उन्हात घ्या काळजी

डॉ. सरिता वाघमोडे
Friday, 3 May 2019

आल्हाददायक उन्हाळ्यासाठी खास आरोग्य टिप्स आणि होमिओपॅथिक औषधोपचार

आल्हाददायक उन्हाळ्यासाठी खास आरोग्य टिप्स आणि होमिओपॅथिक औषधोपचार

उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान खूप वाढते आहे. तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. वाढत्या तापमान बदलाला ॲडजेस्ट व्हायला शरीराला काही कालावधी लागतो. तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो, जसे की लहान मुले, तरुण मुले, तरुण, वयस्कर लोक, स्त्री, पुरुष सर्वांमध्ये वेगवेगळे परिणाम दिसून येतात. सहसा तापमान बदलामुळे शरीरात या प्रकारची काही लक्षणे दिसून येतात. यामध्ये थकवा येणे, डोकेदुखी, चक्कर, डिहायड्रेशन, घामोळे येणे, उष्माघात, मूतखडा, उन्हाळा लागणे, लघवीला जळजळ होणे, ॲसिडीटी, उलट्या, जुलाब होणे, भूक मंदावणे, ब्लडप्रेशर कमी जास्त होणे, नाकातून रक्तस्त्राव इत्यादी त्रास होतात. यावर सहज सोप्या पद्धतीने काही उपाय केल्यास या गोष्टी टाळता येतील. 

सर्वप्रथम शरीराचे तापमान कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. १०-१५ ग्लास थंड पाणी प्यावे. शक्‍यतो माठातील पाणी प्यावे. त्यामध्ये तुळस, पुदिना, मोगरा हे टाकल्यास उत्तम. ते थंडावा देते. सुगंधित पाणी शरीरासोबत मनही प्रसन्न करते. 

पाण्यासोबत पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये द्राक्षे, कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी, डाळिंब इत्यादी घ्यावे. सरबते, लिंबू, कोकम, आवळा, कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळपाणी यामधील अँटी ऑक्‍सिडेंट गुणधर्म प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत करतात. तसेच मूतखडा, लघवीचा त्रास कमी होतो. थकवा, डोकेदुखी कमी होते. 

या दिवसांत भूक मंदावते. ॲसिडीटी, उलट्या, मळमळ होणे हा त्रास होतो. त्यामुळे पचायला हलका, साधा सकस आहार घ्यावा. प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असू द्यावे. कांद्याचे सेवन करावे. कांदा तापमान कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तेलकट पदार्थ, तळलेले, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, नॉनव्हेज, हॉटेलचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच आईस्क्रीम, कोल्डक्रिम, कोल्डड्रिंक्‍स, चहा, कॉफी, अल्कोहोल टाळावे.

जास्त प्रमाणात दिसणारा त्रास म्हणजे घामोळे येणे. घर्मग्रंथीची छिद्रे बंद झाल्यास हा त्रास दिसतो. घट्ट कपडे घातल्यास जास्त जाणवतो. त्यामुळे शक्‍यतो उन्हाळ्यात सैलसर, फिकट, सुती, पातळ कपडे वापरावेत. थंड पाण्याने दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ करावी. 

उन्हाळ्यात दुपारी १२-४ या वेळेत घराबाहेर पडू नये. जर बाहेर जावे लागले तर त्वचा पूर्णपणे झाकली जाईल याची काळजी घ्यावी. सनकोट, कॅप, छत्री, गॉगल या गोष्टी वापराव्यात. बाहेर पडताना पाणी पिऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची बाटली, खडीसाखर ठेवावी. बाहेरून घरात आल्यावर थंड पाण्याने हात, पाय, डोळे, तोंड धुवावे. गूळपाणी प्यावे.

दुपारी थोडीशी विश्रांती घ्यावी. घरात हवा खेळती राहावी यासाठी दारे, खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. जाड पडदे वापरण्याऐवजी पातळ पडदे वापरावेत. 

अजून एक दिसणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे. सहसा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. अशा वेळी त्या ठिकाणी सुती कापडात गुंडाळून बर्फ लावावा. डोक्‍यावर थंड पाणी शिंपडावे. कांदा नाकाजवळ धरावा. याचाही चांगला उपयोग होतो. उष्माघाताचा त्रास झाल्यास त्या व्यक्तीला सावलीत, मोकळ्या हवेत झोपवावे. हेड लो पोझिशनमध्ये पायाखाली उशी ठेवावी. कपडे सैलसर करावेत. थंड पाण्याने पुसून घ्यावे. पाणी, खडीसाखर द्यावी. डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 

हे झाले उन्हाळ्यातील त्रासाचे घरगुती उपाय. 

काही होमिओपॅथिक औषधे 
बेलाडोना - अचानक डोकं दुखणे, हातोडा मारल्यासारखे ठणकणे, आवाज, उजेड, धक्का लागला, हालचाल केल्यास जास्त त्रास होणे, उजव्या बाजूचे डोकेदुखी, चेहरा लालबुंद होणे, डोळे, घसा लाल होणे, दुखणे, आग होणे, नाकातून रक्त येणे.

 जेल्सेमियम - खूप थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर, डोळ्यांपुढे अंधारी येणं, डोकं जड होणे, गुंगी, सतत झोप येणे, ब्लडप्रेशर कमी होणे, तहान जास्त लागत नाही, थंडी वाजून ताप येणे.

 ग्लोनाईन - उष्माघात, डोकं खूप ठणकणे, फुटल्यासारखे वाटणे, छातीत धडधडणे, दम लागणे, नाडीची गती जलद होणे, ब्लडप्रेशर वाढणे, डोकं उंचावर ठेवल्याने तसेच मोकळ्या हवेत बरं वाटतं. 

 कार्बो वेज - उन्हामुळे खूप उलट्या, जुलाब होऊन अशक्तपणा, अंग थंड पडणे, ॲसिडिटी, गॅसेसचा त्रास, पोट गच्च होणे, ढेकर येणे, पंख्याचे वारे, मोकळी हवा यात बरे वाटते. 

 ब्रायोनिया - घसा कोरडा पडणे, खूप तहान लागणे, सर्दी, खोकला, डोकेदुखी थोडी हालचाल केली तरी वेदना वाढतात, नाकातून रक्त आल्यावर डोकं दुखणे थांबते. 

 अर्टिका युरेन्स - सनबर्न, उन्हामुळे त्वचा जळणे, शरीरावर पुरळ, राशेश येणे, खूप खाज सुटणे, आग दाह होणे, पित्ताच्या गांधी उठणे. 

 न्याट्रम कार्ब - उन्हाळ्यातील कोणताही त्रास कमी करण्यास अत्यंत उपयुक्त. डोकेदुखी, उन्हं वाढेल सूर्य जसजसा डोक्‍यावर येईल तसा त्रास वाढतो. दुपारनंतर कमी होतो. उन्हाचे जीर्ण परिणाम, उन्हामुळे अशक्तपणा जाणवतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care in summer