ग्लॅम-फूड : ‘डाएटबाबत कधीही तडजोड करत नाही’ | Drashti Dhami | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drashti dhami
ग्लॅम-फूड : ‘डाएटबाबत कधीही तडजोड करत नाही’

ग्लॅम-फूड : ‘डाएटबाबत कधीही तडजोड करत नाही’

- दृष्टी धामी

अभिनेत्री दृष्टी धामी खाण्यावर प्रेम करत असली, तरी ग्लॅमरच्या विश्वात असल्यामुळे डाएटबाबत अतिशय काटेकोर आहे. काय वाटेल ते झालं, तरी त्याबाबत ती अजिबात तडजोड करत नाही. फक्त डाएटच नव्हे, तर सगळ्यांनी आपल्या जेवणाच्या, ब्रेकफास्टच्याही वेळा ठरवून घेतल्या पाहिजेत आणि या वेळा पाळल्याच पाहिजेत, असं ती म्हणते. फिटनेसचा आहाराशी थेट संबंध असतो, असं ती सांगते.

ती रोज ब्रेकफास्ट आठ वाजता करते आणि रात्रीचे जेवणही साडेसात किंवा आठच्या आधी झालेच पाहिजे, याकडे तिचा कटाक्ष असतो. डाएटचं तिनं इतकं मनावर घेतलं आहे, की ‘चीट मील’ म्हणूनसुद्धा मॅडम मॅगीपेक्षा फार कशाचा विचार करत नाहीत. अर्थात आईस्क्रीम मात्र तिला बेहद्द आवडतं आणि तिचं आवडतं आईस्क्रीम आहे बस्किन रॉबिन्सचं मिंट चोको-चिप फ्लेवर आईस्क्रीम.

तिची सकाळ ग्रीन टीनं होते. गोड आणि साखर असलेले पदार्थ ती शक्यतो टाळते. मात्र, भाज्यांची स्मूदी किंवा फळांचा ताजा ज्यूस तिला आवडतो. ब्रेकफास्ट ही तिच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात इडली, पोहे, उपमा, ढोकळा असे साधे पदार्थ तिला चालतात. बहुतेक सगळे गुजराती पदार्थ ती आवडीनं खाते. मात्र, त्यांच्यात तळलेले किंवा तेलकट पदार्थ ती टाळते. दोन-तीन वेळा भरपूर खाण्यापेक्षा दर दोन तासांनी थोडंथोडं खाण्यावर तिचा भर असतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन आणि फॅट या तिन्ही घटकांचं मिश्रण योग्य असलं, तर शरीराचं संतुलन आपोआप राखलं जातं, असं तिचं म्हणणं.

दृष्टीला स्वयंपाक करायला आवडतो; पण ‘घरातले सगळेच डाएटवर असल्यानं माझा नाइलाज होतो,’ असं ती गंमतीनं सांगते. लॉकडाऊनच्या काळात तिनं स्वयंपाकघरात बरेच प्रयोग केले. त्यात तिनं केलेली पालक खिचडी उत्तम झाली होती, असं सर्टिफिकेट तिच्या पतीनंही दिलं. त्याचे फोटो आणि रेसिपीही दृष्टीनं इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

loading image
go to top