ग्लॅम-फूड : ‘स्थानिक पदार्थ आवर्जून खाते’ | Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashi singh
ग्लॅम-फूड : ‘स्थानिक पदार्थ आवर्जून खाते’

ग्लॅम-फूड : ‘स्थानिक पदार्थ आवर्जून खाते’

- आशी सिंग

मला अनेक पदार्थ आवडतात. मी अशा पदार्थांची यादीच बनवू शकते. त्यापैकी एक आहे ‘सोया चाप.’ ते दिल्लीत बरेच प्रसिद्ध आहेत. दिल्लीहून कोणी येत असेल, तर त्यांना मी ते घेऊन यायला सांगते. एकदा मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी दिल्लीला गेले होते आणि तिथे एकच दिवस असणार होते. मी अख्खा दिवस खाल्ले नाही; कारण हे चाप फक्त संध्याकाळीच मिळतात. लग्न झाल्यानंतर आम्ही रात्री उशिरा चाप शोधत होतो. अखेर रात्री दोन वाजता आम्हाला चाप मिळतील अशी जागा सापडली. मग मी तिथून पार्सल घेतले आणि माझ्या हॉटेलवर जाऊन खाल्ले. मला हा पदार्थ खूपच आवडतो. मला ‘मलाई चाप’ फार आवडतात.

मी जिथे कुठे जाईन तिथले मूळचे पदार्थ खायला मला आवडतात. मी राजस्थानला जाते, तेव्हा तिथे ‘चोखी धाणी’ म्हणून एक जागा आहे, तिथे नक्कीच जाते. मला भारतीय पद्धतीचे पदार्थ आवडतात. त्यांचा स्वाद खूपच छान असतो. खरेतर मला स्वयंपाक अजिबात आवडत नाही. मी जगात काहीही करू शकते; पण स्वयंपाक नाही. मी रोटी, पुरी, पराठे वगैरे बनवू शकते; पण मी कधी भाजी वगैरे बनवलेली नाही. मला ते करायला आवडत नाही.

स्वयंपाक करायची आवड नसल्याने माझ्याकडून अनेकदा पदार्थ फसले आहेत. म्हणजे करायला गेले एक अन् झाले दुसरेच. मी एकदा पोहे बनवायचा प्रयत्न करत होते आणि ते जळाले आणि मग ते खाणे अशक्य होते. मी एकदा हलवा बनवण्याचाही प्रयत्न केला होता आणि तो हेल्दी बनावा म्हणून साखरेच्या जागी त्यात गूळ टाकला. तो थोडा वेगळा लागत होता; पण खायला ठीक होता. मला तसे सर्वच पदार्थ आवडतात. मी खात नाही असे काहीही नाहीये; पण मला भोपळी मिरची आणि टिंडे तेवढे आवडत नाहीत. सध्या मी झी टीव्हीवर ‘मीत’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेच्या चित्रीकरणात ब्रेक मिळाला, की आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असतो.

मला आईने बनवलेले सगळेच पदार्थ आवडतात. कुठल्याही रेस्टॉरंटच्या तुलनेत तिने बनवलेला स्वयंपाकच मला आवडतो. हल्ली ती माझ्यासाठी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते. कारण, मी मोठी फूडी आहे. ती खूप छान सॅलड्‌स आणि सॅन्डविचेस बनवते आणि मला ते खूप आवडतात. त्यांचा आस्वाद मी मनसोक्तपणे घेत असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top