
महाराष्ट्र ते जपान मोदक
मोदक फक्त महाराष्ट्र किंवा गुजरातचे नाहीत बरं का? दक्षिण भारतातही गणपतीला मोदकाचाच नैवेद्य दाखवला जातो. कन्नडमध्ये मोदकाला मोधका म्हणतात, तर तमीळमध्ये मोधकम किंवा कोझाक्कट्टाई म्हटलं जातं. तेलुगूमध्येही कुडूमू नावाचा पदार्थ मोदकच आहे. हे झालं भारतातलं; पण जपानमध्ये मोदक लोकप्रिय आहे हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मोदकाला जपानमध्ये कॅनगिडन म्हणतात. तिथल्या खाद्य संस्कृतीतही मोदक एक मिठाई म्हणून लोकप्रिय आहे.
मोमोज् आणि मोदक. शब्दांची सुरुवात सारखीच. दोन्ही पदार्थ तयार करण्याची पद्धत सारखीच. फक्त पदार्थांच्या आतलं स्टफिंग मात्र वेगवेगळं. पण दोन्ही पदार्थ अनेक आशिया खंडात अनेक देशांमध्ये आवडीनं खाल्ले जातात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
खाद्य पदार्थांचा प्रवास हा एक रंजक विषय आहे. चहा भारतात इंग्रजांनी आणला, की तो भारतात आधीपासून आला? भारतीय खाद्य संस्कृतीला जिलबीची ओळख मुघलांनी करून दिली, की आणखी कोणी? बिर्याणी नेमकी कुणाची? असे खाद्य पदार्थांविषयीचे अनेक विषय उत्सुकता वाढवणारे आहेत. त्यात मोमोज आणि मोदकाचं कनेक्शन कायमच चर्चेत असतं. ग्लोबलायझेशनंतर भारताला काही नव्या पदार्थांची ओळख झाली. मॅकडोनाल्ड्सची रेस्टॉरंट्स भारतात खुली झाली आणि बर्गरची ओळख झाली. पिझ्झाही भारतीयांना त्यानंतरच माहिती झाला. (पिझ्झा आणि पराठा हा विषय पुन्हा कधीतरी लिहू) तसंच मोमोजचं मोमोज् सध्या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये पाहायला मिळतात. ईशान्य भारतातील तरुण-तरुणी शिक्षण-कामाच्या निमित्तानं बाहेर पडली तसं तिथल्या खाद्य पदार्थांची ओळख मेट्रो सिटीजना झाली. अर्थात, ग्लोबलायझेशननंतर विस्तारत गेलेल्या नोकरी-शिक्षणाच्या संधी त्याला कारणीभूत ठरल्या.
मोदकाचा उल्लेख आपल्या पौराणिक कथांमध्ये अर्थात गणपतीचं आवडतं खाद्य म्हणून केला जातो. तर मोमोजचा इतिहास हा चीनच्या उत्तरेपासून सुरू होतो. अर्थात, मोमोज या शब्दाचा उल्लेख कुठं आलाय, यावरून मोमोजचा इतिहास सांगितला जातो. मोमोज् सध्या मंगोलिया, चीन, तिबेट, नेपाळ आणि पुण्यातल्या चौकाचौकांत मिळतात. प्रत्येक देशात त्याला वेगळं नाव आहे. चीनमध्ये शानशी, नेपाळमध्ये मम म्हटलं जातं. चीन, मंगोलियामध्ये मोमोजमध्ये मांस असायचं. पण तिबेटमधून व्हेजिटेरियन मोमोजचा जगभर प्रसार झाला. मोमोज आणि मोदक या दोन्ही पदार्थांचं कनेक्शन काही असेल का? खरं सांगायचं झालं तर या दोन्ही पदार्थांच्या कनेक्शनचे पुरावे मिळत नाही. पण खवय्यांनी त्याचा विचार कशाला करायचा. स्वस्त आणि मस्त असे मोमोज तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा.