फ्युजन किचन : अंजीर हलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anjeer Halwa

मंडईमध्ये एखादी जरी फेरी मारली, तर विविध रंगाच्या फळांनी बाजारपेठ सजलेली दिसते. लालचुटूक स्ट्रॉबेरी, विविधरंगी द्राक्षं, पेरू, बोरं, मलबेरी, संत्री, किवी आणि बरंच काही.

फ्युजन किचन : अंजीर हलवा

- नीलिमा नितीन

या दिवसात मंडईमध्ये एखादी जरी फेरी मारली, तर विविध रंगाच्या फळांनी बाजारपेठ सजलेली दिसते. लालचुटूक स्ट्रॉबेरी, विविधरंगी द्राक्षं, पेरू, बोरं, मलबेरी, संत्री, किवी आणि बरंच काही. बरं, विक्रेते याची रचना/मांडणीही इतकी आकर्षक करतात, की ती घेतल्याशिवाय राहवत नाही.

ताजी फळं खाणं हे ज्यूस करून पिण्यापेक्षा किंवा त्याचे काही पदार्थ बनवण्यापेक्षा कधीही चांगलं; पण बऱ्याच वेळा असं होतं, की या फळांचं अजून काय करता येईल, कशा प्रकारे ही फळं कोणत्या पदार्थात वापरता येईल म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकू याचा विचार आपण करतो आणि त्यातूनच एखादी नवीन रेसिपी जन्माला येते.

तसं माझ्या घरी फळं खाणारी मीच. मग नवरोबाला, मुलाला कुठल्यातरी वेगळ्या पद्धतीनं फळं खाऊ घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यातूनच ही आजची रेसिपी बनली. त्याचं झालं असं, की परवा फार छान ताजी अंजीरं मिळाली आणि मग मी थोडी जास्तच घेतली. तुम्हाला माहितीच असेल, की अंजिरांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. उदाहरणार्थ, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए. त्याशिवाय फायबरही भरपूर असतात. एकंदरीत हाडं मजबूत होण्यासाठी, पचनक्रियेसाठी अंजिरं अतिउत्तम आहेत.

बरं, आता हे अंजीर घरच्यांना खाऊ कसं घालणार? म्हणून मी एक शक्कल लढवली. घरी सगळ्यांना कणकेचा शिरा आवडतो. मग विचार केला, का नाही अंजीर घालून शिरा करावा? हा शिरा/ हलवा इतका छान झाला, की दोघांनी त्यावर ताव मारला आणि आणि ते बघूनच मला खूप समाधान मिळालं. शेवटी आपल्या प्रयत्नांना यश आलं, की आनंद होणारच नाही का? चला तर मग बघूया, आजची रेसिपी.

साहित्य

एक वाटी ताज्या अंजिराचे तुकडे, एक वाटी कणीक/ गव्हाचं पीठ, पाऊण वाटी तूप, एक वाटी साखर, वेलदोड्याची पूड एक चमचा, केशर ऑप्शनल.

कृती

  • एका पॅनमध्ये पातेल्यात एक वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी घालून साखर विरघळेपर्यंत उकळून घ्या आणि हे पाणी बाजूला ठेवून द्या.

  • एका कढईत पाऊण वाटी तूप गरम करा व त्यात ताज्या अंजिराचे तुकडे घालून ते मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. यातच एक वाटी कणीक घालून ते खमंग भाजून घ्या.

  • कणीक/गव्हाचं पीठ छान गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात वरील साखरेचं पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. ढवळून घ्या. यातच वेलदोड्याची पूड घालून परत मिक्स करा आणि झाकण ठेवून छान वाफ येऊ द्या.

  • सर्व्हिंग करताना तुम्ही त्यावर अंजीराचे तुकडे, ड्रायफ्रूट्स घालून सर्व करू शकता.

  • ते दिसायलाही छान दिसतं आणि खाणाऱ्याला थोडी कल्पनाही येते, की आपण नक्की काय खाणार आहोत. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा हा कणकेचा शिरा खायला तर छान लागतोच; पण दिसायलाही सुंदर दिसतो आणि पोषणमूल्यं तर नक्कीच वाढतात. तर मग करून बघताय ना अंजीर हलवा?

टॅग्स :food newsanjeer