ग्लॅम-फूड : ‘नावडता पदार्थ कोणताच नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लॅम-फूड : ‘नावडता पदार्थ कोणताच नाही’
ग्लॅम-फूड : ‘नावडता पदार्थ कोणताच नाही’

ग्लॅम-फूड : ‘नावडता पदार्थ कोणताच नाही’

- रीना मधुकर

मला प्रवास करायला आवडतं. मी परदेशांतही सोलो ट्रिप्स केल्या आहेत. मला असं वाटतं, की तुम्ही ज्या ठिकाणी - देशात, परदेशात, वेगवेगळ्या शहरांत जाता, तेव्हा तेथील स्थानिक खाद्यपदार्थ तुम्ही टेस्ट करायला हवेतच. एका वेगळ्या जागेची चव म्हणून टेस्ट करायला हवं. मला अशी खाद्यभ्रमंती खूप आवडते. मी पॅरिसमध्ये क्रेमब्रुले नावाचा पदार्थ खाल्ला होता आणि तो मला प्रचंड आवडला. तिथल्या क्रेमब्रुलेची चव मला दुसरीकडे कुठेच मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा कधी पॅरिसला गेले तर परत नक्कीच खाईन. आपल्या भारतात दिल्लीमध्ये मला स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं, खास करून तिथे मिळणारे ‘छोले कुलछे.’ ते तर मला प्रचंड आवडतात. 

मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाउननं मला कुकिंग शिकवलं. शिकवलं म्हणजे अर्थात यू-ट्यूबवर बघून-बघून काही काही पदार्थ बनवायला शिकले. घरच्या घरी कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवायला शिकले होते. आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या रेसिपी प्रमाणासोबत दिलेल्या असतात, त्याच रेसिपी मी करते. ‘मीठ, मसाला स्वादानुसार’ असं म्हटलेलं असलं, की त्या रेसिपी मी टाळते.  माझ्याबाबतीत अनेकदा असं झालंय, की यू-ट्यूबवर बघून मी जेव्हा एखादा पदार्थ बनवते, तेव्हा तो पहिल्याच प्रयत्नात इतका भारी बनतो, की माझ्या घरच्यांनाही आश्चर्य वाटतं, की हे खरंच मी बनवलंय का? मात्र तोच पदार्थ मी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा त्याच प्रमाणात बनवते, तेव्हा मात्र पहिल्यासारखीच चव त्याला येत नाही... असं का होतं हे अजूनही मला कळलेलं नाही.

मला एखादा पदार्थ नावडता आहे, असं काही नाही. मी सगळं खाते. मला अजिबात आवडत नाही, असा कोणताच पदार्थ नाही. त्यातल्या त्यात अगदीच म्हटलं, तर फळांमध्ये मला केळी आवडत नाहीत. केळ्यांचा वास मी सहनच नाही करू शकत. प्रसादाच्या शिऱ्यात केळी वापरतात, तेवढाच एक केळ्यांचा पदार्थ मी खाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त केळी असलेला कुठलाही पदार्थ खाऊ शकत नाही. माझी आई कोकणातली आहे आणि मालवणी पद्धतीचे विविध पदार्थ खाऊन आम्ही मोठे झालोय. आईच्या हातची चव कुठेच मिळत नाही. आतापर्यंत इतकी रेस्टॉरंट्स ट्राय केली; पण ‘माँ के हाथ का स्वाद’ म्हणतात ना तो कुठेच मिळाला नाही. आई उत्तम पदार्थ बनवते. चव येण्यासाठी ती वेगळं काय करते, तर तिचे नेहमीचे ठरलेले मसाले असतात, मालवणी मसाला आणि विशेष म्हणजे तिचे प्रेम आणि मनापासून जेवण बनवण्याची तिची आवड.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top