हेल्दी रेसिपी :  चोपाचे आयते

शिल्पा परांडेकर
Tuesday, 25 February 2020

आयत्यासारख्या पदार्थाचा विचार केल्यास आयते, धिरडे, अंबोळी, घावन, खापरोळी, आकशे हे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील पदार्थ. हे पदार्थ बनवण्याची पद्धत साधारण सारखीच. काही ठिकाणी वेगवेगळे किंवा एकसारखेच जिन्नस वापरून हे पदार्थ बनवितात.

मागच्या लेखात ‘आयत्या’चा विषय ‘आयता’ निघालाच आहेच, तर मग यावर अजून थोडं बोलूयात. मागच्या लेखात आपण वाचलेच आहे की, हा पदार्थ विदर्भातील आहे आणि तिथेही अनेक प्रकारे होतो. तुम्हाला माहीत आहे का, केवळ महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतात असे अनेक पदार्थ आहेत, जे एकाच कुटुंबात जन्मलेले; परंतु वेगवेगळ्या प्रांतांत हवामान, रीतिरिवाजानुसार साकारलेले, आकारलेले ते परस्परांचे बांधवच असावेत, असे वाटते. आता आयत्यासारख्या पदार्थाचा विचार केल्यास आयते, धिरडे, अंबोळी, घावन, खापरोळी, आकशे हे महाराष्ट्रातील विविध प्रांतातील पदार्थ. हे पदार्थ बनवण्याची पद्धत साधारण सारखीच. काही ठिकाणी वेगवेगळे किंवा एकसारखेच जिन्नस वापरून हे पदार्थ बनवितात. उदा. कोकणातील अंबोळी आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर भागातील आयते किंवा आकशे नवीन तांदळापासून बनतात. कारण प्रमुख पीक ‘तांदूळ’. शिवाय नवीन धान्याचा, शेतकरीवर्गाचा सन्मान करण्याची आपली प्रथाही दिसून येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तांदूळ आपल्या आहारात प्राचीन काळापासून आहे. बाळाच्या प्रथम आहारापासून वृद्धापकाळातील हलका आहार, पूजाविधी व मानवी जीवनातील विविध संस्कार तांदळाशिवाय अपूर्ण आहेत. तांदळाला आपल्याकडे ‘धान’ म्हणून संबोधले जाते. लक्ष्मी, समृद्धी, भरभराटीचे प्रतीक ते ‘धान’.

पचायला हलके, पथ्यकारक, मूत्र वाढवणारे, अग्निवर्धक असे तांदूळ आपल्या आहारात नियमित आणि योग्य प्रमाणात असल्यास ते कधीच हानिकारक असणार नाहीत. पारंपारिक पद्धतीने शिजवून, पेज काढून भाताचे सेवन केल्यास नक्कीच उपयुक्त. शिवाय आयते, घावन, आकशे, वगैरे पदार्थही करता येतात.

Video: ज्वारीचे आयते

हे पदार्थ पचायला हलके, तुलनेने करायला सोपे आहेत. वसंत ऋतुचेही आगमन झाले आहे. या काळात पचायला हलका आहार असावा, असे आपले प्राचीन आहारशास्त्र सांगते. तेव्हा मी तर म्हणेन ‘वजन वाढेल’ या भीतीने तांदळाला आहारातून वर्ज न करता उत्तमप्रकारे समाविष्ट करा आणि आनंद घ्या या तांदळाच्या खास रेसिपाचा.

चोपाचे आयते/आकशे 
साहित्य - तांदूळ धुवून-वाळवून-दळून घेणे, चोप (कांद्याची पात), मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, तेल.

कृती - पीठ रात्रभर डोशाच्या पिठाप्रमाणे भिजवणे. सकाळी पिठात उर्वरित साहित्य घालून आकशे/आयते डोशाप्रमाणे करावेत.

टीप 
१. कांद्याची पात, लसणाची पात, पालक, दुधी वापरूनही आयते करतात.
२. अंडा ऑम्लेट खाताना आपण बऱ्याच वेळा मैद्याचा ब्रेड खातो त्याऐवजी वरील पदार्थांचा आस्वाद घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa parandekar Healthy recipes