esakal | खाद्यभ्रमंती : मुंबईतील परळचं हॉटेल गिरीश I Food
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel Girish Thali

खाद्यभ्रमंती : मुंबईतील परळचं हॉटेल गिरीश

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

मुंबईमध्ये असताना चवीचं आणि खिशाचं गणित जुळेल, अशा फूड जॉइंट्सचा शोध अखंड सुरू असायचा. ‘साम मराठी’त असताना आणि दैनिक ‘सामना’मध्ये असतानाही. मुंबई म्हणजे परवडणाऱ्या स्वादिष्ट जॉइंट्सची खाण आहे. जितके शोधाल तितके अधिक आणि नवीन जॉइंट्स सापडत जातात. दोन-अडीच वर्ष असताना मुंबईत असताना ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली.

असंच एकदा परळ एस. टी. स्टँडच्या जवळ असलेल्या जयहिंदमध्ये पोहोचलो. पाहतो तर प्रचंड गर्दी. भूक तर मरणाची लागलेली. त्यामुळं तितका वेळ थांबणं अजिबात शक्य नव्हतं. मग आजूबाजूला काही आहे का, पाहू लागलो. तेव्हा फार दूर जावं नाही लागलं. समोरच हॉटेल गिरीश दिसलं. दिसायला छोटं. तामजामही फार नाही. अगदी छोटी सहा-आठ टेबल असतील. बसण्याची व्यवस्थाही अगदीच जेमतेम. फार ऐसपैस म्हणता येईल, अशी नाही.

बोर्ड पाहिल्यानंतर समजतं की, हे हॉटेल १९४५ पासून सुरू आहे. हॉटेल गिरीशचं वैशिष्ट्य म्हणजे मालवणी नि कोकणी स्वादाचे एक से बढकर एक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ. माशांना टिपिकल कोकणी चव आणि चिकन, मटणला कोल्हापुरी स्वाद. अर्थात, मी तिथं फक्त मत्स्याहाराचा स्वाद घेतला. चिकन नि मटणाच्या वाटेला कधी गेलो नाही. कारण मुंबईमध्ये गेल्यानंतर मासे न खाता चिकन आणि मटण खाणं मला कधी पटलंच नाही. तिथं गेलं तर मासेच खायचे. चिकन-मटण तर काय पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा नि विदर्भातही मिळतंच की. पण आजूबाजूला अनेक जण त्यावरही ताव मारताना दिसायचे. त्यामुळे ते पदार्थ देखील तितकंच स्वादिष्ट असणार हा आपला अंदाज...

टिपिकल कोकणी चवीचं ही एक ओळख आणि दुसरी ओळख म्हणजे अगदी सामान्यांच्या खिशालाही परवडेल, असं. पॉम्फ्रेट, सुरमई, हलवा, बोंबील, मांदेली, तिसऱ्या, खेकडा, कोळंबी आणि असं मच्छीचं वैविध्य. फ्राय, मसाला, कोळीवाडा आणि थाळी सर्व प्रकार अगदी तितकेच चमचमीत. पॉम्फ्रेट, सुरमई किंवा बांगडा थाळी आणि सोबत एक प्लेट मांदेली किंवा बोंबील फ्राय... दिलखूष होणार म्हणजे होणारच.

सोबतीला मटण आणि चिकन मसाला, सागोती, कोल्हापुरी, फ्राय, हंडी, भेजा घोटाळा, भेजा फ्राय, कलेजी फ्राय, मटण कॉकटेल, वजडी फ्राय राइस, तिसऱ्या फ्राय आणि कोळंबी बिर्याणी हे मी ट्राय न केलेलं पण अनेकांनी ट्राय केल्यानंतर आवर्जून मला सांगून कौतुक केलेले वैविध्यपूर्ण पदार्थ... फिश शिवाय इथं ट्राय केलेला एकमेव पदार्थ म्हणजे कोंबडी वडे. समोरच्या जयहिंदचं जे वैशिष्ट्य समजलं जातं ते कोंबडी वडे गिरीशमध्येही एकदम झक्कास मिळतात.

अस्सल मालवणी म्हटल्यावर सोलकढीही आलीच. माशांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर करीसोबत भात खाण्याऐवजी सोलकढीबरोबर भात खाणं हे स्वर्गसुख काही औरच. काही ठिकाणी सोलकढी ही असावी म्हणून असते. तिला ना चव व रंग. पण इथली सोलकढी कायम लक्षात राहील, अशीच. नारळाचं दूध नि कोकम आगळ यांच्यापासून तयार केलेली नि लसणाचा हलका स्वाद असलेली. सोलकढी घेतल्यानंतर जेवणाचा दर्जा आणि अनुभव एकदम वर जातो.

इतकं भरपेट जेवल्यानंतरही इथं बिलाचा आकडा इतर ठिकाणच्या शाकाहारी जेवणाच्या बिलापेक्षा अधिक होत नाही, हे गिरीशचं वैशिष्ट्य... हॉटेल फक्त नावाला. खरंतर ही एक खाणावळच आहे. अगदी साध्या, गरीब चाकरमान्याला परवडेल अशी खानावळ. त्यामुळंच सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ कधीही जा गिरीशमध्ये गर्दी ही असतेच. ती गर्दीच गिरीशच्या लोकप्रियतेची पावती आहे...

loading image
go to top