esakal | झटपट तयार होणारा 'हा' लोकप्रिय पदार्थ, वाचा रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

ukadpendi

झटपट तयार होणारा 'हा' लोकप्रिय पदार्थ, वाचा रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मधल्या वेळच्या खाण्यासाठी उकडपेंडी (Recipe of ukadpendi) अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. सहज आणि सोपा. कमीतकमी वेळात आणि घरी उपलब्ध असलेल्या जिन्नसांपासून तयार होणारा. त्यामुळे अचानक कोणी पाहुणे आले किंवा दुपारी चहाच्या वेळी भूक लागली तर हा पदार्थ करता येतो. विदर्भात हा पदार्थ अत्यंत लोकप्रिय (vidarbha famous dish) आहे.

हेही वाचा: रेसिपी : हिरव्या मिरचीचा ठेचा

वेळ: १५ मिनिटे

वाढणी: २ जणांसाठी

साहित्य:

  • १/२ कप रवाळ कणिक

  • ३ टेस्पून तेल

  • १/४ कप कांदा, बारीक चिरून

  • ४ ते ५ कढीपत्ता पाने

  • फोडणीसाठी: चिमटीभर मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या

  • १/२ कप दही, घोटलेले

  • १/४ कप पाणी (टीप १)

  • चवीपुरते मीठ

कृती:

१) कढईत तेल गरम करावे. कणिक मध्यम आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावी (साधारण ५ ते ७ मिनीटे). भाजलेली कणिक लहान वाडग्यात काढून ठेवावी.

२) त्याच कढईत १ टेस्पून तेल घालावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा घालून गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावा. मीठ घालून मिक्स करावे.

३) भाजलेली कणिक घालून एक-दोन मिनीट मिक्स करावे. दही आणि पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण कढईत ओतावे आणि पटापट मिक्स करावे. गुठळी होऊ देऊ नये. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे वाफ काढावी.

कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे. -

टीप्स :

१) उकड पातळ किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे. वरील कृतीमध्ये घट्ट उकड होईल एवढे पाण्याचे प्रमाण दिले आहे. पण उकड पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालावे.

२) उकड ही कच्चं तेल घालून, चांगली मळून मग खातात. त्यासाठी घट्ट उकड करावी. गरमच असताना परातीत घेऊन थोडे तेल घालून लगेच मळावी. गरम मळताना चटका बसतो म्हणून उकड मळण्यासाठी लाकडी चकती मिळते ती वापरावी. ती जर नसेल तर खलबत्त्यातील खलायचे भांडे घ्यावे. त्याच्या तळाला तेल लावून त्याने मळावी. गरम गरम उकड सर्व्ह करावी.

३) लाल मिरची ऐवजी काहीजण हिरवी मिरची किंवा लाल तिखटही वापरतात.

४) कांदा हा ऐच्छिक आहे. पण चव चांगली येते कांद्यामुळे. तसेच कांद्याऐवजी लसूण वापरता येते. अधिक पौष्टीक बनवायची असल्यास मटार, गाजराचे तुकडे, भिजवलेली मूग-मटकीही घालू शकतो.

५) ही उकड तांदूळाची, बेसनाची, ज्वारीच्या पिठाची करता येते. पद्धत हीच फक्त पिठ वेगवेगळे वापरावे. किंवा मिश्र पिठाची सुद्धा उकड बनवता येते.

loading image
go to top