घामाघूम ! 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 31 March 2017

घाम येणे नैसर्गिक आहे. घामाला वास असला तर नुसते परफ्यूम शिंपडणे वा शरीरावर पावडरीचे थर चढविणे हे इलाज नव्हेत, तर शरीरशुद्धी करून, पोटात औषधे घेऊन, अंघोळीच्या वेळी विशिष्ट वनस्पतींच्या चूर्णाचा उपयोग केला, दर्प उत्पन्न होईल असे पदार्थ खाणे टाळले तर घामाचा वास येण्यापासून सुटका मिळू शकते. 

"घामाघूम होणे', "घाम गाळणे', असे घामाविषयी अनेक वाक्‍प्रचार प्रचलित आहेत. शेतकरी घाम गाळून शेती करतो असे म्हटले जाते, कारण शेतीत करावे लागणारे कष्ट सर्वात अधिक असतात. कडक झालेली जमीन भर उन्हात नांगरायची म्हणजे कपाळावर घर्मबिंदू दिसणारच. त्यानंतर पेरणी, कापणी, झोडणी वगैरे शेतीतील सर्वच कामे कष्टाची असतात. अन्न हे सर्वांनाच आवश्‍यक असणारे जीविताचे साधन आहे. पण नको नको त्या गोष्टींवर भरपूर खर्च करणारी मंडळी अन्नधान्यावर व खाण्याच्या वस्तूंवर, त्यातल्या त्यात दैनंदिन खाण्याच्या वस्तूंवर खर्च करताना मात्र हात आखडता घेतात व पैसा वाचविण्याचा प्रयत्न करतात. भर उन्हात घाम गाळून शेवटी बिचाऱ्या शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही व मग सुरू होतात त्याचे हाल. 

हाताने कष्ट करावे, रोज काही मेहनतीची कामे करावीत म्हणजे आयुष्यवृद्धी होते, शरीराला घाट येतो हे सर्वांनाच माहिती असते. घाम गाळून मिळविलेले व पैसा देऊन खाल्लेले अन्न गोड लागते. गावाकडच्या भाकरी गोड व अधिक चविष्ट का लागतात? तसे पाहता घाम शरीरातील क्षार बाहेर टाकत असल्यामुळे कष्टाच्या भाकरीला तर मिठाची चव यायला पाहिजे. पण घामाची भाकर म्हणजे स्वतः कष्ट करून ईमाने-इतबारे, कुणालाही न फसवता स्वतःच्या श्रमांनी कमविलेले अन्न. 

शरीरात असलेले क्षारद्रव्य व मेदधातूचा मल घामरूपाने बाहेर पडतो. मेदधातू थुलथुलीत व चिकट पदार्थ असून त्याचा वंगणासाठी, शरीराला आकार मिळण्यासाठी व शरीराला मऊपणा येण्यासाठी उपयोग होतो. खाल्लेल्या अन्नाचे पचन रस, रक्‍त, मांस इथपर्यंत बऱ्याच वेळा व्यवस्थित होते. परंतु पुढे मेदाला पचविणे, योग्य प्रमाणात ठेवणे खूप अवघड असते. 
जगभरात कष्टाचे मोल सर्वात अधिक असते, त्याची दुसऱ्या कशाची तुलना होणार नाही. त्याचे निदर्शक असतो घाम. कष्टाचे काम करत असताना, धावत असताना सर्व स्नायूंच्या हालचालीमुळे मेदपचन होऊन लगेच घाम येतो. बाहेर वातावरण थंड नसताना अंगावर खूप जाड वा गरम कपडे घातल्यास मनुष्य घामाघूम होतो. सर्व धातूंना चलित करून त्यांचा मल सुटा करण्याचा प्रयत्न पंचकर्माच्या वमन, विरेचन क्रियांद्वारे केला जातो. यात मालिशद्वारे शरीरात खोलवर जिरणारे तेल वापरून बाह्यस्नेहन केल्यानंतर बाष्पपेटीत बसवून किंवा व्यक्‍ती खूप कृश असल्यास जाड पांघरुणात वा ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून सर्व ठिकाणांबरोबरच मेदातील मल सुटा होऊन घाम येतो व शरीरशुद्धी होते. 

सेवन केलेल्या अन्नाचे पचन जसे होईल त्यावर मलाचा रंग, वास वगैरे गोष्टी अवलंबून असतात. यामुळेच कित्येकांच्या घामालाही खूप वास येतो, कित्येकांच्या घामामुळे कपडे पिवळे होतात. त्याउलट सात्त्विक अन्न, तेही कमी प्रमाणात सेवन करणाऱ्यांच्या व नेहमी कष्ट करणाऱ्यांच्या शरीरात मेदाचे पचन सारखे चालू राहते व त्यांना एकदम खूप घाम येत नाही. साधारण कामाने व साधारण उष्णतेत अशा व्यक्‍ती घामाधूम होत नाहीत; अगदी बराच वेळ पळायचे असले, सामान घेऊन पळायचे असले तर त्यांना थोडासा घाम येऊ शकतो व त्यांच्या घामाला रंग, दर्प वगैरे नसतो. 
रोज सकाळी अंगाला लावण्यासाठी उटण्याची योजना करावी, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. घामाचा वास कमी होण्यासाठी काही काढे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. अशा गोष्टींमुळे व मेदाचे पचन व्यवस्थित झाल्यामुळे घामाला वास येत नाही. अति घाम येणाऱ्यांनी रोज कपडे बदलणे आवश्‍यक आहे. 

शरीरातील सप्तधातूंचे नैसर्गिक पचन झाल्यावर घाम येतो. घामाचा उपद्रव होणार नाही याकडे आपल्याला लक्ष ठेवता येते. अशुद्ध असलेला, उग्र वासाचा, खारटपणा जास्ती असलेला घाम हवा मिळू न शकणाऱ्या त्वचेवर राहिल्यास त्वचेवर पुरळ येऊ शकते वा काही त्वचाविकार उद्भवू शकतात. यावरही उपाययोजना करणे शक्‍य आहे. फक्‍त आवश्‍यकता आहे ती थोडा घाम गाळण्याची व त्यासाठी आवश्‍यक ते कष्ट करण्याची!! 
घामाला वास का येतो? वास येणे हा पृथ्वीतत्त्वाचा गुण आहे. घामाला वास येतो त्याअर्थी त्यात कुठले तरी भौतिक तत्त्व असणे आवश्‍यक आहे व ते येते रक्‍तातून. रक्‍ताला एक प्रकारचा उग्र वास असतो. रक्‍तातला दोष पुढे जात असताना घामापर्यंत आला की रक्‍तात असलेल्या पित्तगुणामुळे घामाला वास येतो. अशा व्यक्‍तींचे रक्‍त दूषित असले तर त्यांच्या घामाला तर वास येतोच, पण त्यांना त्वचारोगही असू शकतात. 

नुसत्या उष्णतेने वा कष्ट केल्यानेच घाम येतो असे नाही तर एखादी बातमी कळल्यानंतर वा एखाद्या संकटाला सामना द्यावा लागणार आहे असे लक्षात आल्यावरही बऱ्याच वेळा कपाळावर घर्मबिंदू दिसायला लागतात. याचा अर्थ असा की मनाला कराव्या लागणाऱ्या अति कामाचे परिणाम शरीरावर दिसतातच. खूप राग येत असणाऱ्या व्यक्‍तीला अल्सरला तोंड द्यावे लागते. तसेच सारखे ताणाखाली राहणाऱ्यांना घामाला तोंड द्यावे लागते. घाम कमी येण्यासाठी इतर उपाय म्हणजे मन शुद्ध ठेवणे, चिंता कमी करणे किंवा मानसिक ताण येणार नाही याकडे लक्ष ठेवणे. 

हे सर्व ऐकल्यावर वाचकाला घाम फुटू नये म्हणून एक आश्वासन निश्‍चितपणे देता येते की "घाम येणे नैसर्गिक आहे'. जगातील सर्व प्रदेशातील सर्व व्यक्‍तींना घाम येतोच. घामाला वास असला तर त्यावर इलाज करता येतात. नुसते परफ्यूम शिंपडणे वा शरीरावर पावडरीचे थर चढविणे हे यावरील इलाज नव्हेत, तर शरीरशुद्धी करून, पोटात औषधे घेऊन, अंघोळीच्या वेळी विशिष्ट वनस्पतींच्या चूर्णाचा उपयोग केला, दर्प उत्पन्न होईल असे पदार्थ खाणे टाळले तर घामाला वास येण्यापासून सुटका मिळू शकते. आपण जाहिरातीत पाहतो की घामाला वास असल्यामुळे माणसे दूर पळत असताना एक परफ्यूम अंगावर छिडकले की सर्व हवी-नको ती मंडळी आकर्षित होतात. पण हे खरे नव्हे व असे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sweating