
पोळीला म्हटलं बलून ब्रेड, इटालियन फूड चॅनलला भारतीयांनी झापलं!
गव्हाच्या पोळीला भारतीय जेवणात विशेष स्थान. पापुद्रा सुटलेली गरम गरम पोळी खाण्यात किती सुख असतं ते वेगळं सांगायला नको. आजी, आईच्या हातची पोळी खाल्लेले पोळीप्रेमी बाहेरगावी गेले की मउसुत पोळीची त्यांना खूप आठवण येते. अशा या पोळीशी सर्वांंच्याच भावना अगदी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. परदेशात ज्याप्रमाणे ब्रेड खाण्याचे प्रमाण जास्त आहे, तसेच भारतात पोळीचे आहे. त्यामुळे पोळीला कोणी जर ब्रेड म्हटले तर साहजिकच लोकांच्या भावना दुखावल्या जाणार. तसेच झाले, आणि भारतीय ट्विटरकरांनी प्रचंड ट्रोल केले.
एका इटालियन फूड चॅनलवर काही दिवसांपूर्वी पोळी कशी करायची ते दाखवण्यात आले. त्यात त्यांनी पोळीला बलून ब्रेड म्हटले. त्यामुळे आपल्या पोळीला अशाप्रकारे संबोधल्याने भारतीय नेटझिन्सनी त्या पोस्टवर कमेंट करत या प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली तसेच काही जोक्सही केले. कुकिस्ट या फूड चॅनलवर दाखविण्यात आलेल्या पोळीच्या व्हिडिओत पीठ, कोमट पाणी, कोमट दूध, तेल आणि ड्राय यीस्ट पासून केला जाणारा पदार्थ असल्याचे म्हणत त्यांनी पोळीचे दोन फोटो दाखवले आहेत. त्यात पोळी फुगताना दिसते आहे. परदेशात पोळी म्हणजेच ब्रेड. त्यामुळे फुगलेला भाजलेला ब्रेड अशा अर्थाने ती कमेंट केली असावी. ही पोळी कश्याप्रकारे करायची तेही दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
नेटिझनन्सनी अशी उडवली खिल्ली
वॉव मी स्पीचलेस आहे.
मी लहानपणापासून बलून ब्रेड खातो मला माहितीच नव्हते.
एकाने भाताचा फोटो टाकून त्याला स्नो ग्रेन्स अशी ओळ दिली. तुपालाही वेगळे नाव देण्यात आले आहे.