esakal | हेल्दी राहायचेय, रोजच्या आहारात करा या चटण्यांचा समावेश| Chutney Benefits For Body
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्दी राहायचेय, रोजच्या आहारात करा या चटण्यांचा समावेश

हेल्दी राहायचेय, रोजच्या आहारात करा या चटण्यांचा समावेश

sakal_logo
By
भक्ती सोमण-गोखले

रोजच्या आहारात पोळी भाजी खाताना डाव्या बाजूला काहीतरी लागतच. मग ते लोणचं, मिरची ठेचा असो किंवा चटण्या. डाव्या बाजूचे पदार्थ दिसायला जरी कमी दिसत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात. आता चटण्यांचे बघा ना. आपण फारतर एक ते दोन मोठे चमचे चटणी खातो. पण ती करताना त्यात सामाविष्ट असलेल्या घटकांमुळे आपल्या आरोग्यालाही फायदा होतो. जवस, डाळं, कडीपत्ता, टॉमेटो, शेंगदाणे हे मूळ पदार्थ शरीरावर योग्य परिणाम करत असतात. अँण्टिऑक्सिडण्टस शरीरासाठी महत्वाचे असतात. थोड्याश्या चटणीतून हे घटक अतिशय उत्तम प्रकारे आपल्या शरीराला मिळतात. आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक असणाऱया या चटण्यांचा म्हणूनच रोजच्या आहारात समावेश करायला हवा,

जवसाची चटणी-

हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी जवसाचा खूप उपयोग होतो. लघवी करताना दाह होत असेल तर तो कमी करण्यासाठी जवसाचा उपयोग होतो. जवसाचे तेलही गुणकारी असते. या जवसाची चटणी करताना जवस चांगले भाजून घेत ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. दुसऱ्या कढईत गरम तेलात आवडीप्रमाणे सुकं खोबरं, लाल मिरच्या, कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. हे मिश्रण मीठ आणि आव़़श्यकेप्रमाणे लसूण घालून मिक्सरमध्चे फिरवून घ्यायचं. आता हे आणि जवसाचं मिश्रण मिक्स करायचं. एका मोठ्या वाटीच्या जवसाची केलेली चटणी 15 दिवस टिकते.

फुटाण्यांची चटणी-

फोलेट, मँगनिज, लोह हे घटक फुटाण्यांमध्ये असतात. हे खाल्याने शरीराला एनर्जी मिळते. फुटाण्यांची चटणी करताना फुटाणे थोडेसे भाजायचे आणि मिक्सरमधून काढायचे. थोड्याश्या तेलात आवडीप्रमाणे लाल मिरच्या, सुकं खोबरं, कडीपत्ता चांगला परतून घ्यायचा. गार झाल्यावर ही पावडर, फुटाणे पावडर, मीठ, साखर, आमचूर पावडर एकत्र करून घ्यायची.

हिरव्या टोमॅटोची चटणी-

हिरवे टोमॅटो खाल्ल्याने फायबर मिळते. या टॉमेटोची चटणी करताना तेलात नेहमीसारखी फोडणी करून त्यात मिरची आणि हिरवे टॉमेटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवायचे. मउ झाल्यावर भाजलेल्या तिळाचे कूट, मीठ आणि गुळ घालून एकत्र करणे. 4 ते 7 हिरव्या टॉमेटोंची केलेली चटणी आठवडाभर राहते.

हेही वाचा: नवरात्रउत्सहात उपवासाला ट्राय करा घरी बनवलेले केळी चिप्स

दोडक्याच्या शिरांची चटणी-

रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी दोडक्याचा खूप उपयोग होतो. खोकला, कफ झाला असेल तर दोडका खावा असं म्हणतात. वजन वाढविण्यासाठीही हा दोडका उपयोगी ठरतो. ही दोडक्याची भाजी करताना त्याच्या शिरा सोलतात. या शिरा वाळवायच्या. चांगल्या वाळल्यावर तेलात तीळ, डाळं, मीठ आणि या शिरा घालून कुरकरीत परतून घ्यायच्या. गारं झाल्यावर त्यात साखर दाण्याचं कुट घातलं की झाली चटणी तयार.

लसणीची चटणी-

लसूण खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. नियमित लसूण खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. एक वाटी लसूण घेऊन त्यात सुकं खोबरं, आवडीप्रमाणे तिखट -मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

शेंगदाणा चटणी

शेंगदाणे अंशपोटी खाल्यास गॅस आणि पित्ताच्या समस्या दूर होतात. फायबर असल्याने आरोग्याला फायदा होता. शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यात लसूण,लाल तिखट, साखर, जीरं मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

loading image
go to top