हेल्दी रेसिपी : उडदाचं घुटं

शिल्पा परांडेकर
Tuesday, 11 February 2020

उडदाचे पापड, सांडगे, वडे, वडी, आरण, वरण, कढण, डांगर, लाडू असे अनेक पदार्थ ऐकले असतील किंवा चाखलेही असतील.

माषसूपोऽथ कुल्माषः स्निग्धो वृष्योऽनिलापहः|
उष्णः संतर्पणो बल्यः सुस्वाद्‌रुचिकारकः|| 
(क्षेमकुतूहलम्, विक्रमसंवत् १६०५. सुदशास्त्र)

अर्थ : उडदाची डाळ ही स्निग्ध, उष्ण गुणाची, धातुवर्धक, तृप्तीकारक, वातनाशक, बलवर्धक, स्वादिष्ट व रुचकर असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उडीद प्राचीन काळापासूनच भारतीय खाद्यपरंपरेतील एक मुख्य आहार राहिला आहे. बाराव्या शतकातील राजा सोमेश्वरलिखित ‘मानसोल्लास’ या ग्रंथांतदेखील उडदापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांचा उल्लेख आहे. माझ्या महाराष्ट्राच्या खाद्यभ्रमंतीतही अनेक भागांत ‘उडीद’ हे पारंपरिक पीक असल्याचे आढळले. साठवणीचे, तोंडी लावणीचे, कालवणाचे, गोड, असे उडदापासून अनेक पदार्थ महाराष्ट्रात बनविले जातात.

आपल्याकडे आजही आजारपणात उडदाचे वरण खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, वजन कमी करायचे असेल त्यांनी ‘उडदाच्या कढणा’चा आहारात जरूर समावेश करावा आणि वजन वाढवायचे आहे त्यांनी ‘उडदाचे लाडू’ खावेत, असा प्रेमळ सल्ला मला एका गावात मिळाला होता. पूर्वी धान्याच्या किंवा कडधान्याच्या साली, धान्य दळल्यानंतर उरणाऱ्या कळण्याचाही वापर स्वयंपाकात होत असे. उडदाचे पापड तर आपण नेहमीच खातो. एका गावात पापडाची एक जुनी पाककृती मिळाली. ती नक्कीच क्लिष्ट होती. परंतु, उडदाच्या सालींचाही वापर पापड बनविण्यासाठी व्हायचा, ही गोष्ट अवाक्‌ करणारी होती. कोणत्याही ‘परदेशी युनिव्हर्सिटी’च्या ‘संशोधना’शिवाय समृद्ध असलेली जुनी, पौष्टिक, सात्त्विक व सकस अशी आपली खाद्यपरंपरा या ‘झटपट’च्या जमान्यात कुठेतरी नामशेष होताना पाहून वाईट वाटते. परंतु, किमान अशा काही सोप्या, पारंपरिक पौष्टिक पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून आपण हा वारसा जपावा, असे वाटते. उडदाचे पापड, सांडगे, वडे, वडी, आरण, वरण, कढण, डांगर, लाडू असे अनेक पदार्थ ऐकले असतील किंवा चाखलेही असतील. आज चाखणार आहोत सातारा जिल्ह्यातील उडदाचा एक खास पदार्थ :

उडदाचं घुटं
साहित्य : सालीची उडदाची डाळ, हिंग, हळद, लसूण, मिरची, जिरे वाटण किंवा खर्डा, मीठ, फोडणी तेल, जिरे, मोहरी.

कृती : 
डाळ थोडी भाजून घेणे.
चिमूटभर हिंग व हळद घालून आधणात शिजवून घेणे.
जिरे-मोहरीची फोडणी करणे व वाटण घालून परतणे.
डाळ घोटून फोडणीत घालावी व चांगली उकळून घ्यावी.
भाकरी किंवा भातासोबत खावी.
(अर्थ : आधण - गरम पाण्यात एखादा जिन्नस शिजवणे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipe Udiddal