खाद्यभ्रमंती : अमरावतीचा ‘गिला वडा’

आशिष चांदोरकर 
Thursday, 14 January 2021

कशाचाही विचार न करता अगदी बिनधास्तपणे उत्तम असा ‘गिला वडा’ कोठे मिळेल, हे विचारा आणि थेट त्या नाश्ता सेंटरवर जाऊन धडका. तुमची सकाळ आणि पूर्ण दिवस एकदम झकास जाणार... 

अमरावतीत आहात आणि सकाळचा नाश्ता काय करायचाय, अशा विचारात असल्यास जास्त शोधाशोध आणि विचारपूस करत बसू नका. कशाचाही विचार न करता अगदी बिनधास्तपणे उत्तम असा ‘गिला वडा’ कोठे मिळेल, हे विचारा आणि थेट त्या नाश्ता सेंटरवर जाऊन धडका. तुमची सकाळ आणि पूर्ण दिवस एकदम झकास जाणार... 

अमरावतीत सकाळच्या नाश्त्याला मिळणारा. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित असलेला पदार्थ म्हणजे ‘गिला वडा’. हा वडा म्हणजे उडीद वड्याचा भाऊच. पण तयार करण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत थोडी वेगळी. इतका मस्त पदार्थ असूनही अमरावतीबाहेर या पदार्थाचे मार्केटिंग कसे नाही झाले, ही आश्चर्याची गोष्ट आहे. मागे काही कामानिमित्ताने अमरावतीत गेलो होतो. अनेक ठिकाणी सामोसा, कचोरी आणि डाळवड्याचे स्टॉल्स लागले होते. पण मला हे पदार्थ सकाळच्या नाश्त्याला खाण्यात अजिबात रस नव्हता. मग ‘साम मराठी’तील जुना सहकारी असलेल्या संजय पाखोडेला फोन केला. ‘संजय, मला अमरावतीची काय स्पेशालिटी मिळेल नाश्त्याला,’ असं विचारलं. क्षणाचाही विचार न करता संजयनं मला ‘गिला वडा’ असं उत्तर देऊन टाकलं. कोणत्या भागात मिळेल, याचीही पूर्ण माहिती दिली. 

हेही वाचा : उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम 

संजयने सांगितलेल्या अमरावतीतील एका प्रसिद्ध चौकात मी पोहोचलो. तिथे नाश्ता देणाऱ्या तीन-चार गाड्या आणि काही दुकाने होती. सर्वाधिक गर्दी असलेल्या ‘श्री दुग्ध मंदिर’ या स्टॉलवर जाऊन धडकलो. सामोसे, कचोरी, भजी नि डाळवडा या पर्यायांकडे साफ दुर्लक्ष करून ‘गिला वडा’ मागितला. त्या दिवशी गिला वड्याचा आस्वाद घेतला आणि कायमचा प्रेमात पडलो. 

असा बनतो गिला वडा 
मेदू वडा बनवितात तशाच पद्धतीने उडीद डाळीपासून गिला वडा तयार करतात. मात्र, हा वडा अखंड असतो. मध्ये छेद नसतो. हे वडे तळून झाल्यानंतर साधारण तीन ते चार तास वडे पाण्यात सोडून ठेवतात. कदाचित त्यातील तेल निघून जावे आणि वडे अधिक हलके व्हावे, हा उद्देश असावा. तीन-चार तासांनंतर एकदम हलका झालेला वडा काहीसा ओलसर होतो आणि गिला वडा म्हणून परातींमध्ये विराजमान होतो. तांदळाच्या रव्यापासून तयार केलेली इडली जशी एकदम हलकी, असते तसाच हा गिला वडा एकदम हलका असतो. प्रत्येक घासागणिक वड्यातील पाण्याचा अंश जाणवत असतो. तिखट, आंबट आणि गोड अशा चटण्या टाकून गिला वडा सर्व्ह करतात. पाण्यामुळे ओलसर झालेला वडा आणि तीन वेगवेगळ्या स्वादांच्या चटण्या यामुळे वडा एकदम स्वादिष्ट आणि झक्कास लागतो. 

पूर्वीच्या काळी रेल्वेतून गहू, तांदूळ किंवा सिमेंटची पोती उतरवून घेणाऱ्या माथाडी कामगारांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी गिला वडा हा पदार्थ अस्तित्वात आला. उडीद डाळीचा वापर असल्यामुळे शरीरासाठी एकदम पौष्टिक. करायला नि खायला सोपा आणि किमतीलाही कमी. त्यामुळे दोन-चार गिले वडे रिचवून कामावर पुन्हा रूजू व्हायचे. आता टोपलीतला तो गिला वडा हॉटेलमध्ये स्थानापन्न होऊन खवय्यांच्या पसंतीस उतरतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati Special Gila Wada