थीम केकने दिली ओळख

नयना खिंवसरा
Wednesday, 11 December 2019

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य उपजतच असते. त्यालाच चिकाटी आणि जिद्द यांची जोड मिळाल्यास मोठ्या उद्योगाचे स्वरूप प्राप्त होते. लहानपणापासून मी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे नवनवीन गोष्टी शिकत होते. मला स्वतःला दुसऱ्यांना आनंद देणे आवडते. त्यामुळे मी केक बनवण्याचा व्यवसाय निवडला. ज्या व्यक्तींसाठी केक बनवायचा असतो त्यात त्याची आवड, भावना पूर्णपणे उतरवण्याचा मी प्रयत्न करते.

घरच्या घरी - नयना खिंवसरा

मी बनवत असलेले केक ताजे, एगलेस, प्रिझर्व्हेटिव विरहित असतात. तसेच एक आई आपल्या मुलांसाठी एखादी गोष्ट बनवते, तेवढी काळजी घेऊन मी केक बनवते. त्यामुळे मला होम बेकर म्हणून बिबवेवाडी परिसरात केकसाठी प्रसिद्धी मिळाली.

समारंभानुसार रसमलई, गुलाबजाम, मॅंगो रोझ, विड्याचे पान असे विविध भारतीय फ्लेवर्स देऊन फ्युजन केक बनवते. रक्षाबंधन, दिवाळी, संक्रांत किंवा करवाचोथ असो, वुमन्स डे, फादर्स डे, वास्तुशांती, साखरपुडा, लग्न, बेबी शुट किंवा डोहाळे जेवण थीम केक शिवाय समारंभ पूर्ण होतच नाही. 

माझ्याकडे आतापर्यंत जवळपास ६०० मुली व महिला केक शिकल्या आहेत. त्यातील काही जणींनी व्यवसाय सुरू केला आहे. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, हे पाहून आनंद होतो. एक गृहिणी घरातून एखादा व्यवसाय करते, तेव्हा घरातल्या जबाबदाऱ्या, वेळा यांचे बंधन पाळून वेळेचे नियोजन करावे लागते. त्यात मला माझ्या पतींची व मुलीची खूप साथ आहे. माझी मुलगी केकचे डिझाईनिंग, फोटोग्राफी व सोशल मीडिया हे काम बघते. पतीच्या पाठिंब्यामुळे व सहकार्यामुळे मी केक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकानही चालू केले आहे. 

वरवंटा पाटा, पैठणी साडी केक, हलव्याचे दागिने, शॅंडिलिअर केक व थीम केकला फेसबुकवर पसंती व खूप मागणी आहे. मी रोज १० ते १५ केक बनवते. 

माझे केक लातूर, परभणी, नगर, औरंगाबाद, आग्रा, बंगळूरपर्यंत पोचले आहेत. आज या कलेने मला स्वतःची ओळख दिली, तसेच नवीन मैत्रिणी दिल्या. या व्यवसायात इतके यश मिळवल्यावर परत एकदा मागे वळून पाहताना असे वाटते की, कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय मी अपूर्ण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nayana khinvasara identity by Theme Cake