हेल्दी रेसिपी : बाजरीचे ठोंबरे

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 8 December 2020

पारंपारिक पद्धतीत बाजरी भाताप्रमाणे किंवा खिचडीप्रमाणे शिजवून दूध, ताक किंवा कढीसोबत खाल्ली जाते. आपण या पारंपारिक रेसिपीमध्ये थोडा बदल करून बाजीरीच्या ठोंबऱ्याला या सुगीतील रंगीबेरंगी भाज्यांसोबत बनविणार आहोत.

‘‘त्या-त्या ऋतूतील सर्व रंगांच्या भाज्या व फळे खायला हवीत,’’ आई नेहमी म्हणायची. हे केवळ सांगणे नसून, या माध्यमातून आरोग्याचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळत पोचवणे होते. नकळत यासाठी म्हणते, कारण आजच्या इतकी पदार्थातील प्रत्येक घटकांची माहिती (व्हिटॅमिन्स वगैरे) हे जुन्या पिढीतील लोकांना माहीत नसले, तरी त्यांची उपयुक्तता ते जाणून होते. 

आज सूर्यकिरण व रंगांच्या उपचार पद्धतीविषयी काही गोष्टी वाचनात आल्यावर कळले, की काही उपचारपद्धतींत रंगदेखील उपयुक्त असू शकतात. आणि आपल्या पारंपारिक खाद्यसंस्कृतीत तर आधीपासूनच चवीसोबत रंग, आकार यांनाही महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाय हिवाळा अशी रंगसंगती, चव व पौष्टिकता घडवून आणण्यास अगदी सर्वोत्तम काळ आहे, असे मला वाटते. 

हिवाळ्यात आवर्जून खाल्ला जाणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाजरी. आपल्याकडे बाजरीपासून भाकरी, खारवड्या, सांडगे, उंडे, कापण्या, फळं, ठोंबरा, खिचडी असे अनेक पदार्थ बनविले जातात. गावाकडे संध्याकाळच्या वेळी शेकोटी, खारवड्या, गुळ व शेंगदाणे, असा कार्यक्रम ठरलेला असतो. मला आठवते, मी हिवाळ्यातच प्रवास करीत होते. एका गावातील एक आजी निखाऱ्यावर भाजलेले ज्वारीचे धापोडे, खारवड्या आणि भाजलेले शेंगदाणे बांधून देत म्हणाल्या होत्या, ‘‘थंडीत जरा बरं असतंय. कुठं शेकोटी मिळाली तर ऊबेला बसून खा.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

थंडीत बाजरी शरीराला ऊब देतेच, शिवाय कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. बाजारीमुळे हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते. याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही बाजरी उपयुक्त आहे. ‘बाजरीचा ठोंबरा’ हा थंडीमध्ये, सणासुदीला आवर्जून केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. शिवाय बाळंतिणीला भरपूर दूध येण्यासाठी पूर्वीच्या काळी बाजरीचा ठोंबरा खाण्यास दिला जात असे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पारंपारिक पद्धतीत बाजरी भाताप्रमाणे किंवा खिचडीप्रमाणे शिजवून दूध, ताक किंवा कढीसोबत खाल्ली जाते. आपण या पारंपारिक रेसिपीमध्ये थोडा बदल करून बाजीरीच्या ठोंबऱ्याला या सुगीतील रंगीबेरंगी भाज्यांसोबत बनविणार आहोत. 

साहित्य – धुवून-सुकवून भरडलेली बाजरी, गाजर, मटार, मुळा, (किंवा आवडीच्या भाज्या), मीठ, हळद, धने पूड. 

फोडणी – तेल, जिरे, हिंग, कडीपत्ता, मिरची, चेचलेले आले. 

कृती – १. बाजरी चांगली मऊ शिजवून घेणे. 

२. फोडणी करून भाज्या घालून परतवून व वाफेवर साधारण वाफवून घेणे. 

३. हळद, धने पूड घालून परतणे व शिजलेली बाजरी, पाणी, मीठ घालून २-३ मिनिटे शिजवणे. 

४. ठोंबरा कढीसोबत खाण्यास तयार. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy recipe bajari thombare