाणे सर्वांत चांगले. उसाचा रस काढायचा असला तर उसाचे मूळ, शेंडा, साल वगैरे बाजूला करून, ऊस स्वच्छ धुऊन मगच चरकात टाकून रस काढावा. उसाच्या पेरांवर असलेले कडक आवरण काढल्याशिवाय किंवा नीट स्वच्छता न ठेवता काढलेला रस मात्र विदाही म्हणजेच दाह करणारा ठरू शकतो असेही चरकाचार्य सांगतात. 

अशा प्रकारे उन्हाळ्यात निसर्गाने भरभरून दिलेल्या फळरूपी वरदानाचा युक्‍तिपूर्वक उपयोग करून घेतला तर त्यामुळे उन्हाला सुसह्य होईलच, शिवाय आरोग्यही टिकून राहण्यास हातभार लागेल. 

डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: summer fruits