स्त्री आरोग्य आणि सौंदर्य 

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 March 2019

स्त्रीने स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा पाया मजबूत असायला हवा. आरोग्यासाठी जागरूकता ठेवली तर त्यामागोमाग सौंदर्याचा आपसूकच लाभ होतो. 

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा पाया मजबूत असायला हवा. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीसंतुलन म्हणजेच स्त्रीआरोग्य आणि सौंदर्य यांच्यातील समतोल कसा साधता येईल याचा विचार करूया. 

स्त्रीआरोग्य या विषयाला आयुर्वेदशास्त्राच्या अष्टांगामध्ये वेगळे व विशेष स्थान आहे. स्त्रीची विशिष्ट शरीररचना, गर्भाशयादी अवयव, मासिक पाळी वगैरेंच्या अनुषंगाने ती पुरुषांपेक्षा खूपच वेगळी असते आणि म्हणूनच तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्‍यक असते. 

‘वयात येणे’ असा एक शब्दप्रयोग प्रचलित आहे. बालपण संपून तारुण्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश होण्यापूर्वी म्हणजे वयात येण्यापूर्वी मुलीच्या शरीरात, मनात, एकंदर स्त्रीसंतुलनात बदल होत असतात. पाळी सुरू होण्याची ही प्रक्रिया रसधातूशी संबंधित असते. 

रसात्‌ रक्‍तं ततो स्तन्यम्‌ ।...अष्टांगहृदय सूत्रस्थान
रसधातू संपन्न असला की पाळी वेळेवर आणि व्यवस्थित सुरू होते. वजन कमी असणाऱ्या किंवा अंगात कडकी असल्यामुळे रसधातू अशक्‍त असणाऱ्या मुलींना योग्य वयात पाळी येत नाही, असे दिसते किंवा प्राकृत कफदोषाची ताकद कमी पडली तर कफापासून पित्तापर्यंतचे स्थित्यंतर लवकर होऊन पाळी कमी वयातच सुरू होते. मुलीच्या एकंदर शारीरिक, भावनिक, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी अयोग्य होत. रसधातू संपन्न होण्यासाठी तसेच प्राकृत कफदोष व्यवस्थित राहण्यासाठी मुलींना सुरवातीपासून काळजी घेता येते. उदा., - आहारात दूध, शतावरी कल्प, मनुका, अंजीर, शहाळ्याचे पाणी, फळांचे रस, साळीच्या लाह्या यांचा समावेश असणे.

- आहार कोरडा न घेता रसयुक्‍त, साजूक तुपासहित घेणे. 

- अन्न ताजे, गरम व पुन्हा पुन्हा गरम न केलेले असणे. शिळे अन्न किंवा फ्रीजमध्ये गारठवून टिकविलेले अन्न न खाणे.

- प्राकृत कफदोष हा धातूंच्या आश्रयाने राहतो अर्थात धातू जेवढे बळकट, स्थिर असतात तेवढा प्राकृत कफदोष चांगला असतो. त्यादृष्टीने वाढत्या वयात मुलींनी अंगाला तेल लावणे उत्तम असते. हाडांपर्यंत जिरण्याची क्षमता असणारे तेल असले की धातूंची ताकद वाढते, पर्यायाने कफसंतुलन साध्य झाले की पाळी लवकर सुरू होणे, पाळीच्या वेळेला खूप त्रास होणे वगैरे त्रास टाळता येऊ शकतात.

पाळी सुरू झाल्यानंतरही रसधातू व रक्‍तधातू संपन्न राहतील यासाठी प्रयत्न करायचे असतात. वात-पित्तदोष वाढणार नाही, यासाठी काळजी घ्यायची असते. पाळी अनियमित असणे, पाळीच्या वेळेला पोटदुखी, पाठदुखी वगैरे त्रास होणे, प्रमाणापेक्षा कमी रक्‍तस्राव होणे, गाठी पडणे, वजन वाढणे या सर्व गोष्टी वातदोषाच्या असंतुलनामुळे होत असतात, तर अंगावरून अधिक प्रमाणात जाणे, अठ्ठावीस दिवसांच्या आधीच पाळी येणे, केस गळणे, चेहऱ्यावर व त्वचेवर मुरमे-पुटकुळ्या येणे वगैरे त्रास पित्ताशी संबंधित असतात

स्त्रीआरोग्य, त्वचेची कांती, नितळपणा, स्त्रीचा उत्साह हा स्त्रीच्या शुद्ध व सकस रक्‍तावरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. यासाठी लोहत्तत्वाने युक्‍त आहार, रसायने उदा. सॅनरोझ, धात्री रसायनसारखे रसायन घेणे, केशर, सफरचंद, पालक, डाळिंब, द्राक्षे वगैरे सेवन करणे आवश्‍यक असते. 

स्त्रीत्व संतुलित राहावे, यासाठी गर्भाशय व स्तनांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे होय. नियमित योनीपिचू वापरणे, अधूनमधून योनीधूपन करणे आणि स्तनांना विशेष औषधी द्रव्यांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे, हे यासाठीचे अगदी साधे व प्रभावी उपाय होत. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी पाळी सुरू झाली की हे उपाय सुरू करता येतात आणि यामुळे एकंदर स्त्री-शक्‍ती, स्त्री-संतुलन उत्तम राहताना दिसते. स्त्री-संतुलनाच्या दृष्टीने योगासने व संगीत हेही अतिशय प्रभावी उपचार होत. फुलपाखरू क्रिया, ‘संतुलन समर्पण क्रिया’, मार्जारासन, ‘संतुलन अमृत क्रिया’, अनुलोम-विलोम श्वसनक्रिया, नियमित चालायला जाणे, हे सर्व स्त्रीआरोग्य टिकून राहण्याच्या दृष्टीने उत्तम असतात. स्त्रीमधील संवेदनशील हार्मोनल संस्था आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध असतो. संगीताच्या माध्यमातून स्त्रीची मानसिकता प्रसन्न ठेवता आली तर त्यामुळे तिचे स्त्रीत्वही सुरक्षित, प्रतिष्ठित राहू शकते. त्यातही हे संगीत जर वैदिक संस्कृतीवर, शास्त्रोक्त रागदारीवर आधारलेले असेल, मंत्र, वाद्यांच्या साहाय्याने सुसंस्कृत बनविलेले असेल उदा. स्त्रीसंतुलन संगीत, तर त्याचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. 

एकंदर शरीरशक्‍ती कमी असली, प्रतिकारशक्‍ती कमी असली की मूत्रमार्गाच्या ठिकाणी वारंवार जंतुसंसर्ग होणे, अंगावरून पांढरे जाणे असे त्रास होऊ शकतात. यावर योग्य उपचार घेणे आवश्‍यक असतेच; पण जीवनशैलीमध्ये छोटे छोटे, योग्य ते बदल केले तर हे त्रास टाळता येणे शक्‍य असते. उदा. 

- पाळीच्या दिवसात शक्‍य तेवढी विश्रांती घेणे, अतिश्रम, अतिताण निश्‍चित टाळणे, मन-बुद्धी उत्तेजित होईल असे वाचन, दर्शन टाळणे.

- पाळीच्या चार दिवसांत स्वच्छतेच्या दृष्टीने जागरूक राहणे.

- एकंदर गर्भाशयादी अवयवांना रक्षण व पोषणाच्या दृष्टीने संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या औषधसिद्ध तेलाचा पिचू, संतुलन शक्‍ती धुपासारख्या औषधीद्रव्यांच्या मिश्रणाची धुरी वगैरे उपाय सुरू करणे. 

- स्त्रीसंतुलनासाठी संतुलन सुहृद तेलासारखे विशेष औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल स्तनांना लावणेही उत्तम असते. यामुळे स्तनांचे आरोग्य व सौंदर्य या दोन्ही गोष्टी नीट राहतात. 

स्त्री वा पुरुषाचे शरीराचे वय वाढत असताना त्याची परिपक्वता मात्र एका विशिष्ट वेळी येते. स्त्री-पुरुष संबंध आला नाही; पण चुकीच्या वयात मानसिक उत्तेजना मिळाली तरी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. स्त्री-पुरुषांच्या मिलनाचा, लग्नाचा, मुले होण्याचा एक विशिष्ट काळ असतो. म्हणून लहानपणी व तारुण्यात अनुशासन पाळणे खूप आवश्‍यक असते. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन चुकीच्या गोष्टी चुकीच्या वेळी करणे म्हणजे स्वातंत्र्य असे नसून, तसे केल्यास संपूर्ण शरीराला परिणाम भोगावे लागतात. 

स्त्रीसाठी गर्भारपण, बाळाचा जन्म या गोष्टी फार मोलाच्या असतात. गर्भारपणात स्त्रीविशिष्ट शरीरक्रियांमध्ये खूप बदल होत असतात. हे बदल सहजतेने व्हावेत व शरीरासाठी, आतल्या गर्भासाठी अनुकूल असावेत यासाठीही स्त्रीला काळजी घेणे भाग असते. म्हणूनच गर्भसंस्कार हा विषय आयुर्वेदाने अतिशय सविस्तरपणे समजावलेला आहे. गर्भधारणा होण्याअगोदरपासून ते बाळंतपणानंतर बाळ स्तनपान करत असेपर्यंत स्त्रीने तिच्या आहार-आचरणाबद्दल काय काय काळजी घ्यायला हवी, याविषयी आयुर्वेदाने जे काही सांगितले आहे, त्याचा अवलंब करण्याने स्त्रीसंतुलन तर साधले जातेच व भावी पिढीही सुदृढ निपजते. बऱ्याचदा गर्भारपण-बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये वजन वाढणे, उत्साह कमी होणे, केस गळणे, पाळी बिघडणे, थायरॉइड बिघडणे वगैरे त्रास होऊ लागतात. योग्य पद्धतीने गर्भसंस्कार केले असता हे त्रास टाळता येतात. 

स्त्रीच्या आयुष्यातले सर्वांत अवघड स्थित्यंतर म्हणजे रजोनिवृत्ती, अर्थात पाळी थांबणे. पित्तावस्थेतून वातावस्थेत जातानाची ही स्थिती बहुतेक स्त्रियांसाठी अवघड असते. कारण, स्त्रीविशिष्ट बदलांना वात-पित्तदोषांच्या असंतुलनाची जोड मिळालेली असते. यातूनच अचानक घाम येणे, एकाएकी गरम होणे, भोवळ येणे, डोके सुन्न होणे, घाबरण्यासारखे वाटणे, नको नको ते विचार डोक्‍यात येणे, सांधे-कंबर-पाठ दुखायला लागणे वगैरे त्रास सुरू होतात. अगोरदरपासूनच पाळीसंबंधी काळजीपूर्वक व्यवहार केला असला, गर्भाशयादी अवयवांना तेलाचा पिचू, धुरी वगैरेंच्या साहाय्याने निरोगी ठेवले असले तर रजोनिवृत्तीही सहजासहजी होऊ शकते. या कालात स्त्रीसंतुलनासाठी पंचकर्म व उत्तरबस्ती करून घेणे सर्वांत चांगले असते. यामुळे स्त्रीविशिष्ट अवयवांची जीवनशक्‍ती वाढते व वात-पित्तदोषांचे संतुलनही साधता येते.

अशा प्रकारे आरोग्यासाठी जागरूकता ठेवली तर त्यामागोमाग सौंदर्याचा आपसूकच लाभ होतो. तरीही त्वचा, डोळे, केस यांच्या सौंदर्यासाठी, आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आयुर्वेदातील मार्गदर्शन मोलाचे ठरते.

(क्रमशः)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Health and Beauty