हेल्दी रेसिपी : नाचणीचे आंबील 

हेल्दी रेसिपी : नाचणीचे आंबील 

आजचा लेख लिहिण्यापूर्वी रेसिपी व त्याची वैशिष्ट्ये वगैरे, असा साधारण आराखडा मनात तयार होता. मात्र, अचानक या पदार्थासोबतच्या भूतकाळातल्या काही आठवणी जाग्या झाल्या व काही संदर्भ हाताशी आले. आणि मग जाणवलं की, ‘आंबील’ हा पदार्थ माझ्याकडून दुर्लक्षित झाला आहे. 

आजही उन्हाळ्यात आमच्याकडे ‘आंबील’ही होतेच, मात्र महाराष्ट्र खाद्यभ्रमंतीमध्ये जेव्हा मला कोणी विचारायचे, ‘तुला ‘आंबील’ माहीत आहे का?’ ‘हो, माहीत आहे. त्यात काय विशेष? लहानपणापासून तर पीत आले आहे!’ असा माझा आविर्भाव असायचा. ही चूक होती आणि कुठेतरी मी गृहित धरले, ‘हा एक रोजचाच पदार्थ आहे.’ 

मी नेहमी म्हणत असते, आपल्या पूर्वजांनी आपली खाद्यसंस्कृती, अनेक प्रथा, पौष्टिक आहार यांना खूप वैशिष्ट्यपूर्ण गुंफले आहे, तेव्हा मला ‘आंबील’ व तिच्या भोवतीच्या या साऱ्याचा कसा विसर पडला? 

‘आंबील यात्रा’ अर्थात, मार्गशीर्ष महिन्यातील ‘यल्लमा देवीची यात्रा’. ‘उदं गं आई उदं’च्या गजरात कोल्हापुरातील घराघरातून भाजी-भाकरी वगैरे आणि आंबील असा नैवेद्य घेऊन भाविक यल्लमा मंदिरात जातात. सर्वांना आंबील प्रसाद म्हणून वाटली जाते. भाद्रपदातील गौरी जेवणातही ‘आंबील’ आवश्यक असते. वास्तुशांत, पायाभरणी, विहीरपूजन, शांती अशाप्रकारांच्या अनेकविध पूजा या आंबिलीशिवाय अपूर्ण असतात. देवीला प्रिय असणारा हा प्रसाद शांती व सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. 

आपल्याकडे आंबील नाचणी, ज्वारी व ताकापासून बनते तर गडचिरोली येथील आदिवासी त्यांच्याकडे जंगलात पिकत असलेल्या ‘मिलेट’ची आंबील बनवितात. म्हणजे आपल्या लक्षात आलेच असेल की, सर्वसामान्य ते प्रतिष्ठित अशा सर्वांच्याच आहारात आंबिलीसारख्या पदार्थांना महत्त्वाचे स्थान होते. आज अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते की, जी ‘गृहीत धरण्याची’ चूक मी केली ती आपण करू नये. असा एखादा पौष्टिक पदार्थ तुमच्याकडे होत असल्यास त्याची नोंद ठेवा. इतरांसाठी व पुढच्या पिढीसाठी ते उपयोगाचे ठरेल. 

नाचणीची आंबील 

साहित्य - नाचणी पीठ, मीठ, पाणी, लसूण पाकळ्या (आवडीनुसार), ताक. 

कृती 
१. रात्री चमचाभर नाचणीचे पीठ थोड्याशा पाण्यात/ताकात भिजवावे. 

२. सकाळी आधणात मीठ, भिजवलेले पीठ हळूहळू ओतत, एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे. 

३. आच बंद करून लसूण तसाच ठेचून किंवा तेलावर परतून घालावा. 

४. थंड झाल्यावर ताक घालून आंबील प्यावी. 

नाचणीविषयी आणखीन जाणून घेऊयात पुढील लेखात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com