esakal | ग्लॅम-फूड : ‘माझ्याकडून एकही पदार्थ बिघडला नाही’ I Mrunmayee Deshpande
sakal

बोलून बातमी शोधा

Mrunmayee Deshpande

ग्लॅम-फूड : ‘माझ्याकडून एकही पदार्थ बिघडला नाही’

sakal_logo
By
मृण्मयी देशपांडे

मला भेळ, पाणीपुरी हे खूप आवडतात. पुण्यात खूप ठिकाणी ते उत्तम मिळतात. जिथं कुठं पाणीपुरीची टपरी मिळेल वा भेळ मिळेल, तिथं मी हमखास खाते. ते खरंतर माझं जेवणच आहे. कित्येकदा या गोष्टींमुळे माझ्या घरात भांडणं होतात. ‘तू हे काय करतेस?’, ‘तू हे काय खातेस?’ अशी मला बोलणी बसतात; पण पाणीपुरी आणि भेळ खाऊन मी जगू शकते. त्यामुळे माझ्या सेटवर कायमच मला एक भेळ आणि पाणीपुरी हमखास दिली जाते. 

विविध प्रवासांमध्येही मला खाण्याविषयी चांगले अनुभव आले. एक प्रसंग आठवतोय, सुबोध भावे आणि मी आमच्या प्रमोशनसाठी की एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरला जात होतो. त्या वेळी तो मला स्पेशली एक मिसळ खायला घेऊन गेला. ती इतकी तिखट होती, की मी सांगूच शकत नाही. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.  मला बेळगावकडचा कुंदा खूप आवडतो. मला महाराष्ट्रीयन सर्व पदार्थ करायला आवडतात. आमटी माझी विशेष लाडकी आहे.

माझ्याकडून आतापर्यंत एकही पदार्थ बिघडला नाही. कारण ज्या वेळी मी स्वयंपाक करत असते, त्या वेळी माझा आईबरोबर फोन सुरू असतो. आता मी एकटीच पदार्थ बनवू शकते. यासाठी मी आईला अनेकदा फोन करून तिच्याकडून त्या पदार्थाची रेसिपी ऐकून घेत असते. मला जगातली एकच गोष्ट आवडत नाही ती म्हणजे, फ्लॉवर. याचं कारण मला माहीत नाही; पण ती भाजी मी कधीच खात नाही. आईनं बनविलेली आमटी आणि कढी मला अतिशय आवडते. आईनं केलेले खरं तर सगळेच पदार्थ मला खूप आवडतात. त्यातल्या त्यात आमच्या घरात बनवलेली आमटी जगात कुठंही बनत नाही, यावर माझं ठाम मत आहे. आईच्या आणि आजीच्या हातची आमटी खरंच जगात भारी आहे. त्या ती कशी बनवतात, हे त्यांनाच माहीत.

हे लक्षात ठेवा

शेवेसाठी डाळ दळायला देताना त्यामध्ये मूठभर पांढरी चवळी घालावी. यामुळे शेव छान हलकी होते.

टोमॅटो मऊ पडू नयेत यासाठी मीठ घातलेल्या थंड पाण्यात ठेवावेत.

इडल्या उरल्या असतील तर कुस्करून छानसा उपमा बनवावा.

दही मातीच्या मडक्‍यात लावावे. पाणी शोषले जाते आणि दही चांगले घट्ट विरजते.

पुदिना फ्रीजमध्ये ठेवून खराब होतो. म्हणून त्याची पेस्ट करून ठेवल्यास जास्त काळ टिकते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top