esakal | महाराष्ट्र-गोवा बॉर्डर बंद; सिंधुदुर्गात येण्याऱ्या प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी बंधनकारक

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र-गोवा बॉर्डर बंद; सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी बंधनकारक
महाराष्ट्र-गोवा बॉर्डर बंद; सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी बंधनकारक
sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, आज सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमा बांदा-सटमटवाडी येथे महसूल पोलिस प्रशासनाकडून सील करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. चाचणी नंतरच प्रवेश देण्यात येत आहे.

राज्य शासनाने गोव्यासह इतर सहा राज्ये ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्याजवळ सीमा आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. याठिकाणी महसूल, पोलिस व आरोग्य विभागाचे पथक तैनात असून तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी अनेक चोरवाटा असल्याने पोलिसांनी या वाटांवरही लक्ष ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे चोरट्या वाटेने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशेषता सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील हजारो तरुण-तरुणी नोकरीसाठी दररोज गोव्यात ये-जा करतात. या तरुणांना अँटिजेन टेस्ट केल्यानंतर दहा दिवस प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.