खाद्यभ्रमंती : चेन्नईतील पुरणपोळी, ओबट्टू! | Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

obbattu
खाद्यभ्रमंती : चेन्नईतील पुरणपोळी, ओबट्टू!

खाद्यभ्रमंती : चेन्नईतील पुरणपोळी, ओबट्टू!

आम्ही मदुराई, रामेश्वरम् आणि चेन्नईला जाणार आहोत, हे समजल्यानंतर माझी अहमदाबादमध्ये असलेली मैत्रीण प्राजक्ता जोशी-सोमणचा मेसेज आला. ‘तू तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर शक्य झाल्यास ओबट्टू नक्की ट्राय कर.’ मदुराईत मिनाक्षी मंदिरामध्ये दर्शन नि पोंगलचा आस्वाद घेऊन झाला. नंतर रामेश्वरममध्ये २१ कुंडातील पाणी अंगावर घेत भगवान श्री शंकरांचं दर्शन आणि नंतर साप्पाडवर (तमिळ राईस प्लेट) यथेच्छ ताव मारून झाला.

शेवटी चेन्नईत पोहोचल्यानंतर फक्त आणि फक्त भटकंती नि थोडंसं शॉपिंग सुरू होतं. चेन्नईसाठी ‘रेड अलर्ट’ असला, तरीही आम्हाला पावसानं साथ दिली होती. आमचा दौरा संपत आला, तरीही ओबट्टू काही मिळेना. खरंतर त्याचा स्वतंत्रपणे शोधच घेतला नव्हता. अखेर शेवटच्या दिवशी माम्बळम स्टेशनजवळ असलेल्या टी. नगरमध्ये (त्यागराज नगर) खरेदी झाली आणि हॉटेलवर परतत असताना देविदास देशपांडे म्हणाला, ‘अरे हे बघ तुझं ओबट्टू...’

रस्त्यावर असलेल्या एका फूड जॉइंटच्या बाहेर एका स्टॉलवर तेंगाय पोळी, दाल पोळी आणि आलू पराठा असे तीन पदार्थ विकले जात होते. मैदा आणि बेसन एकत्र करून थोड्याशा सैलसर भिजविलेल्या पिठात वेगवेगळी सारणं भरून हातानंच एक जण त्याला गोल आकार देता होता. दक्षिणेत मिळणारे पराठे ज्या प्रकारे हातानं दाबून आणि फिरवून गोल करतात त्याच प्रमाणे तेंगाय पोळी, दाल पोळी आणि आलू पराठा देखील हातानीच तयार होता होता.

सैलसर पिठाच्या गोळ्यामध्ये तेंगाय पोळी, दाल पोळी आणि आलू पराठा यांचं सारण भरलं जायचं. मग त्याला छान पोळीसारखा गोल आकार दिला जायचा. हे करताना सारण बाहेर येणार नाही, याची काळजी घेतली जात होती. सारण भरून पोळीला छान गोल आकार दिला जात होता. त्यानंतर एकीकडं तापत ठेवलेल्या तव्यावर ती पोळी टाकली जात होती आणि नंतर थेट तुमच्या प्लेटमध्ये... चेन्नईतल्या एखाद्या रस्त्यावर तुम्हाला अशी गरमागरम पुरणपोळी खायला मिळत असेल, तर मग स्वर्गसुखच ना...आम्ही नुकतेच चहा पिऊन बाहेर आलो होतो. तरीही ओबट्टूचा आस्वाद घ्यायचं ठरविलं. सुरुवातीला तिघात एक तेंगाय पोळी म्हणजेच ओबट्टू घेतलं. यामध्ये गुळाचं पुरण आणि त्यामध्ये थोडं ओलं खोबर घालून त्यापासून सारण बनविलेलं होतं. गुळाचा खमंगपणा आणि ओल्या नारळाची चव यामुळं ही गरमागरम पोळी काहीच्या काही अफलातून लागत होती. नंतर दाळपोळी घेतली. पण तिथं थोडी निराशा झाली. एकतर साखरेचं पुरण होतं आणि ओलं खोबरं नव्हतं. त्यामुळं स्वाद जेमतेमच होता आणि खमंगपणा जवळपास नव्हताच. आलू पराठा घ्यायचा विषयच नव्हता.

मागं बेंगळुरूमध्ये गेलो असताना तिथं मल्लेश्वरम् भागात हल्लीमाने या फूड जॉइंट्सच्या साखळीत होळिगे नावाचा पदार्थ पाहिला होता. लोक ऑर्डरही करत होते. होळिगे म्हणजे आपली पुरणपोळीच. जशी आपल्याकडं मिळते तशीच. अर्थात, तेव्हा तिथं त्याचा आस्वाद घेतला नव्हता. पण चेन्नईमध्ये आवर्जून ओबट्टू ट्राय केलं. कारण त्यामध्ये ओलं खोबरं होतं. शिवाय ओबट्टूचा स्वाद नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा वेगळा आणि एकदम भारी होता.

अचानाकपणे झालेल्या फायद्याची अर्थात, ओबट्टूची चव जिभेवर रेंगाळत राहील, याची काळजी घेत आम्ही तिथून मार्गस्थ झालो...

loading image
go to top