esakal | खाद्यभ्रमंती : सोलापूरची शेंगा भाजी...
sakal

बोलून बातमी शोधा

Shenga Bhaji

खाद्यभ्रमंती : सोलापूरची शेंगा भाजी...

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

सोलापूरची शेंगा चटणी आणि शेंगा पोळी हे दोन पदार्थ अनेकदा खाल्लेत. शेंगा चटणी हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे, पण कदाचित शेंगा पोळी तितकी नाही. मी ई-टीव्हीमध्ये असताना शेंगा पोळी पहिल्यांदा खाल्ली. आमचा रुममेट असलेल्या राजेंद्र हुंजेनं येणेगूरहून घरनं येताना एकदा शेंगाची पोळी आणली होती. शेंगादाण्याचं कूट नि गूळ यांच्या मिश्रणातून बनलेली गोड पोळी. कर्नाटकमध्ये शेंगा पोळी खूप लोकप्रिय आहे. कर्नाटकला लागून असलेल्या सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये शेंगा पोळी बरीच लोकप्रिय आहे.

तुलनेनं शेंगा भाजीचा आस्वाद खूप उशिरा घेतला. मध्यंतरी, म्हणजे या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अक्कलकोटहून परतताना आम्ही सोलापुरातील मुरारजी पेठेतील बी. जी. ठेंगील यांच्या हॉटेल अजिंक्यमध्ये जेवायला थांबलो. पुणे-सोलापूर रोडवरचं प्रसिद्ध हॉटेल निसर्ग देखील ठेंगील यांचंच. पत्रकार मित्र दिग्विजय जिरगेनं सुचविलं, त्याप्रमाणं आम्ही हॉटेल अजिंक्यमध्ये शेंगा भाजी मागविली. मला वाटलं, की शेंगा भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भाजी असेल. औरंगाबादला मिळते तशी. पण ही भाजी होती शेंगदाणा कुटाची! शेंगा चटणी, शेंगा पोळी तशी ही शेंगा भाजी. चवीला एकदम टेम्प्टिंग. आम्ही सांगितल्यामुळं फार झणझणीत नव्हती. शेंगा भाजी, शेवगा मसाला, व्हेज हंडी, शेंगा चटणी, घट्ट दही आणि भाकरी म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती. अजिंक्यनं आमचं मन जिंकून घेतलं होतं.

सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद आणि आजूबाजूच्या अनेक हॉटेलांमध्ये किंवा ढाब्यांवर शेंगाभाजी ही डिश आवर्जून मिळतेच मिळते. रेसिपी एकदम सोपी. अगदी घरातही सहज करता येईल अशीच. तरीही अनेक हॉटेल, रेस्तराँ किंवा ढाब्यांवर का मिळत नाही देव जाणे. फोडणी झाल्यानंतर कांदा, टोमॅटो किंवा प्युरी, आलं-लसूण पेस्ट आणि विविध मसाले टाकायचे. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. खमंग भाजून घेतल्यानंतर त्यात अगदी थोडं पाणी टाकायचं. आणि हे सगळं मिश्रण उकळी येईपर्यंत गरम करायचं. तेल, मसाला नि शेंगदाण्याचं कूट यामुळं भाजीमध्ये तेलाचा छान तवंग तयार होतो. एव्हाना शेंगदाण्याचं कूट शिजलेलं असतंच. झाली शेंगा भाजी तयार...

तिखट अर्थातच, आपापल्या चवीनुसार. पण दाण्याचं कूट असल्यामुळं तिखटाचा अंमल थोडा कमी होणार हे समजून हवं त्यापेक्षा थोडं अधिक तिखट टाकलं, तर बेत हमखास जमून येणार म्हणून समजा. सोबत भाकरी असेल तर

विचारूच नका...

कधी सोलापूर, उस्मानाबाद किंवा त्या पट्ट्यात जाणं झालं तर शेंगा भाजी आहे का, हे ढाब्यावर किंवा हॉटेलात आवर्जून विचारा. आणि असेल तर नक्की ऑर्डर करा. रेसिपी एकदम बेसिक असल्यानं फार इकडंतिकडं होण्याची शक्यता नाही. चांगली चव नक्की चाखायला मिळणार... आणि सोलापुरात हॉटेल अजिंक्य किंवा हायवेवर हॉटेल निसर्गला थांबलात तर मग शेंगा भाजी मागवाच....

loading image
go to top