esakal | ग्लॅम-फूड : ‘वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतं’
sakal

बोलून बातमी शोधा

Rutuja Junnarkar

ग्लॅम-फूड : ‘वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतं’

sakal_logo
By
ऋतुजा जुन्नरकर, अभिनेत्री

माझा आवडणारा पदार्थ म्हणजे मिसळ. मला पुण्यातली ‘काटाकीर्र’ची मिसळ खूप आवडते. मी खूप ठिकाणी मिसळ ‘ट्राय’ केलीय; कोल्हापूर आणि सगळीकडेच; पण ‘काटाकीर्र’च्या मिसळसारखी चव कुठल्याच मिसळमध्ये नाही. तिच्याबरोबर ताकाचा ग्लास देतात, ते मला आवडतं.  मुंबईला जाताना हायवेला ‘दत्त’ फूड मॉलमधलं थालीपीठ आणि वडापाव मला प्रचंड आवडतो. त्यामुळे मुंबईला ट्रॅव्हल करताना मी तिथंच थांबते आणि सकाळचा नाश्‍ता नेहमीच थालीपीठ किंवा वडापाव असाच असतो. 

मला स्वयंपाक करायला आवडतंच; पण पोळी-भाजी, वरण-भात असा रेग्युलर स्वयंपाक करायला नाही आवडत. मला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. मी कधी रव्याचा केक, तर कधी पास्ता करते. मी पहिल्यांदा पोहे बनवले. खूप लोकांनी माझ्या पोह्यांना दाद दिली आहे. आई एकदा गावाला गेलेली असताना मी बाबांसाठी मसाले भात बनवला होता आणि त्यात लिंबू टाकतात की वरून घालतात, हे माहीत नव्हतं. भात शिजायला लावतानाच मी आख्खं लिंबू पिळलं आणि भात प्रचंड आंबट झाला होता. बाबा मला आजही त्यावरून चिडवतात.

मला आईच्या हातची साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. तिची खिचडी मोकळी आणि छान प्रकारे परतलेली असते. रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात आई लिंबू पिळते. ज्यामुळे तो मोकळा होतो आणि खिचडी चिकट होत नाही. त्यामुळे मी घरी येते तेव्हा आईला खिचडी बनवायला सांगते. पनीरची भुर्जी मला खूप आवडते. मी आठवड्यातून दोनदा बनवतेच. त्याची खूप सोपी रेसिपी आहे. पहिल्यांदा कढईमध्ये तेल घ्यायचं. त्यात जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा, कांद्यावर थोडं मीठ टाकायचं म्हणजे पटकन रंग बदलतो. त्यात बारीक चिरून टोमॅटो टाकायचा. हिरवी मिरची उभी कापून टाकायची. मग त्यात हळद, लाल तिखट, धनेपावडर आणि थोडा पनीर मसाला टाकायचा आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. मग पनीरचे बारीक तुकडे करून ते दोन मिनिट शिजवून, त्यावर चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि चतकोर लिंबाची फोड पिळायची आणि कोथिंबीर घालायची. मग दोन मिनिटं झाकून ठेवायचं.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top