खाद्यभ्रमंती : लासलगावची लालाजी भेळ

Bhel
Bhel

आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले लासलगांव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे तिथली एकदम चटकदार भेळ. लासलगांवमध्ये गेल्यानंतर अनेक भेळवाल्यांची दुकाने आणि पाट्या दिसून येतील, पण तुम्हाला तीन पिढ्यांपासून तीच चव आणि तोच दर्जा असलेली भेळ खायची असल्यास विंचूर रोडवर मुख्य बाजारपेठेत असलेल्या लालाजी भेळवाल्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. मागे कामासाठी लासलगांवला जाणे झाले होते. तेव्हा मित्र योगेश बिडवईच्या आग्रहावरून आवर्जून लालाजी भेळला भेट दिली होती. 

नरेंद्र आणि जितेंद्र ही लालाजींची तिसरी पिढी सध्या या व्यवसायात आहे. बन्सीलाल परदेशी यांनी साधारण १९५०मध्ये सर्वप्रथम भेळेचे दुकान थाटले. बन्सीलाल यांच्या नावावरून तिचे नाव लालाजी भेळ असे पडले. लालाजींनंतर मुलगा उत्तम आणि आता नातू या व्यवसायाचा गाडा ओढत आहेत. आता व्याप प्रचंड वाढला असून, लासलगांवच्या जोडीला नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, संगमनेर, सिन्नर, नांदगाव आणि परिसरातील अनेक गावांमध्ये लालाजी भेळ पोहोचली आहे. लोकांच्या जिभेवर कधीच ताबा मिळविला आहे.

लासलगाव जवळपासच्या पट्ट्यात भेळ म्हणजे शेव, चिवडा आणि डाळ-मसूर. (अनेक ठिकाणी त्याला डाळमूठही म्हणतात.) आपण जी भेळ खातो त्याला चाळीसगाव आणि परिसरात भेळभत्ता म्हणतात. पण भेळ म्हणजे फक्त शेव, चिवडा आणि डाळ-मसूर इतकेच. गाठी, पापडी किंवा फरसाणमधील प्रकार इथे आढळत नाहीत. पदार्थ मोजकेच पण चव लाखमोलाची. शेवेत ओव्याचा स्वाद जाणवण्याइतका असतो. ‘हरभरा डाळीमुळे वाताचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आवर्जून ओवा टाकतोच,’ असे नरेंद्र परदेशी सांगतात. शेवेला साथ असते ती घरचे स्पेशल मसाले वापरून थोडाशा तिखट अशा भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची आणि डाळ-मसूरची. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भेळ म्हणजेच शेव, चिवडा आणि डाळ-मसूर यांच्यात बारीक चिरलेला कांदा नि कोथिंबीर घालून मस्त एकत्र करायचे. वरून लिंबू पिळायचे आणि उकडलेल्या मिरच्यांसोबत सर्व्ह करायचे. भेळेतील चिवडाच इतका स्वादिष्ट आणि चटकदार असतो, की मुद्दामहून वेगळे तिखट टाकायची गरज पडत नाही. एकदा का भेळेचा पहिला घास खाल्ला, की विषयच मिटला. तोंड असे खवळते, की सगळी भेळ संपविल्यानंतरच आपण थांबतो. काहींना अगदी कमी तिखट स्वरुपात भेळ खायची असते. मग ती मंडळी मुरमुरे टाकून भेळभत्ता ऑर्डर करतात. भेळेच्या तुलनेत भेळभत्त्याच्या ऑर्डर्स तशा कमीच. पण मुरमुरे टाकून भेळभत्ता देतात तेव्हाही त्यात चिंचगुळाचे पाणी टाकले जात नाही. फक्त कांदा, कोथिंबीर आणि उकडलेल्या मिरचीच्या जोरावरच भेळभत्ता बाजी मारून नेतो. भेळेप्रमाणेच लालाजींचा स्पेशल चिवडाही विशेष लोकप्रिय आहे. लालाजींकडे आता गुळाचा वापर करून तयार केलेली गोडी शेव देखील भरपूर लोकप्रिय आहे. 

कधी लासलगावला गेलात किंवा नगर, नाशिक आणि औरंगाबादमध्ये ‘लालाजी भेळ’चे दुकान नजरेस पडले तर बाकी सगळी कामे बाजूला ठेवा आणि पहिली लालाजींची भेळ खरेदी करा. कारण ही भेळ फक्त शेव, चिवडा आणि डाळ-मसूर यांच्यापासून तयार झालेली नाही तर सत्तर वर्षांचा अनुभव, सातत्यपूर्ण चव आणि तडजोड न करता राखलेला दर्जा यांचे अस्तित्व घासा-घासाला जाणवणारे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com