खाद्यभ्रमंती ; नीरेतील मटकी भेळ

सारे पदार्थ मस्त मिक्स केल्यानंतर त्यावर मस्त लिंबू मारून मटकी चिवडा भेळ एका कागदामध्ये आपल्यासमोर पेश करतात.
खाद्यभ्रमंती ; नीरेतील मटकी भेळ

कर्वेनगरमध्ये श्रीमान सोसायटीजवळच्या विशाल मटकी चिवडा भेळच्या गाडीवर मध्यंतरी गेलो होतो. डीपी रस्त्याकडून आपण विठ्ठल मंदिराकडे वळलो आणि आयसीआयसीआय बँकेकडे जायला लागलो, की उजवी हाताल्या विशाल मटकी चिवडा भेळची गाडी दिसते. फक्त संध्याकाळीच ही गाडी तिथं असते, हे वेगळं सांगायला नको. गेली जवळपास दोन दशके ही गाडी तिथं आहे. नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा हे त्या गाडीवर असतात.

कुरकुरीत चिवडा, बारीक शेव, उकडलेली मटकी, थोडा कांदा आणि आवडीनुसार मिरचीचा ठेचा... हे सारे पदार्थ मस्त मिक्स केल्यानंतर त्यावर मस्त लिंबू मारून मटकी चिवडा भेळ एका कागदामध्ये आपल्यासमोर पेश करतात. इथली मटकी भेळ इतकी स्वादिष्ट आहे की, व्यवस्थित भूक असेल आणि लवकर जेवायचं नसल्यास एक जण दोन भेळ नक्की संपवितो. दोघांमध्ये तीन भेळ हे तर अगदीच हमखास.

परवा ‘विशाल’कडं भेळ खाल्ल्यानंतर अनेक ठिकाणची मटकी भेळ डोळ्यासमोर आली. पर्वती पायथ्याजवळ असलेल्या ‘समाधान’कडं अनेकदा मटकी भेळ खाल्ली आहे. अजूनही समाधानकडून पार्सल आणून घरी भेळ खाणं होतं. मागं एकदा आमचा मित्र सुधीर म्हस्केच्या डाळिंब गावात गेलो होतो, तेव्हा तिथं गावठाणात जिल्हा परिषद शाळेजवळ एक छोटं दुकान आहे. तिथं मटकी रस्सा भेळ मिळते. म्हणजे शेव-फरसाण आणि मुरमुरे, कांदा-कोथिंबीर लिंबू आणि मटकी. उकडलेली मटकी सुकी नसते, तर मटकीचा गरमागरम रस्सा भेळेमध्ये टाकला जातो. गरम भेळ म्हणून ती आपल्याला देतात. अशी गरमागरम मटकी भेळ नगर रोडवर सुद्धा अनेक ठिकाणी मिळते. पण मटकी भेळ म्हटल्यावर मला आठवते ती नीरा गावात मी आणि विजय गायकवाडनं खाल्लेली मटकी भेळ. नीरेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भेळ मिळते.

अनेक जण गुजराती भवनला भेळभत्ता खाण्यासाठी आवर्जून जातात. नीरा रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपासून थोडं पुढे गेलं, की पोलिस स्टेशनसमोर हॉटेल प्रसन्न आहे. तिथं सांबार भेळ हा नवा प्रकार मिळू लागलाय, पण आम्ही एका छोट्या गाडीवर भेळ मटकी भेळ खाल्ली होती. नीरा गावातून आपण नगर-पंढरपूर रोडवर नीरा नदीवरील पुलाच्या अलीकडे एक हातगाडी लागते. आता नेमकं नाव आठवत नाही, पण गाडी प्रसिद्ध असावी, कारण बरेच जण तिथं मटकी भेळ खाण्यासाठी आवर्जून आलेले. (भेळेचा फोटो अर्थातच, काढून ठेवलेला पण गाडीचा फोटो काढायचं नेमकं राहून गेलं.

शेव-चिवडा, मुरमुरे, कांद्याची पात, कांदा, मिरचीचा ठेचा आणि लिंबाचा रस...पातीचा कांदा हे वेगळेपण. फक्त कांदा नाहीतर पात देखील भेळमध्ये घालतात. त्यामुळं थोडी वेगळी पण भन्नाट चव भेळेला मिळाली होती. झणझणीत भेळेचा पहिला घास खाल्ल्यानंतर त्याची इतकी चटक लागते की, भेळ कधी संपते ते कळत देखील नाही. बरं मिळणाऱ्या भेळेचं प्रमाण इतकं अधिक आहे, की एक भेळ दोघांना भरपूर होते. दुसरी घ्यावी का, हा विचार देखील मनात येत नाही. ती भेळ इतकी भन्नाट झाली होती की, रात्री जेजुरीमध्ये जेवण होईपर्यंत फक्त भेळेची चव तोंडावर होती.भेळेमध्ये कांदापातीप्रमाणे कधीतरी लसणाची पात देखील ट्राय करून पाहायला हरकत नाही, असं एक आपलं उगाच माझ्या मनात येऊन गेलं. लसणाची हलकी चव भेळेची रंगत आणखी वाढविणार हे नक्की. परवा ‘विशाल’मध्ये मटकी चिवडा भेळ खाल्ल्यामुळं पुन्हा एकदा मनानं नीरेमध्ये जाऊन आलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com