
ग्लॅम-फूड : ‘मुंबईचे स्ट्रीट फूड लई भारी!’
सोनाक्षी सिन्हा भारतीय खाद्यपदार्थांची चाहती आहे. परदेशात गेल्यावरही ती भारतीय पद्धतीने केलेले खाद्यपदार्थच खाते. परदेशात ती भारतीय रेस्टॉरंट्सच्या शोधात असते. सोनाक्षीला सिंधी पद्धतीचे खाद्य पदार्थ आवडतात. सिंधी कढी, मसाला भेंडी; तसेच बिहारी पद्धतीने केलेला लिट्टी चोखा तिला पसंत आहे. पंजाबी पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ तिला आवडतात.
सोनाक्षी चायनीज पदार्थही आवडीने खाते. मुंबईत एसएनडीटी कॉलेजच्या बाहेर मिळणाऱ्या प्रसिद्ध शेजवान नूडल्सची, शेजवान चीज डोशाची ती चाहती आहे. तिला मुंबईचे स्ट्रीट फूड प्रचंड आवडते. मुंबईचा वडापाव, चीज पावभाजी, सामोसा म्हणजे तिच्यासाठी खास आहे. सोनाक्षी अधूनमधून स्वयंपाकाचे कसबही आजमावून बघते. हे कसब अर्थातच तिने आईकडूनच शिकले आहे. आईच्या हातचे सगळे पदार्थ तिला आवडतात. तिने एका कार्यक्रमात तिच्या आईच्या उपस्थितीत सिंधी कढी आणि बटाट्याचे काप बनवले होते.
सोनाक्षीच्या मते, ‘तुम्हाला एखादी गोष्ट सध्या करायची असेल, मग ते करिअर, फिटनेस असो वा एखादे नाते असो... त्या ठिकाणी तुमची प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची ठरते.’ त्यामुळेच एके काळी पिझ्झा, पास्ता आणि बर्गरवर तुटून पडणारी सोनाक्षी आता डाएट कॉन्शस झालेली दिसून येते. तिने डाएटचा भाग म्हणून ब्रेड, साखर आहारातून वर्ज केली आहे. ती सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून घेते. नाश्त्यासाठी कडधान्ये, टोस्टसोबत लो फॅट दूध पिणे पसंत करते. नंतर थोडा सुका मेवा, एक कप ग्रीन टी, तर दुपारी पोळी भाजी आणि सॅलड आणि रात्री दाल आणि मिश्र भाज्या खायला प्राधान्य देते. अर्थात डाएट करत असली, तरी नावडत्या गोष्टी खाऊन डाएट करणे तिला मंजूर नाही. सोनाक्षी म्हणते, ‘‘खाणे हे माझे पहिले प्रेम आहे. ज्या डाएटमुळे मी उपाशी राहीन किंवा मला ज्यातून आनंद मिळणार नाही, असा डाएट प्लॅन मी कधीच फॉलो करत नाही.’’
Web Title: Sonakshi Sinha Writes Street Food
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..