esakal | खाद्यभ्रमंती : अमित उपहारगृहाची उपवासाची मिसळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Misal

खाद्यभ्रमंती : अमित उपहारगृहाची उपवासाची मिसळ!

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

उपवास म्हटलं, की पुण्यात खवय्यांची चंगळ असते. ‘प्रभा विश्रांतीगृह’मध्ये मिळणारी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे आणि उपवासाची बटाट्याची भाजी, ‘न्यू रिफ्रेशमेंट’ अर्थात, ‘बादशाही’त मिळणारे उपवासाची मिसळ, उपवासाचे घावन, उपवासाचे बटाटा वडे, पोटॅटो टोस्ट, साबुदाणा खिचडी वगैरे पदार्थ आणि गरमागरम साबुदाणा वडे मिळणाऱ्या असंख्य गाड्या... मध्यंतरी एका ठिकाणी उपवासाची इडली नि दाण्याची आमटी हे कॉम्बिनेशन देखील ट्राय केलेलं. आता तर जोशी-गोखलेंनी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाच्या पदार्थांचा बुफे प्लॅन केला आहे. आता उपवासाचा पिझ्झा, बर्गर आणि पेस्ट्री मार्केटमध्ये यायची राहिलीये. ती आली की भगवंत आपल्याला कोपरापासून दंडवत करायला मोकळा!!!

सगळ्या भाऊगर्दीत उपवासाच्या एका मिसळीनं मला अनेक वर्ष मोहिनी घातलीय. ती म्हणजे हिराबागेजवळ एका गाडीवर मिळणाऱ्या उपवासाच्या मिसळीनं. जवळपास २४ वर्षांपूर्वी अमित खिलारे यांनी हिराबागेजवळच्या खाऊगल्लीत गाडी सुरू केली आणि गाडीवर उपवासाची मिसळ. खाऊगल्ली स्थलांतरित झाल्यानंतर अमित यांनी जवळच एक गाळा घेतला नि तिथून उपवासाची मिसळ, खमंग सामोसा आणि मटकी पोहे हे पदार्थ विकू लागले. त्यांचा पत्ता एकदम सोपा. अभिनव महाविद्यालयाकडून स्वारगेटकडे जायला लागल्यानंतर उजव्या हाताला सर्वाधिक गर्दी जिथं असेल ते अमित उपहारगृह.

खमंग आणि स्वादिष्ट अशी साबुदाणा खिचडी, उपवासाची बटाट्याची स्मॅश केलेली भाजी, मध्यम स्वरूपात उकडलेल्या आख्ख्या दाण्यांची बऱ्यापैकी तिखट, झणझणीत आमटी, सोबत एकदम पातळ गोड चटणी (बहुधा दाण्याच्या बारीक कुटाची), वरून उपवासाचा बटाट्याचा गोड नि तिखट चिवडा, त्यावर थोडं दही आणि सर्वांत वर हवा असेल तर मिरचीचा ठेचा... हे मिश्रण कालवल्यानंतर एका वेगळ्याच भक्तीमार्गावरून आपली वाटचाल सुरू होते! मिसळीचे हे मिश्रण व्यवस्थित कालविल्यांतर पुन्हा एकदा तिखट आमटी नि गोड चटणी आपापल्या आवडीनं घेतल्यानंतर ती सरसरीत झालेली मिसळ खाणं हा एक वेगळाच अनुभव असतो.

एकीकडं तिखट आणि गोड चवींचं मिश्रण आणि दुसरीकडं साबुदाण्याच्या खिचडीबरोबर अधूनमधून दाताखाली येणारे उकडलेले दाणे, बटाटाच्या चिवडा आणि आधीच मऊ असलेली नि दाण्याच्या आमटीमुळं आणखी मऊ झालेली उपवासाची भाजी... हळूहळू एकजीव होण्याकडे जात असलेल्या मिसळीनं फक्त आपल्या जिभेवरच नाही, तर आपल्या मनावरही ताबा मिळवायला सुरुवात केलेली असते. हवी असेल, तर पुन्हा दाण्याची आमटी नि गोड चटणी घ्यावी किंवा आपल्या आनंदयात्रेची सांगता करावी.

सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अमित उपहारगृह सुरू असते. उपवास आषाढी एकादशीचा असो, अंगारकी असो, महाशिवरात्र किंवा दत्त जयंती, अथवा मंगळवार, गुरुवार नि शनिवार... अमित उपहारगृहामध्ये रोज हमखास मिळणारी उपवासाची मिसळ ट्राय करा आणि एका आगळ्यावेगळ्या अनुभूतीचे साक्षीदार व्हा. अमित तुमच्या मनावर चवीची अमिट छाप सोडल्याशिवाय राहणार नाही.

loading image