खाद्यभ्रमंती : डोंबिवलीचे अप्पम... 

Appam
Appam

डोबिंवली हे शहर जसे पोळीभाजी केंद्रांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच अप्पमसाठीदेखील. डोंबिवलीमध्ये जाणं झाल्यावर अप्पम खाणं होतंच. घाई कितीही असो, वेळ कोणतीही असो अप्पम मिळेल का, हाच माझा पहिला प्रश्न असतो आणि कुठं मिळेल, हा दुसरा प्रश्न. केरळमध्ये जाऊन अप्पमचा आस्वाद घेण्यापूर्वी प्रथम डोंबिवलीतच मी राजेंद्र हुंजेबरोबर हा पदार्थ ट्राय केला प्रेमात पडलो. 

कर्नाटकाची खासीयत असलेले अप्पे आणि केरळचे वैशिष्ट्य असलेले अप्पम यात अनेक जणांची नामसाधर्म्यामुळं गल्लत होते. अप्पम म्हणजे डोशाच्या जवळ जाणारा आणि फक्त चटणीच्या सोबतीने दिलखूष करून टाकणारा पदार्थ. डोशासाठी पीठ करताना वापरली जाणारी उडीद डाळ यात नसते. त्याऐवजी खोवलेला ओला नारळ वापरला जातो. कधीकधी यिस्ट देखील. आता केरळमधील लोकप्रिय नाश्ता प्रकार डोंबिवलीत कसा सुरू झाला, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण लॉजिक लावायचं झाल्यास उत्तर सोपं आहे. डोंबिवलीत दक्षिण भारतीय लोकांची संख्या प्रचंड आहे. त्यातही केरळी लोक बहुसंख्य आहेत. केरळी मंडळींची संख्या इतकी प्रचंड आहे, की मागं एकदा ओणम् उत्सव साजरा करण्यासाठी केरळमधून सजविलेले दहा-बारा हत्ती आणण्यात आले होते. केरळहून हत्ती आणण्याच्या तुलनेत अप्पम रस्त्यावर विकणं फारच सोपं, नाही का? 

पूर्वी डोंबिवली स्टेशनबाहेर अन्नपूर्णा नावाचं एक रेस्तराँ होतं. ग्रामदेवतेला जो मान असतो, तोच मान अप्पमच्या बाबतीत अन्नपूर्णाला दिला जातो. तिथले अप्पम एकदम लाजवाब असायचे. तिथं जग्गूअण्णाच्या हातचे अप्पम खायला लोक लाईन लावायचे, असं खवय्ये सांगतात. त्यानंतर डोंबिवलीत अप्पम तयार करणारी रेस्तराँ, जॉइंट्स नि गाड्यांची लाटच आली. अनेक ठिकाणी अप्पम मिळू लागले. गणपती मंदिराबाहेरील महालक्ष्मी, स्टेशनजवळचं हॉटेल जयश्री, फडके रोडवरचं धनश्री स्नॅक्स बार, बालभवन जवळचं गणेश कोल्ड्रिंक आणि राजाजी पथावरचं प्रभू फूड जॉइंट ही अप्पमसाठी तुफान लोकप्रिय असलेली डोंबिवलीतील जॉइंट्स. मी राजेंद्रबरोबर गणेशच्या स्टॉलवर जाऊन अनेकदा अप्पमचा आस्वाद घेतलेला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अप्पम खाण्याइतकंच ते तयार होताना पाहणं हा देखील एक सोहळा असतो. गॅसच्या शेगडीवर कढया तापत असतात. अप्पम तयार करणारा त्यात पीठ टाकून ते पटापट हलवून आकार देत असतो. कागद किंवा कापडानं धरून पटापट कढई हलविण्याची प्रक्रिया पहायला मजा येते. पहिल्या कढईवर झाकण ठेवून मग पुढच्या कढईत अशीच प्रक्रिया राबविली जाते. 

शेवटच्या कढईमध्ये पीठ टाकेपर्यंत पहिल्या कढईतील अप्पम तयार झालेलं असतं. एकदा उलथन्यानं चेक करून खात्री करण्यात येते आणि मग डिशमध्ये सर्व्ह केलं जातं. शक्यतो अप्पमवरच चटणी टाकून दिली जाते. त्यासाठी वेगळी वाटी वगैरे देण्याची पद्धत पाहायला मिळत नाही. गप्पा मारता मारता अप्पम कधी गट्टम होतो कळतही नाही. पहिला अप्पम संपायला लागल्यानंतर वेळेत दुसरी ऑर्डर देणं ही देखील एक कला आहे. वेळेत ऑर्डर न दिल्यास थांबण्याशिवाय पर्याय नसतो. 

अप्पम आणि चटणी हेच जगातील सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. केरळमध्ये काही ठिकाणी अप्पमबरोबर कडला करी (हरभऱ्याची उसळ), सांबार किंवा डोशाची पातळ भाजी देखील उपलब्ध असते. पोटभर व्हावं म्हणून. पण दोन-तीन स्वादांच्या चटण्यांबरोबर अप्पमचा आस्वाद घेताना जी मजा येते ती काही औरच असते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com