
दादरच्या मराठमोळ्या खाऊगल्लीत तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज यापैकी वाटेल ते पदार्थ मिळतील. श्रीकृष्ण वडापाव, सामंतांची लस्सी, भरली तंदूर मसाला वांगी, झुणका-भाकर, मछली, जिताडा, कोळंबी पुलाव, उकडीचे मोदक, कान्हवली, अळूवड्या, साबुदाणा वडे, पॅटीस, ज्यूस, लिंबू-लसूण पाणीपुरी... बस्स पोट भरून जाते.
विंडो शॉपिंग असो की भटकंती किंवा एखाद्या सणानिमित्त दुकानात खरेदीसाठी सहज फेरफटका मारायचा असो, मुंबईतला प्रत्येक जण काही ना काही कारणानिमित्त दादरमध्ये येतोच. मराठी सिनेमांचे प्लाझा थेटर, सावरकर स्मारक- वनिता समाज आदी सांस्कृतिक कट्टे, कामगार चळवळींचे कोतवाल उद्यान, छबिलदास गल्लीतील शॉपिंग, शिवाजी पार्क किंवा दादर चौपाटीवर भटकंती झाली की पोटपूजेसाठी कोणत्याही वेळी दादरमध्ये अनेक चवदार ऑप्शन आहेत.
दादर स्थानकातून बाहेर पडल्यावर छबिलदास गल्लीत पोहोचल्यावर बटाटे वड्याचा खमंग वास दरवळू लागतो. आले घालून केलेले गरमागरम बटाटे वडे आणि सोबतची मिरची यासाठी गेली कित्येक वर्षे प्रसिद्ध असलेले श्रीकृष्ण बटाटे वडे खाण्यासाठी येथे लोकांची रांग लागते. त्याचबरोबर मिळणारे अळूवड्या, साबुदाणे वडे, पट्टी सामोसा आणि खोबऱ्याची चटणी हे पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
तिथूनच पुढे असलेल्या जम्बो किंग वडापाव दुकानात मिळणारे शेजवान वडापाव, चीज ग्रील वडापाव या फ्यूजनवरही खवय्ये यथेच्छ ताव मारतात. त्यानंतर सामंत यांची घट्ट आणि सुमधुर लस्सी जरूर प्यायलाच हवी. इथे लस्सी घेतल्यावर मन अगदी तृप्त होते. आजकाल चहाचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. थकलेल्या आणि सुस्त झालेल्या शरीराला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक जण चहाचे ठेले शोधत असतात. येवल्याच्या चहानंतर प्रेमाचा चहा या नव्याने झालेल्या दुकानात चहाची तलफ भागविण्यासाठी ग्राहक येतो आणि पुन्हा ताजातवाना होऊन आपल्या कामासाठी पुढे निघून जातो. चहापासून अनेक खाद्यपदार्थानी थाटलेली दादरमधील दुकानें पाहिली की कुठे आणि काय खायचे हे विचार करूनच ग्राहक बुचकळ्यात पडतो.
अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण?
भरपेट जेवायचे असेल तर इथल्या प्रत्येक वैविध्यपूर्ण अशा डिशची चव चाखायला पावले आपसूकच वळतात ते "मछली' या हॉटेलमध्ये. हे मासेप्रेमींसाठी पर्वणीचे ठिकाण आहे. नुसते नाव जरी वाचले तरी डोळ्यासमोर विविध प्रकारचे मासे येतात. प्लाझा सिनेमाजवळील वीर कोतवाल गार्डन समोरच्या गल्लीत काही अंतरावर मछली हॉटेल आहे. "पंचम थाळी 'या हॉटेलची फेमस थाळी आहे. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन मच्छी थाळी ऑर्डर केल्यावर तुम्हाला सुरमई पापलेट किंवा बोंबील यापैकी कोणताही एक मासा फ्राय आणि एक करी दिली जाते.
मछलीमध्ये मात्र एकाच थाळीत पाच प्रकारचे मासे, मच्छीकरी, भाकरी आणि सोलकडी याचा अनोखा आस्वाद या पंचम थाळीत घेता येतो, असे मछली हॉटेलचे मालक मनोज मंत्री आणि कुणाल मंत्री सांगतात. आगरी-कोळी, भंडारी, पाचकळशी-वाडवळ अशा विविध पद्धतीने बनविलेले मसाले वापरून करण्यात आलेले मासे चवीला अफलातून लागतात. याव्यतिरिक्त काळीमिरी, हळद, धणे आणि ग्रीन मसाले वापरून दही टाकून बनविलेले थिक ग्रेव्हीचे चिकन चटपटा व कढीपत्ता, राई, आले, मिरची वापरून केलेले चिकन लपेटा याचा खमंग वास सुटला की आपला मनावरचा ताबा सुटू लागतो.
एरव्ही अलिबाग रायगडमध्ये मिळणारा टेस्टी जिताडा मासा तिकडे प्रसिद्ध असल्याने अनेक जण तो खाण्यासाठी तिकडे जातात. मात्र आता "मछली'मध्ये जिताडा फ्राय मासा मिळत असल्याने खवय्यांची इच्छा इथेच पूर्ण होते. कोळंबी पुलाव, खेपसा राईस, प्रॉन्ज खेपसा यादेखील इथल्या राईसमधील प्रसिद्ध डिश आहेत.
Video : 'चिकन पोपटी' खायचंय? मग हॉटेल कांजीला भेट द्याच!
तिथून थोडे पुढे गेल्यावर रानडे रोडवर झुणका-भाकरीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री स्वामी समर्थ दुकानात झुणका-भाकरी खाण्यासाठी लोकांची रीघ लागलेली दिसून येते. इथली खास डिश म्हणजे तंदूर वांगी. वांग्याचे साल काढून शेगडीवर चांगले शेकवून त्यात मसाला कांदा टोमॅटो याचे मिश्रण भरून केलेली डिश फारच रुचकर लागते. ही डिश खाण्यासाठी लोकांची फरमाईश असते, असे श्री स्वामी समर्थ गृहउद्योगचे अश्विनी श्रियान यांनी सांगितले.
व्हेज कुर्मा, भाजी, पनीर मटारसोबत ज्वारी-तांदूळ किंवा नाचणीची भाकरी खाण्यासाठी; तसेच पार्सल घेऊन जाण्यासाठी ग्राहक येतच असतात. दररोज वेगवेगळ्या भाज्या जेवणात मिळत असल्याने प्रत्येक भाजीची चव ग्राहकांना चाखायला मिळते. शिवाय गरमागरम तवा पुलाव, मसाले भात, मसाला पुलाव समोर दिसल्यावर नक्की काय खावे असा प्रश्न ग्राहकांना पडतो. त्याखेरीज मिक्स भाज्या वापरून बनविलेले व्हेज कटलेट, मटार पॅटीस, मका पॅटीस, थालीपीठ यांची भुरळ खवय्यांना पडल्याखेरीज राहत नाही. उपवासाच्या दिवशी मिळणारे सुमधुर उकडीचे मोदक, साजूक तुपातील कान्हवले याची लज्जत चाखायला एकदा तरी इकडे यायला हवे.
रानडे रोडवर दिसणारी सॅन्डविच, पिझाची दुकाने टप्प्या-टप्प्यावर दिसतात; मात्र प्रत्येकाचे मसाले वेगळे, बनविण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे या खाऊ गल्लीत पेटपूजा करण्यासाठी येणारा ग्राहक इथे आल्यावर हरवून जातो. पाणीपुरी खवय्यांकरिता तर एका आगळ्यावेगळ्या पाणीपुरीची टेस्ट चाखायला मिळते. लसूण, पुदीना, लिंबू अशा वेगवेगळ्या पाणीपुरीची चव घेण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते.