

नेहमी तेच तेच खाऊनच नाही; पण बनवूनही कंटाळा येतो नाही का? एखादी भाजी समोर दिसली, आता याचं अमुक अमुक बनणार हे जणू काही ठरलेलं असतं.
- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर
नेहमी तेच तेच खाऊनच नाही; पण बनवूनही कंटाळा येतो नाही का? एखादी भाजी समोर दिसली, आता याचं अमुक अमुक बनणार हे जणू काही ठरलेलं असतं. मग खाणाऱ्यांसोबतच दरवेळी बनवणाऱ्यालाही फारसं उत्साह नसतो. फार तर फार थोडे मसाले बदलून किंवा झणझणीत फोडणी देऊन आपण त्या पदार्थाची लज्जत वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच एक भाजी आज समोर आली.
भरताचं वांगं. घरच्यांनी मला लागलीच म्हटलं, ‘उद्या भरीत आहे तर ठीक आहे’ आणि ते ठीक आहे मला थोडसं खटकलं- म्हणजे त्यात चूक कोणाचीच नाही; पण यात नावीन्य कसं आणणार? मग काय डोकं लागलं विचार करायला; पण भरीत, वांग्याची काप याशिवाय भरीताच्या वांग्याचं बनवायचे तरी काय? आणि नकळत सवयीनं भाजण्यासाठी गॅसवर ठेवूनही दिलं. मन मात्र भरीत करण्यासाठी काही तयार होत नव्हतं. इतकी घालमेल त्या जीवाची काय सांगू.
झालं, वांग भाजून झालं, कुस्करून झालं. भरीत बनण्यासाठी सगळी तयारी झाली. ते कुस्करलेलं वांग माझ्याकडे टक लावून बघत होतं. आता काय करणार ही बाई? मग काय उघडले पटापट डबे आणि बदलून टाकलं त्याचं स्वरूप. बरं, नुसतंच त्याला बदलून कसं चालेल? सोबत साथही साजेशी नको का? म्हणून सोबतही रंगतदार केली आणि तयार झाली आजची रेसिपी. वांग्याच्या भरीताची खमंग पुरी आणि बीट (रायता) कोशिंबीर. ही डिश इतकी आवडीनं खाल्ली सगळ्यांनी की विचारू नका.
साहित्य
भाजून कुस्करलेलं भरीताचं वांगं एक, धन्याची-जिऱ्याची पूड एक चमचा, ओवा एक चमचा, तीळ एक टेबलस्पून, लसूण मिरचीची पेस्ट एक टेबलस्पून, हळद, तिखट, मीठ, हिंग चवीनुसार; बेसन दोन चमचे, तांदळाची पिठी एक चमचा आणि मावेल इतपत कणीक, थोडी कोथिंबीर. रायत्यासाठी /कोशिंबिरीसाठी : उकडलेले बीटरूट एक, मोठी वाटी गोड दही, शेंगदाण्याची पूड दोन चमचे, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल आणि कढीपत्ता.
कृती
भरीताचं कुस्करलेलं वांगं, मसाले व पीठ सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून त्याचं घट्ट पीठ मळून घ्या व त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या तळून घ्या.
कोशिंबिरीसाठी उकडलेलं बीट किसून गोड दह्यात मिक्स करा. त्यात दोन चमचे दाण्याचं कूट, कोथिंबीर, मीठ आणि चिमूटभर साखर घालून वरून मिरची व कढीपत्त्याची फोडणी द्या. तयार आहे कोशिंबीर
डब्यामध्ये द्यायला, प्रवासात न्यायला; तसंच सकाळचं भरीत उरल्यास संध्याकाळी काहीतरी वेगळं खायला ही रेसिपी अतिशय उत्तम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.