#FamilyDoctor काळजी घ्या प्रोस्टेटची! 

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई
Sunday, 18 November 2018

वृद्धत्वाकडे झुकलेल्या पुरुषांचा विकार म्हणून आजवर ओळखले जात असलेले प्रोस्टेटचे विकार आता तरुणांमध्येही दिसून येऊ लागले आहेत. हे विकार होऊ नयेत, यासाठी काय करायला हवं, याची माहिती प्रत्येकालाच असायला हवी. जीवनशैलीतील बदलांमुळे अवघ्या पंचविशीत प्रोस्टेटचा त्रास जडण्याचे प्रमाण आपल्याकडे वाढत आहे. चाळिशी ओलांडलेल्या पुरुषांनी या व्याधीबाबत जागरूक राहायलाच हवे. आहार-विहाराबाबतीतली दक्षता आणि नियमितपणे केलेली तपासणी हे या व्याधीपासून दूर राहण्याचे मार्ग आहेत. 

अभिषेक वर्षभरापूर्वी आमच्याकडे उपचारासाठी यायला लागला तो प्रामुख्याने लघवीच्या ठिकाणी सतत होणारी जळजळ आणि "लघवी करताना खूप दुखतं' अशा तक्रारी घेऊन. उत्तम ऍकॅडमिक करिअर, नंतर आयटी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी, सततच्या परदेशवाऱ्या असे त्याचे करिअर आकार घेऊ लागले होते. पण, एक दिवस त्याच्या लक्षात आले, की त्याला कामावर लक्ष केंद्रित करणे अशक्‍यच बनले आहे. सारखे लघवीला जावे लागतेय, तिथे जळजळ होतेय, दुखतेय आणि त्या साऱ्याचा परिणाम आपल्या कामावर होतोय. बरे, ही सारी लक्षणे एकदम अचानक उद्‌भवली होती, असे नव्हे. त्यापूर्वीपासूनच बराच काळ त्यापैकी काही लक्षणे कमी-अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. पण, "होईल ठीक' असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणेच अभिषेकने पसंत केले होते. त्यातच "लघवीची जळजळ होतेय ना! पी बिअर, होईल ठीक!' असा (बद) सल्ला देणाऱ्या मित्रांची भर पडली. नंतरही काही किरकोळ औषधे घेण्यापलीकडे अभिषेकने काही केले नव्हते. "मूत्रमार्गाची जळजळ म्हणजे काही तरी सर्वसामान्य जंतूसंसर्ग' अशा सरधोपट समीकरणाला अनुसरून जे काही किरकोळ उपचार केले गेले तेही व्याधीच्या मूळ कारणापर्यंत पोचता न आल्याने निरुपयोगी ठरले. परिणामी, तो आमच्याकडे आला तेव्हा त्याचं हे दुखणे वर्षभराचे जुनाट (क्रॉनिक) बनले होते. त्याच्या दुखण्याची आणि जीवनशैलीची माहिती घेतल्यावर दुखण्याचे मूळ काही वेगळेच असावे, हे लक्षात आले. तपासणी केली तेव्हा कळले, की त्याच्या प्रोस्टेट (पूर:स्थ) ग्रंथींना बराच काळपासून जंतूसंसर्ग (क्रॉनिक प्रोस्टटायटिस) झाला होता. प्रोस्टेट ग्रंथींचा आजार हा खास पुरुषी आजार म्हणता येईल. 

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आज मोठा प्रश्न आहे. खासकरून स्त्रिया आणि प्रोस्टेटचे रुग्ण या वर्गांना याचा खूपच त्रास होतो. वयाची साठी उलटलेले ज्येष्ठ नागरिक, वरचेवर लघवीला जावे लागेल म्हणून सार्वजनिक समारंभांना जाणे टाळायला लागतात. "सारखा सारखा लघवीला जातो, मग लोक काय म्हणतील?' या विचारांनी त्यांना नैराश्‍यही येते. प्रोस्टेटमुळे होणारी त्यांची मूत्रविसर्जनाची कुचंबणा आणि त्रास फक्त शारीरिक नसतो, तर त्यामुळे होणारी त्यांची मानसिक घुसमट आणि त्यांच्या सामाजिक जीवनावर होणारे परिणाम यामुळे या आजाराकडे गंभीरतेने बघायला हवे. या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता याबाबत जनजागृती करणे आज नक्कीच गरजेचे झाले आहे. 

पूर:स्थ ग्रंथी म्हणजे काय? 
शरीराची विविध कार्ये चालू राहण्यासाठी आवश्‍यक असणारे स्राव स्रवणाऱ्या अनेक ग्रंथी आपल्या शरीरात असतात. "प्रोस्टेट' (पूर:स्थ) ही अशीच एक ग्रंथी. प्रत्येक पुरुषात असणारी. स्त्रियांमध्ये मूत्रनलिकेच्या अस्तरात काही ग्रंथी असतात; परंतु पुरुषांप्रमाणे गाठ नसते. पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या खालच्या भागाला लागून वेढा घातलेल्या स्थितीत ही ग्रंथी असते. मोठ्या आतड्याच्या खालच्या भागाला रेक्‍टअम (Rectum) म्हणतात. प्रॉस्टेट ग्रंथी रेक्‍टअमच्या समोर, गुदमार्गाच्या पुढच्या बाजूला लागून असते. जन्मतः ही ग्रंथी अगदीच सूक्ष्म असते. पौगंडावस्था येईपर्यंत या ग्रंथीचा आकार लहानच असतो. लहान मुलात साधारण एखाद्या वाटाण्याएवढी असणारी ही ग्रंथी तरुण पुरुषात अक्रोडएवढी होते. सामान्यपणे ही ग्रंथी अक्रोडासारखी, पण मऊ असते. पौगंडावस्था संपल्यानंतर ही ग्रंथी जवळपास आठ ते दहा ग्रॅम वजनाची आणि सुमारे अडीच सेंटीमीटर व्यासाची असते. 

या ग्रंथीचे नेमके कार्य काय आहे, हे सांगणे कठीण आहे. या ग्रंथीचा स्राव आणि शुक्रजंतू (sperms) मिळून वीर्य (Semen) बनते. प्रोस्टेट ग्रंथी वृषणांना दोन नळ्यांच्या साहाय्याने जोडलेली असते. वृषणांमधून शुक्राणू प्रोस्टेट ग्रंथीकडे पाठवले जातात. तिथे ते विर्यासोबत मिसळले जाऊन नंतर त्याचे एकत्रित उत्सर्जन होते. शरीरसंबंधाच्या समयी ही ग्रंथी आकुंचन पावते. या आकुंचनामुळे उद्दिपित सुखाची (Orgasm) भावना वृद्धिंगत होते. प्रोस्टेट ग्रंथी जो स्राव तयार करतात त्याला "प्रोस्टॅटिक फ्लुइड' असे म्हणतात. विर्यामध्ये शुक्रजंतूंसोबत शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या स्रावात हे "प्रोस्टॅटिक फ्लुइड' असते. शुक्रजंतूंच्या कार्यक्षमतेसाठी हा स्राव आवश्‍यक असतो. शरीरसंबंधाच्या वेळी या "प्रोस्टॅटिक फ्लुइड'मुळे योनीमार्गातील आम्लधर्मी वातावरण बदलते आणि शुक्रजंतूंना अनुकूल होते, हा या स्रावाचा मोठा विशेष होय. प्रोस्टेट ग्रंथींतील काही मृदू पेशींमुळे वीर्य वेगाने बाहेर टाकले जाण्यासही मदत होते.  स्त्रियांना मेनोपॉज येतो, हे बहुतेक लोकांना माहीत आहे. पण, पुरुषांमध्येही मेनोपॉज असतो, हे अनेकांना ठाऊक नसते. पुरुषांमधील मेनोपॉजला वैद्यकीय भाषेत अँड्रोपॉझ असे म्हणतात. पुरुषांना साधारणपणे साठीच्या आसपास अँड्रोपॉज येतो. या काळात प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढण्यास सुरुवात होते. या ग्रंथीमध्ये कडकपणा येऊ लागतो. म्हणजेच एका अर्थी प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होणे ही वयोमानाबरोबर होणारी निसर्गक्रमप्राप्त घटना आहे. पुरुषत्वाला जबाबदार असणाऱ्या टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या लिंगद्रव्य संप्रेरकाच्या कार्याशी ही वाढ संलग्न आहे. टेस्टोस्टेरॉन जसे कमी होत जाईल, तशी ही ग्रंथी वाढण्याची शक्‍यता वाढत जाते. मूत्राशयातून निघणारी मूत्रनलिका प्रोस्टेट ग्रंथीतून जाते. त्यामुळे या ग्रंथीला सूज येण्याने, ग्रंथीचा आकार वाढल्याने मूत्रविरेचन नलिकेवर (युरिथ्रावर) दाब येऊ लागतो. मूत्रविसर्जनाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, लघवी बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. वयाच्या ऐंशी वर्षांच्या पाचपैकी चार पुरुषांत अशी समस्या निर्माण होऊ शकते. 

या ग्रंथीच्या स्रावामध्ये "पीएसए' म्हणजेच "प्रोस्टेट स्पेसिफिक ऍन्टिजेन'चाही समावेश असतो. हे रसायन रक्तातही आढळून येते. रक्तातील या रसायनाची पातळी मोजण्याची चाचणी प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रोस्टेट ग्रंथी तिच्या रचनेच्या वैशिष्ट्यांनुसार चार भागांत विभागली जाते. या ग्रंथीची सूज किंवा तिला झालेला कर्करोग विशिष्ट विभागात निर्माण होतो. केवळ सूज की कर्करोग, हे निश्‍चित करून त्याच्या उपचारांची दिशा ठरवली जाते. अत्याधुनिक सोनोग्राफी तपासण्यांच्या आधारे या ग्रंथीचे आकारमान व वजन यांचा अंदाज लावता येऊ शकतो. मात्र, क्वचितप्रसंगी या ग्रंथीचा आकार आणि वजन यांत दहा पटीने वाढ झाल्याच्या घटनाही दिसून येतात. एका रुग्णात प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होऊन तिचे वजन साडेसहाशे ग्रॅम झाल्याची नोंद वैद्यकीय इतिहासात आहे. अशा वेळी शस्त्रक्रियेला पर्याय नसतो. 

प्रोस्टेटचं दुखणं असतं कसं? 
प्रोस्टेट ग्रंथीच्या संदर्भात तीन प्रकारची दुखणी उद्‌भवण्याची शक्‍यता असते.  वैद्यकीय परिभाषेत "बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लाजिआ' (बीपीएच) या नावाने ओळखली जाणारी साधी वाढ. येथे "बिनाईन' या शब्दाचा अर्थ कर्करोग नसताना झालेली वाढ, असा आहे. 

ग्रंथीचा जंतूसंसर्ग. 
प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग 
अशा प्रकारची ही दुखणी होत. या व्याधी पूर्वी केवळ वयस्कर पुरुषांत दिसून येत असत. मात्र, आता लहान वयातही या व्याधी दिसून येण्याचे प्रमाण वाढत असल्याने या आजारांची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होते आहे. प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग किंवा त्यांची सूज (बीपीएच) प्रामुख्याने पन्नास वर्षांवरील पुरुषांमध्ये आढळून येतात आणि जंतूसंसर्ग कोणत्याही वयात होऊ शकतो, असा आजवरचा ठोकताळा होता. मात्र, जीवनशैलीतील बदलांमुळे आता अवघ्या पंचविशीतही प्रोस्टेटचे त्रास होण्याचे प्रमाण आपल्याकडे वाढत आहे. सर्वसाधारणपणे चाळिशी ओलांडलेल्या पुरुषांनी या व्याधीबाबत जागरूक राहायला हवे आणि नियमितपणे त्यासाठी तपासणी करून घ्यायला हवी, असे म्हणता येईल. 

काय होतो त्रास? 
प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढला म्हणजे प्रत्येकाला त्रास होईलच असे नसते. ज्यांच्या ग्रंथीचा आकार वाढलेला आहे, अशा पुरुषांपैकी पन्नास टक्के पुरुषांना कोणताच त्रास सुरुवातीला जाणवत नाही. बहुतेक जण म्हातारपणात असा त्रास होणारच, असेही गृहीत धरतात आणि डॉक्‍टरांचा सल्ला घेणे टाळतात. त्रास सांगितल्यास शस्त्रक्रिया करावी लागेल, तपासण्या व उपचार यासाठी मोठा खर्च लागेल, असे रुग्णांना वाटते. आपण आधीच कमवत नाही, मग आपल्या उपचारांच्या खर्चाचा बोजा कुटुंबीयांवर का टाका, असा विचार करूनही अनेक वृद्ध हा त्रास सहन करतात. ज्या वेळी त्रास असह्य होतो तेव्हा वैद्यकीय मदत घेतली जाते. तोवर मूत्रपिंडाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता बळावते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वृद्धीमुळे सर्वसाधारण कशा प्रकारचा त्रास होतो, हे पाहू - 
रात्री वारंवार लघवी करण्यासाठी झोपेतून उठणे 
लघवीची धार बारीक आणि शक्तिहीन असल्याप्रमाणे पडणे 
लघवीची धार पायांवर किंवा कपड्यांवर पडणे 
लघवीवर नियंत्रण न राहणे 
लघवी करताना सुरवातीला वेळ लागणे. 
लघवी थांबून थांबून होणे. 
लघवी थेंब थेंब होणे. 
लघवी पूर्ण न होणे आणि पूर्ण झाल्याचे समाधान न मिळणे. 

बीपीएच या आजाराचे वैद्यकीय निदान वेळीच करून न घेतल्यास किंवा त्रास अंगावर काढत त्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्यास या आजारात बरीच गुंतागुंत होऊन तो वाढू शकतो. अशा वेळी  

लघवी अचानक अडकू शकते. प्रयत्न करूनही रुग्णाला मूत्रविसर्जन करता येत नाही. ओटीपोट फुगू लागते आणि शेवटी मूत्रशलाका (कॅंथेटर) च्या मदतीनेच मूत्राशय रिकामे करावे लागते. 

लघवी पूर्ण न होऊन मूत्राशय रिकामे होत नाही. त्यामुळे लघवीत जंतूसंसर्ग होऊ शकतो. लघवीवाटे रक्त जाणे, मूत्रदाह होणे, थंडी-ताप येणे, लघवी गढूळ होणे व इतर त्रास होतात.  मूत्रमार्गामधील अडथळा वाढून मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठते. त्यामुळे किडनीतून मूत्राशयामध्ये मूत्र येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मूत्रवाहक नलिका आणि मूत्रपिंडे यांना सूज येऊ शकते. यामधून मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. 

मूत्राशयात सातत्याने लघवी जमा होत राहिल्याने मूतखडा होण्याची शक्‍यता असते. 

मूत्राशय अशक्त होण्याची शक्‍यता असते. मूत्राशयाच्या स्नायूत शैथिल्य येते. अशा वेळी अडथळा दूर केला तरी लघवी साफ होण्यातील समस्या पूर्णतः दूर होत नाही. 

प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारात जवळपास प्रत्येक रुग्णाला जाणवणारी लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची असतात, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. त्रास नेमका कोणत्या प्रकारचा आहे, यावर प्रामुख्याने लक्षणे अवलंबून असतात. मात्र, लघवी करताना वेदना, जळजळ असा त्रास होणे. 

मूत्रविसर्जनाची सुरवात करण्यास वेळ लागणे, अचानकपणे अत्यंत घाईची लघवीला लागणे, लघवीचा वेग आवरणे अशक्‍य होणे, संपूर्ण लघवी बाहेर टाकली न जाणे, वारंवार लघवीला जावे लागणे (दिवसाला दहापेक्षा जास्त वेळा). मूत्रनलिकेवर दाब येण्याने लघवी सुटताना अडचण जाणवू लागते. लघवीची धार अडकू लागते. मूत्राशयाला अधिकाधिक जोर लावून लघवी बाहेर टाकावी लागते. कालांतराने प्रॉस्टेट ग्रंथीचा मूत्रनलिकेवर इतका दाब वाढतो, की मूत्राशय संपूर्ण रिकामे होऊ शकत नाही. अशा वेळी लघवीला जाण्याची घाई झाली, तरी लघवी चटकन सुटेनाशी होऊ लागते. लघवी कुंथून काढण्याऐवजी गरम स्वच्छ पाण्याच्या टबमध्ये बसल्यास अडलेली लघवी सुटण्याचा संभव असतो. अर्थात, हा वारंवार करता येण्याजोगा उपाय नाही. तसेच कालांतराने हा उपायही चालत नाही. खरे तर हा नियमित उपाय नाहीच; तर वैद्यकीय मदत घेण्याआधी प्राथमिक स्वरूपात करायचा हा इलाज आहे. 

वीर्य बाहेर फेकले जात असताना वेदना होणे, संभोगाच्या वेळी अथवा त्यानंतरच्या काळात प्रचंड वेदना जाणवणे, अंडाशयाच्या मागील बाजूला वेदना होणे 

ही तीन लक्षणे अगदी मुख्य लक्षणे म्हणून सांगता येऊ शकतील. लघवीसाठी रात्री उठावे लागणे, ही मुख्य तक्रार दिसून येते. (अशाच प्रकारची तक्रार मधुमेह असणाऱ्यांचीही असू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.) याचबरोबर या ग्रंथीच्या काही व्याधीचे वर्गीकरण "फंक्‍शनल डिसऑर्डर' या प्रकारात केले जाऊ शकेल. अशा व्याधी बऱ्या करणे नेहमीच कठीण असते. म्हणून या व्याधीचे निदान वेळेवर होण्याची आणि तातडीने योग्य उपचार केले जाण्याची आवश्‍यकता आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे अचानक लघवी कोंडू शकते. पाठ दुखू शकते. कित्येकदा पाठीचे दुखणे हे पाठीच्या मणक्‍यांचे किंवा स्नायूंचे दुखणे म्हणून पाहिले जाते. हे दुखणे नेमके कशामुळे आहे, याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही वेळा लघवीला वारंवार जावे लागते, पण त्यामुळे आपल्याला लघवी साफ होते, असा गैरसमज करून घेतला जातो. प्रत्यक्षात लघवी साफ होत नसल्याने वारंवार लघवीला जावे लागत असते, हे लक्षात घेतले पाहिजे. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील, तर आपल्या डॉक्‍टरांना दाखविणे आवश्‍यक ठरते.

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर (www.aceremedy.in
संतोष शेणई (santshenai@gmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of prostate