esakal | डोसे, भेळ सगळं आवडीचे : वरुण धवन
sakal

बोलून बातमी शोधा

food

डोसे, भेळ सगळं आवडीचे : वरुण धवन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

व्यायाम आणि आहाराबाबत अतिशय काळजी घेणारा वरुण धवन ‘फूडी’ आहे. त्याला इटालियन फूड आवडतं आणि त्यातही पिझ्झा म्हणजे लई भारी. तो कुठल्याही प्रकारचा पिझ्झा खाऊ शकतो. प्रत्यक्ष जीवनात मस्तीखोर, एनर्जेटिक असलेल्या वरुणला पदार्थही तसेच टेस्टी, मसालेदार आवडतात. रस्त्यावर मिळणारी पाणीपुरी, भेळ यांच्यापासून ते चीज केकपर्यंत त्याची आवडत्या पदार्थांची प्लेट मोठी आहे. मिश्टी दोई या पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध मिठाईचा तर तो चाहता आहे. आणि हो, पावभाजी हा तर त्याचा ‘वीक पॉइंट’ आहे. ‘कूली नंबर वन’च्या प्रमोशनच्या वेळी तर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष यांना कोणती डिश खिलवायला आवडेल असा प्रश्न विचारला असता, ‘पावभाजी’ असं उत्तर देऊन त्यानं धमाल उडवून दिली होती.

मुंबईतलं शिवसागर हे वरुणचं आवडतं रेस्टॉरंट आहे. त्याला अधूनमधून स्वयंपाकघरात प्रयोग करायलाही आवडतात. शिकायला घराबाहेर असताना त्यानं खूप पदार्थ करून बघितले होते आणि मित्र-मैत्रिणींनाही खिलवले होते. आता तेवढा वेळ मिळत नसला, तरी लॉकडाउनमध्ये त्यानं काही पदार्थ केले आणि त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवरही टाकले होते.

वरुण ‘फूडी’ असला, तरी काही गोष्टींचा त्यागही करायला लागतो. वरुण डाएटमध्ये ‘इंटरमिटंट फास्टिंग’ हा प्रकार अवलंबतो. या पद्धतीत विशिष्ट वेळेत अन्न खायचं आणि नंतर चौदा-पंधरा तास काही खायचं नाही, असं करावं लागतं. अर्थात हे रोज नसतं तर डाएटिशियन सल्ला देतात तेव्हा वरुण करतो. खाण्यामध्ये ‘घर का खाना’ला पर्याय नाही असं वरुण मानतो. त्याला त्याच्या आईनं केलेले सगळेच पदार्थ आवडतात.

रात्रीचं जेवण शक्य तितकं कमीत कमी ठेवण्यानं खूप उपयोग होतो, हे त्याचं तत्त्व आहे. आहारात प्रोटिन्स जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी हे तत्त्व तो गेली अनेक वर्षं पाळतो आहे. भूक लागेल, तेव्हा मखाणे खाणं ही गोष्ट त्याला आवडतं. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं; पण खूप कॅलरीज पोटात जात नाहीत असं तो सांगतो. पपई, केळ किंवा प्रोटिन स्मूदी या गोष्टीसुद्धा त्याला अशा वेळी आवडतात.

loading image
go to top