हेल्दी रेसिपी : राळ्याचा पुलिओगरे भात

शिल्पा परांडेकर
Tuesday, 28 January 2020

आज आपण पाहणार आहोत राळ्याचा भात कर्नाटकच्या एका प्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपीच्या रूपात.

स्थळ :  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. एक मुलगी फोनवरून एका परदेशी धान्याबाबत चर्चा करीत होती. ‘त्याच्या’ नियमित सेवनाने म्हणे वजन आटोक्यात येते, ते खूप पौष्टिक असते, वगैरे. असेलही. मात्र, याचबरोबर आपली पारंपरिक धान्ये, पिकेही उत्कृष्ट दर्जाची होती व आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या ‘ग्लुटेन फ्री’ पदार्थ असल्यास त्याचा आहारात लगेच समावेश होतो. उदा. थालिपीठ, मिसळीची भाकरी, कळण्याची भाकरी. या पारंपरिक पदार्थांनी ‘मल्टिग्रेन फूड’, तर काही पारंपरिक धान्यांनी ‘मिलेट’ या नावांनी आहारात पुनश्च शानदार ‘एन्ट्री’ घेतली आहे. कारण ते ‘ग्लुटेन फ्री’ किंवा ‘लो जीआय’ असणारे पदार्थ आहेत; पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, हे मिलेट आपल्या भारतीय आहारात अगदी पूर्वीपासूनच आहेत. दुर्दैवाने यांतील काही पिके नष्ट झाली, तर काही थोड्याफार प्रमाणात टिकून आहेत. त्यातलेच एक मिलेट म्हणजे ‘राळं’ किंवा ‘कांग’. मला आठवते, माझ्या लहानपणी संक्रातीला आमच्याकडे राळ्याचा भात केला जात असे. प्रथाच होती ती. परंतु नंतर राळं मिळायचे बंद झाले. पचायला सोपे, कोलेस्ट्रॉल वा मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त, तसेच वजन कमी करणे वा आटोक्यात ठेवणे याकरिता उपयुक्त, असे राळ्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगता येतील. पूर्वी राळ्यापासून खिचडी, करंजी, लाडू, चकली, खीर, वगैरे अनेक पदार्थ केले जायचे.

आज आपण पाहणार आहोत राळ्याचा भात कर्नाटकच्या एका प्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपीच्या रूपात.

राळ्याचा पुलिओगरे भात
साहित्य -
राळे, पुलिओगरे तयार मसाला, मीठ चवीनुसार, तेल, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती  - नेहमीच्या भाताप्रमाणे राळे मीठ घालून शिजवून घ्यावे.
कढईत तेल गरम करून घ्यावे. तेल तापल्यावर मसाला घालावा व तेलावर चांगला परतावा.
तयार राळ्याचा भात घालून व्यवस्थित परतावे.
कोथिंबिरीची सजावट करून कोशिंबीर किंवा कोणत्याही चटणीसोबत खायला द्यावे.

टीप - विविध प्रकारचे मसाले वापरून राळ्याचा भात करता येईल. तसेच, विविध प्रकारच्या रेसिपींमध्ये वापरता येईल. उदा. इडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Parandekar article ralyacha rice