हेल्दी रेसिपी : चटपटीत, हेल्दी 'कडबोळी'

शिल्पा परांडेकर
Tuesday, 9 June 2020

महाराष्ट्रातील काही ठिकाणी ‘कर्नाटकी बेंदूर’ साजरा झाला. कोल्हापूर, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावे. तसेच कर्नाटकात ‘कर्नाटकी बेंदूर’ साजरा करतात आणि बाकी ठिकाणी ‘महाराष्ट्रीय बेंदूर व ‘पोळा’ साजरा होतो. आषाढ-श्रावण महिन्यात साजरे होणारे हे तिन्ही सण वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या तिथीला साजरे होत असले, तरी या सणांमागची संकल्पना आणि भावना एकच.

महाराष्ट्रातील काही ठिकाणी ‘कर्नाटकी बेंदूर’ साजरा झाला. कोल्हापूर, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावे. तसेच कर्नाटकात ‘कर्नाटकी बेंदूर’ साजरा करतात आणि बाकी ठिकाणी ‘महाराष्ट्रीय बेंदूर व ‘पोळा’ साजरा होतो. आषाढ-श्रावण महिन्यात साजरे होणारे हे तिन्ही सण वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या तिथीला साजरे होत असले, तरी या सणांमागची संकल्पना आणि भावना एकच. आपल्याला वर्षभर मदत करणाऱ्या व ज्याच्या कष्टामुळे आपण चार घास सुखाचे खाऊ शकतो, ते आपले शेतीतील मित्र व सहकारी ‘सर्जा आणि राजा’ अर्थात ‘बैलां’ना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणे, ही त्यामागची संकल्पना व भावना.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या दिवशी या सर्जा-राजाला सजविले जाते, त्यांची थाटामाटात गावातून मिरवणूक काढली जाते. सुवासिनी त्यांना ओवाळतात, पुरणपोळी खाऊ घालतात. पण, आता गावांची शहरे झाली तशी घरोघरी मातीच्या बैलांची पूजा होऊ लागली. 

या दिवशी कोल्हापूर भागात या बैलांच्या शिंगांमध्ये चकलीसारखे वेटोळे असणाऱ्या ‘कडबोळ्या’ अडकविल्या जातात, तर सांगली भागात बेंदराला ‘कापण्या’ केल्या जातात. 
पारंपरिक कापण्या किंवा कडबोळी हे पदार्थ बनविण्यासाठी कणीक व थोडे डाळीचे पीठ गुळाच्या पाण्यात भिजवून नंतर पिठाच्या गोळ्यांना विशिष्ट आकार देऊन ते तळले जातात. आज आपण पारंपरिक गोड ‘कडबोळी’ला देणार आहोत एक ‘हेल्दी’ आणि चटपटीत ट्विस्ट. अर्थात, बाहेरच्या तळलेल्या वडा-भजीपेक्षा हे घरी तळलेले पारंपरिक पदार्थ प्रमाणात खाल्ल्यास नक्कीच हानिकारक नाहीत. तूर्तास, चटपटीत कडबोळी खाऊयात.

साहित्य - मिश्र पिठे - गहू, डाळ, बाजरी, नाचणी, ज्वारी, कुळीथ किंवा (उपलब्ध असतील ती), मेथीची पाने, मिरची-लसूण-आलं वाटण, धने-जिरेपूड, हळद, मीठ.

फोडणी - जिरेमोहरी, पांढरे तीळ, कडीपत्ता, चाट मसाला, लाल तिखट.
सजावट - कोथिंबीर व ओले खोबरे.

कृती -

  • पिठे व सर्व साहित्य एकत्रित मळून घेणे व काही मिनिटे बाजूला ठेवणे.
  • नंतर छोटा गोळा घेऊन लांब वळणे व चकलीप्रमाणे आकार देऊन कडबोळी तयार करणे.
  • सर्व कडबोळ्या मोदकाप्रमाणे चाळणीत ठेवून वाफविणे.
  • थंड झाल्यावर फोडणी करून सर्व कडबोळ्या फोडणीत परतवणे.
  • कोथिंबीर व खोबऱ्याने सजवून आवडत्या चटणीसोबत खाणे.

टीप : मेथीऐवजी कोणत्याही आवडत्या भाज्या घालता येतील. वाफवलेल्या कडबोळ्या फोडणी न करता तशाच खाता येतील. पावसातून भिजून आल्यानंतर गरमागरम, चटपटीत कडबोळी जिभेला नक्की आनंद देईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipe on Kadboli by Shila Parandekar