ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : चायनीज पुरणपोळी खाल्लीय का कधी? जाणून घ्या रेसिपी

मधुरा पेठे
Friday, 1 January 2021

अनेक नवीन देशविदेशी पदार्थ कसे तयार करायचे, हे सांगणारी मालिका या सदरात असेल. अनेक नावीन्यपूर्ण आणि फारसे माहीत नसलेले पदार्थ किंवा काही फ्युजन, ट्रेंडी पदार्थांची माहिती आणि रेसिपीज या सदरात वाचायला मिळतील.

अनेक नवीन देशविदेशी पदार्थ कसे तयार करायचे, हे सांगणारी मालिका या सदरात असेल. अनेक नावीन्यपूर्ण आणि फारसे माहीत नसलेले पदार्थ किंवा काही फ्युजन, ट्रेंडी पदार्थांची माहिती आणि रेसिपीज या सदरात वाचायला मिळतील. 

पुरणपोळी तसा अस्सल दख्खनी पदार्थ. दख्खन घाटावर प्रामुख्याने तयार होणारा; परंतु त्याच्या जवळपास जाणारे किंवा साधर्म्य असणारे असे काही पदार्थ जगात इतरत्रसुद्धा होतात. जसे पानिपताच्या लढाईत पकडून नेलेल्या आणि आता पाकिस्तानमध्ये असलेल्या मराठी सैनिकांच्या आजच्या पिढीतले लोक अजूनही पुरणपोळीसारखा पदार्थ त्यांच्या लग्नसमारंभात करतात. मध्ये इतकी वर्षे सरली, भौगोलिक परिस्थितीमुळे स्वरूपात बदल झाला; पण पुरणपोळी आजही त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तसाच अजून एक पदार्थ आशियामधल्या अनेक देशांत तयार होतो. जिथेजिथे चायनीज वसाहती तयार झाल्या तिथे त्यांच्यासोबत त्यांचे खास पदार्थही प्रचलित झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चायनीज सणांना तयार करण्यात येणारे मूनकेक फार प्रसिद्ध आहेत. सणांच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छांसोबत हे मूनकेक द्यायची पद्धत आहे. त्यातही एका मूनकेकने माझे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे होपीआ डाईस. हे होपीआ म्हणजे चौकोनी आकाराची पुरणपोळी. वरचे आवरण साधारण लाडूसारखे भुसभुशीत आणि आत मऊ मुगाचे पुरण. त्यात पांडान म्हणून एक सुगंधित पान मिळते. त्याचा गंध साधारण नारळ आणि व्हॅनिला एकत्र केल्यावर यावा तसा असतो. तर या मुगाच्या पुरणात पांडानचा इसेन्स आणि खोबर असते. तोंडात टाकताक्षणी विरघळणारी ही चायनीज पुरणपोळी थायलंड, फिलिपाइन्स, मलेशिया अशा अनेक आशियाई देशांत लोकल कॉफी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. मला हा पदार्थ आवडतो; कारण लाडूसारखाच टिकाऊ आहे. सोबत आकार चौकोनी असल्याने प्रवासात न्यायलासुद्धा छान आहे. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तुम्हालाही ही चायनीज पुरणपोळी बनवता येईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटक - १ कप मूग डाळ, १/२ कप कंडेन्स्ड मिल्क, ४ टेबलस्पून साखर, १/२ कप कोकोनट पावडर, १ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टेबलस्पून कोकोनट इसेन्स, ४ थेंब पिवळा रंग. वर असलेल्या  पारीकरता : एक-दीड कप  मैदा, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टेबलस्पून खायचा सोडा, अर्धा कप तूप/बटर, १ टेबलस्पून तेल, ४ टेबलस्पून पिठीसाखर, भिजवण्यासाठी पाणी.

कृती - मूग डाळ कुकरमध्ये अगदी कमी पाण्यात शिजवून घ्या. शिजवलेली मूग डाळ चाळणीवर उपसून थंड होऊ द्या. डाळ मिक्सरवर वाटून घ्या आणि शिजवण्यासाठी जड बुडाच्या पातेल्यात ठेवा. त्यात कंडेन्स्ड मिल्क, साखर, कोकोनट पावडर घालून नीट मिक्स करा आणि पुरण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात बटर, इसेन्स घालून मिक्स करा आणि थंड होऊ द्या.

वरील पारीकरता दिलेले सर्व कोरडे जिन्नस एकत्र करा आणि गरजेपुरते पाणी घेऊन घट्ट कणिक मळून घ्या. हे कणिक किमान २ तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवा. दोन तासांनंतर कणिक पुन्हा नीट मळून घ्या. पुरणाचा लिंबाएवढा गोळा घ्या आणि त्याच्या अर्धा पारीचा गोळा घ्या. पुरणपोळीमध्ये जसे पुरण भरतो, त्याप्रमाणे पुरण भरून घ्या आणि त्याला चौकोनी आकार द्या. असे सर्व तयार करून झाले, की तव्यावर मंद आचेवर सर्व बाजूने भाजून घ्या.
(लेखिका ‘खादाड खाऊ’ या ग्रुपच्या संस्थापक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Madhura Pethe on Chinese Puranpoli