
ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचे विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा भाज्यांचा आस्वाद घेता यावा, त्यातून चव आणि पौष्टिक आहार अशा दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.
ऋषिपंचमी म्हणजे भाद्रपदपंचमी रविवारी (ता. २३) आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचे विशेष महत्व आहे. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा भाज्यांचा आस्वाद घेता यावा, त्यातून चव आणि पौष्टिक आहार अशा दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो. अनेक फळभाज्या असलेल्या ऋषीच्या भाजीचा विशेष बेत जाणून घ्या.
साहित्य : आळूची पाने देठासह, लाल माठ, सुरण, लाल भोपळा, पावट्याचे दाणे, कच्ची केळी, मक्याची कणसे, चवळीच्या शेंगा, बटाटा, दोडका, हिरवी मिरची, ओले खोबरे, तेल, गूळ, मीठ, चिंचेचा कोळ.
कृती : आळूची पाने बारीक चिरावी. देठांची साले काढून तुकडे करावेत. तसेच लाल माठही चिरून घ्यावा. देठ सोलून तुकडे करावेत. बटाटे सोलून मोठ्या फोडी कराव्यात. सुरण कच्च्या केळीच्या व लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी कराव्यात. चवळीच्या शेंगांचे तुकडे करून घ्यावे. मक्याच्या कणसाचे चार तुकडे करून वाफवून घ्यावे. हिरवी मिरची व ओले खोबरे एकत्र वाटून घ्यावे. पातेल्यात तेल गरम करून त्यात आळू व लाल माठ शिजत ठेवावा. नंतर त्यात इतर सगळ्या भाज्या व पाणी घालून शिजवत ठेवावे. मग त्यात वाटलेले खोबरे व मिरचीचे वाटण व एक ग्लास पाणी टाकावे. त्यात चिंचेचा कोळ, गूळ व मीठ टाकून शिजवत ठेवावे. अर्धा तास ही भाजी झाकण ठेवून शिजवत ठेवल्यानंतर सगळ्या भाज्या शिजल्या, की वाफवलेले मक्याचे तुकडे टाकावे व एक वाफ काढावी. मस्त भाजी तयार होते. ही भाजी फळभाज्या अधिक असल्याने उत्तम बळ देणारी, पचायला हलकी, वातनाशक, रक्त वाढवणारी, चव आणणारी असून, पालेभाज्या या काळात खाऊ नयेत. पण त्यांची उणीव भरून काढणारी आहे. एकमेकांच्या घरी दिली जाणारी ही भाजी असून, त्यातून प्रेम व आस्था वाढवणारी आहे.