अंगठा चोखू नये, पण... 

डॉ. मानसी पावसकर
Friday, 17 January 2020

आपल्या वाईट सवयीचे काही फटकारे आपल्याला बसतात. लहान मुलांमधील अंगठा चोखण्याची सवयही अशीच त्रासदायक ठरू शकणारी आहे. 
 

आपल्या वाईट सवयीचे काही फटकारे आपल्याला बसतात. लहान मुलांमधील अंगठा चोखण्याची सवयही अशीच त्रासदायक ठरू शकणारी आहे. 
 

‘संगतीचा परिणाम’ ही बोधकथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ज्या वातावरणात वाढतो, मित्र-मैत्रिणी निवडतो, आपल्या अंगी तसेच वळण हळूहळू लागू लागते आणि ती सवय होऊन जाते. पण कुठली सवय आपण लावून घेऊ हे आपल्या हाती असते. ही बोधकथा आपल्या तोंडाशी संबंधित सवयींनाही तेवढीच लागू आहे. जीभ जेव्हा ‘ओव्हर टाईम’ करते, तेव्हा तिच्या आजूबाजूचे दातही एकमेकांशी प्रमाणाबाहेर संवाद साधू लागतात. कधीकधी एखादा दुसरा दात बोलतो, तर कधी सगळे एकसाथ बोलू लागतात. 

दंतवैद्य म्हणून मला दातांचे बोलणे अगदी स्पष्ट ऐकू येते. एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला जशा माणसाच्या मनातील भावना समजतात ना, तसेच दंतवैद्य म्हणून दातांच्या भावना मला समजतात. एखादा दात सहन करून करून अगदी संवेदनशील, हळवा झालेला असतो आणि त्याला कोणत्याही ‘सेंसितिविटी टूथपेस्ट’ची नव्हे, तर उपचारांची गरज असते. तर एखादा दात कीड लागल्यामुळे दुखावला गेलेला असतो. त्याच्यावर वेळेत उपचार केले नाहीत, तर मग शेवटी त्याला ईश्वरचरणी अर्पण करावे लागते. नियमितपणे दात तपासणी न ठेवणे, व्यवस्थित दात न घासणे, ताणतणावामुळे होणारी एसिडिटी, नख खाणे, अंगठा चोखणे, धूम्रपान, पान-गुटखा अशा माणसाच्या अनेक सवयीमुळे, वेदना मुळात भोगतात ते दात. 
वाईट सवय वेळेत मोडली तरच आपण भविष्यातील त्यामुळे होणारे दुष्परिणाम थांबवू शकतो. 

चार-पाच वर्षाची आर्या तिच्या आईसोबत क्लिनिकमध्ये एकदा आली होती. रिसेप्शन रूममध्ये बसली असता, तिचा अंगठा सतत तिच्या तोंडात होता. तिच्या आईच्या नजरेत गेले, तेव्हा ती ‘नो आर्या’ अशी वैतागून म्हणायची, पण आर्याचा थोड्या वेळानंतर परत तोंडात अंगठा चालूच. कन्सल्टेशन रूममध्ये आल्यावर, आर्या अगदी घाबरून माझ्याकडे बघत होती. आई म्हणाली, ‘‘आमचे सगळे उपचार करून झाले, बँडेज बांधून झाले, कडू औषध लावून झाले, तिखट लावून झाले, ओरडून झाले, पण सवय काही मोडेनाच. आता डॉक्टर, तुम्हीच काहीतरी मदत करा.’’ 

‘अंगठा चोखणे’ ही बाळांमध्ये खूप सामान्य गोष्ट आहे. कधी सोनोग्राफीमध्येसुद्धा, गर्भाशयात एखादे बाळ अंगठा चोखताना दिसून येते. हे सर्वसामान्य आहे. पण मूल अगदी चार वर्षाचे होइपर्यंत, ही सवय चालूच असेल तर मग त्याला मी समस्या म्हणेन. अंगठा चोखण्याच्या या सवयीमुळे तोंडाचा आकार बदलतो, टाळू खोल बनतो आणि दात पुढे दिसू लागतात. आर्या त्या टप्प्यात प्रवेश करत होती. आर्याला मी एक आश्वासनाची ‘स्माईल’ दिली, तिला ‘डेंटल चेअर’वर बसवून घेतले आणि स्ट्रॉबेरी वासाचे मटेरियल वापरून, तिच्या दातांचे ‘इम्प्रेशन’ घेतले. तिला नीट समजावून सांगितल्यावर, तोंडात बोट घालणार नाही हे तिनेही मला ‘प्रॉमिस’ केले. 
आर्याच्या तोंडात आम्ही एक `ऑर्थोडोंतिक अप्लायन्स’ बनवून लावले, ज्याच्या सहाय्याने अंगठा मुळात तोंडात आत टाळूपर्यंत जाऊ शकत नव्हता. या प्रकारे तिची सवय बंद होण्यास मदत झाली. पुढे काही दिवसांनंतर अप्लायन्स काढण्यात आले आणि थोडेफार दात जे पुढे आले होते, मागे घेण्यासाठी तिला दुसरी ‘ऑर्थोडोंतिक ट्रिटमेंट’ देण्यात आली. योग्य वेळेत उपचार चालू केल्यामुळे, चेहऱ्याची आणि दातांची ठेवण अगदी व्यवस्थित झाली. 

मुलांना फटकारण्याऐवजी, त्यांची योग्य प्रकारे समजूत घातली, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले, जिथे लागत आहे तिथे वेळेत उपचार केले तर मग प्रत्येक मुलात सकारात्मक बदल दिसू लागतात! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thumb should not be sucked, but... article written by Dr Manasi Pawaskar