esakal | वर्षभरात कधीही करा कैरीचं पन्हं; घरच्या घरी तयार करा पावडर

बोलून बातमी शोधा

वर्षभरात कधीही करा कैरीचं पन्हं; घरच्या घरी तयार करा पावडर
वर्षभरात कधीही करा कैरीचं पन्हं; घरच्या घरी तयार करा पावडर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

उन्हाळा सुरु झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते रानमेव्याचे. संपूर्ण बाजारपेठ जांभळं, कैऱ्या, आंबे, ताडगोळे अशा विविध फळांनी बहरुन जाते. मार्च ते मे या दिवसांमध्ये संपूर्ण बाजारपेठांमध्ये फळांचा गोड सुवास पसरला असतो. विशेष म्हणजे बाजारात आंबे, कैऱ्या दिसू लागले की गृहिणीदेखील कंबर कसून कामाला लागतात आणि या फळांपासून विविध पदार्थ तयार करतात. यात कैरीचं पन्हं हे हमखास प्रत्येक घरी होतं. उन्हाळ्याच्या दिवसात पन्हं पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु, कैऱ्या खासकरुन उन्हाळ्यातच मिळत असल्यामुळे पन्हंदेखील याच ऋतूमध्ये सर्वाधिक केलं जातं. पण जर, हेच पन्हं तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये आणि कोणत्याही वेळी सहज उपलब्ध झालं तर? खरं तर बाजारात आजकल तयार पन्हं सहज मिळतं. मात्र, त्यात अनेक केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह मिक्स केले असतात. त्यामुळे असं पिन्हं पिणं हे शरीरासाठी घातक आहे. म्हणूनच आज आपण घरच्या घरी पन्ह्यांची पावडर कशी तयार करावी ते पाहुयात.

साहित्य -

कैऱ्या

साखर

मीठ

कृती -

कैरी पन्ह्यांची पावडर तयार करण्यासाठी प्रथम चार मोठ्या आकाराच्या कैऱ्या धुवून स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्या कैरीची सालं काढून कैरीचे बारीक तुकडे करा. हे तुकडे मिक्समध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर साखर मिक्सरवर बारीक करुन त्याची पिठीसाखर तयार करुन घ्या.

तयार पेस्टपैकी एक वाटी पेस्ट घेऊन त्यात अडीच वाटी साखर घाला व एक चमचा मीठ टाका. ( कैरी गोड असेल तर त्यात साखर कमी घाला.) त्यानंतर साखर व कैरीची पेस्ट हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर दोन मोठ्या पसरट ताटांमध्ये हे मिश्रण पसरवा. हे मिश्रण ताटात पसरवत असतांना ते समान पसरलं जाईल याची काळजी घ्या. त्यानंतर हे ताट ४-५ दिवस उन्हात ठेवा. उन्हात ठेवण्यापूर्वी त्यावर पातळ सुती कापड पसरवा.

हेही वाचा: सावधान! चीज खाल्ल्यामुळे होतो सेक्स लाइफवर परिणाम

कैरी पेस्ट व साखरेचं मिश्रण उन्हात ठेवल्यावर दररोज ते एकदा चमच्याच्या सहाय्याने हलवत रहा. ज्यामुळे संपूर्ण मिश्रण योग्यप्रकारे वाळेल व त्याची पूड तयार होईल. ५ दिवसानंतर हे पेस्ट पूर्णपणे वाळून त्याचे पांढरे शुभ्र पिठीसाखरेप्रमाणे खडे होतील. हे खडे हाताने बारीक करुन नंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची पूड करुन घ्या. तसंच ही पूड हवाबंद डब्यामध्ये ठेवा. अशा प्रकारे तयार केलेली पावडर वर्षभर आरामात टिकते.