Shravan Somvar 2022 : पौष्टिक शेंगदाणा- काजू-बदाम चिक्की कशी तयार करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peanut-Cashew-Almond Chikki

Shravan Somvar 2022 : पौष्टिक शेंगदाणा- काजू-बदाम चिक्की कशी तयार करायची?

आज श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने पौष्टिक शेंगदाणा- काजू-बदाम चिक्की कशी तयार करायची? ही खास रेसिपी आपण पाहणार आहोत.

साहित्य:

दोन वाटी शेंगदाणे

अर्धा वाटी काजू

अर्धा वाटी बदाम

तिन वाटी गुळ

एक छोटी वाटी साजूक तूप


कृती:

प्रथम एका लोखंडी कढईत शेंगदाणे मस्त भाजून घ्यावे. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांची सालं काढून घ्यावी. नंतर काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घ्यावे. पुढे मग कढईत छोटी वाटी साजूक तूप टाकावे.

तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेला गूळ घालून त्याचा घट्ट पाक होईपर्यंत अंदाजे 5 मिनिटं चमच्यानं ढवळत राहा.

नंतर मग गूळ वितळून घट्ट झाल्यानंतर एका छोट्या वाटीत पाणी घ्यावे. नंतर चमच्याने गुळाच्या घट्ट पाकाचे दोन थेंब पाण्यात सोडून पहावे गूळ कडक होईल. पाण्यातील कडक गूळ हातात घेऊन तोडून पाहा. गुळाच्या घट्ट मिश्रणाचा तुकडा पडत असेल तर चिक्कीसाठीचा पाक तयार झाला आहे असे समजायचे. नंतर गुळाच्या घट्ट पाकात भाजलेले शेंगदाणे, बारीक केलेले काजू-बदाम हे सर्व मिश्रण टाकून चमच्याने व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे.

हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटं शिजू द्याव. नंतर मग साधारण तीन मिनिटांनी गॅस बंद करा. मग एक पसरट ताट घेऊन त्यावर साजूक तूप पसरवून घ्यावे. आता कढईतील चिक्कीचं मिश्रण ताटावर ओतून व्यवस्थित एकसमान पसरवून घ्या. ताटावरील मिश्रण पाच मिनिटं पंख्याखाली थंड होऊ द्या. पाच मिनिटांनी चाकुने आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्या. नंतर पुन्हा एकंदर मिश्रण पाच मिनिटं सुकवा. वड्या व्यवस्थित कडक झाल्यानंतरच त्याचे तुकडे वेगळे करा. अशा प्रकारे स्वादिष्ट चिक्की तयार झाली आहे.