कर्करोगाच्या तपासण्या 

Tumor markers
Tumor markers

रक्ताच्या व लघवीच्या परीक्षणातून कर्करोगाविषयी प्राथमिक शंका घेता येतात. मात्र यातील निष्कर्षांना अन्य तपासण्यांची जोड द्यावी लागते. 

ट्यूमर मार्कर्स म्हणजे काय ? 
काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये विशिष्ट प्रकारच्या स्रावांची निर्मिती होते अथवा त्या पेशीविरोधात त्या द्रव्याचे प्रमाण वाढते. हे कर्करोगयुक्त पेशींनी तयार केलेले पदार्थ रक्तात मोजता येतात. त्यांना ‘ट्यूमर मार्कर्स’ असे संबोधले जाते. काही प्रकारचे ट्यूमर मार्कर्स हे लघवीमध्येदेखील मोजता येतात. 

यासाठी कोणत्या तपासण्या असतात ? 
सर्व प्रकारच्या कर्करोगांना शोधता येत नाही. तसेच मानवी शरीरातील प्रत्येक प्रकारच्या कर्करोगासाठी तपासणी करता येत नाही. या महत्त्वाच्या बाबीमुळे काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांमध्येच या मार्कर्सचा उपयोग केला जातो. प्रोस्टेट, ओव्हरी, स्वादुपिंड, स्तन, आतड्याचा कर्करोग, मूत्रपिंड, यकृत अशा काही अवयवांच्या कर्करोगात या तपासण्या केल्या जातात. 

यापैकी काही रक्तामधील तपासण्या याप्रमाणे 

प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) ः 
पुरुषांमध्ये वय वाढते तसा प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. त्याचसोबत त्याच्या कर्करोगाचा संभव उद्भवू शकतो. सदर कर्करोगाचे निदान करण्यासाठी तसेच उपचारानंतर पातळी कमी होते आहे की नाही हे बघण्यासाठी ही चाचणी केली जाते. 
यात एक सावधानता बाळगावी लागते. प्रोस्टेटला सूज आली तरी याची पातळी जास्त असू शकते. 

कॅन्सर अँटिजन १२५ (सीए १२५) ः 
ही तपासणी काही प्रकारच्या ओव्हरीच्या कर्करोगात केली जाते. याचा उपयोग हा त्या प्रकारचा कर्करोग आहे किंवा नाही याची शक्यता आजमावतो. सोबतच त्याचा उपयोग उपचारानंतर पातळी तपासून औषधयोजना योग्य काम करते आहे की नाही हे ठरवण्यासाठी होतो. 
एक लक्षात घेतले पाहिजे की, इतर काही कर्करोगात, म्हणजे आतड्याचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड यांच्या कर्करोगातही याची पातळी जास्त असते. तसेच, काही प्रकारच्या कर्करोगविरहित आजारांमध्ये म्हणजे एंडोमेट्रियोसिस, पेल्व्हिक आजार यातही हे प्रमाण वाढू शकते. 

कॅन्सर अँटीजेन १५.३ (सीए १५.३) ः 
ही चाचणी स्तनांच्या कर्करोगामध्ये केली जाते. या घटकाचे प्रमाण कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत नगण्य असते. त्यामुळे या चाचणीचा मुख्य उपयोग शस्त्रक्रियेनंतर इतर ठिकाणी जर कर्करोगाने घर केले, तर फार महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी केला जातो. स्तनांच्या कर्करोगात शस्त्रक्रियेनंतर कर्करोगाच्या पेशी इतर अवयवांवर हल्ला चढवतात. (यालाच मेटास्टेसिस असे म्हणतात आणि हे इतर कर्करोगामध्येही घडू शकते.) त्यामुळे उपचारांच्या दरम्यान याची खाली जाणारी पातळी सर्व काही ठीक सुरू आहे याचा संकेत देते. 
फुफ्फुस, आतडे, मूत्राशय यांच्या कर्करोगामध्ये, तसेच एन्डोमेट्रियोसिस, लिव्हर सिरॉसिस वगैरे आजारांमध्येही ही पातळी वाढते. 

कॅन्सर अँटिजेन १९. ९ (सीए १९. ९ ) ः 
ही स्वादुपिंड (पॅन्क्रियाज), आतडे, जठर यांच्या कर्करोगात केली जाणारी चाचणी आहे. म्हणजेच अनेक प्रकारच्या कर्करोगामध्ये त्याचे प्रमाण वाढलेले असते. 
स्वादुपिंडाची सूज अथवा आतड्याचे आजार यामध्येही याची पातळी जास्त असते हे लक्षात घेतले पाहिजे. 

बीटा एचसीजी ः 
या चाचणीचे महत्त्व स्त्रियांमध्ये ओव्हरीचा ‘जर्म सेल ट्यूमर’ आणि पुरुषांमध्ये ‘टेस्टिक्युलर ट्यूमर’, 
स्त्रियांमधील ‘कोरियोकार्सिनोमा’ या कर्करोगामध्ये असते. 
याबाबतीत सावधानता म्हणजे गरोदरपण, आतड्यांचे आजार, लिव्हर सिरॉसिस यातही याची पातळी वाढते. 

कार्सिनो एम्ब्रियोनिकं अँटिजेन ः 
फुफ्फुस, स्तन, आतडे, थायरॉइड, यकृत आदींच्या कर्करोगात या चाचणीची पातळी वाढलेली दिसते . 
धूम्रपान करणारे, यकृत-आतड्याचे आजार, स्वादुपिंडाची सूज, अल्सर या इतर आजारातदेखील या मार्करची पातळी जास्त असते. 

अल्फा फिटो प्रोटीन (एएफपी) ः 
ही चाचणी यकृताच्या कर्करोगात (हेपॅटॉसेलुलर) आणि ओव्हरी, तसेच टेस्टीजच्या काही कर्करोगांमध्ये केली जाते. 
मात्र ही चाचणी लिव्हर सिरॉसिस, आतड्यांचे आजार आणि गरोदरावस्था यामध्येदेखील वाढते. 

कॅल्सिटोनीन ः 
थायरॉइडच्या मेडूलरी पद्धतीच्या कर्करोगामध्ये या चाचणीचा उपयोग केला जातो. 
मात्र मूत्रपिंडाचे दीर्घ आजार, सिडिटीवरील काही औषधे यातदेखील जास्त निष्कर्ष येतो. 

थायरॉग्लोबुलीन ः 
थायरॉइडच्या कर्करोगामध्ये ही चाचणी टेस्ट केली जाते. 
अँटी थायरॉग्लोबुलीन अँटिबॉडीजमुळेही या चाचणीची जास्त पातळी येते. 

लघवीतून करता येणारे ट्युमर मार्कर्स - 

बेन्स जोन्स प्रोटिन्स ः 
मल्टिपल मायलोमा आणि क्रोनिक लिंफोसायटीक ल्युकेमिया या आजारांच्या निदानासाठी आणि औषधांच्या परिणामकारकतेसाठी ही चाचणी करतात. 
पण अमिलॉइड आजारातदेखील याची पातळी वाढते. 

व्हॅनिल मांड्यलीक  एसिड ( व्हीएमए) ः 
ही चाचणी चोवीस तासांमध्ये जमा केलेल्या लघवीतून करतात. 
काही विशिष्ट प्रकारचे आहारातील पदार्थ, उदा, वॅनिला आईस्क्रीम आणि काही औषधांच्यामुळेदेखील याची पातळी वाढते. 

होमो व्हॅनिलिक एसिड ः 

ही चाचणीदेखील चोवीस तास जमा केलेल्या लघवीतून होते. न्युरोब्लास्टोमा प्रकारच्या कर्करोगात त्याचा वापर होतो. 

तारतम्य आणि निदान 
एक लक्षात ठेवले पाहिजे की, सर्व प्रकारच्या मार्कर्समध्ये कर्करोग नसताना इतर आजारातदेखील त्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे फक्त या मार्कर्सने अचूक निदान करता येत नाही. रुग्णाची तपासणी, एक्स- रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, तसेच प्रत्यक्ष पेशींचा अभ्यास याची सांगड घालून अचूक निदानापर्यंत पोचता येते. 
तथापि रक्त अथवा लघवीतून सहजी होऊ शकणाऱ्या या तपासण्या प्राथमिक शंका (स्क्रिनिंग टेस्ट्स) म्हणून फार महत्त्वाची भूमिका बजावतात. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com