
पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील.
फूडहंट :
पोहे हा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ. केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही पोहे हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोकणी पोहे, अण्णा पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, इंदौरी पोहे, असे नऊ प्रकारचे पोहे आपल्याला खायला मिळतात. यातल्या प्रत्येक पोह्याची चव वेगळी आहे. अण्णा पोह्यांसोबत तुम्हाला दाक्षिणात्य सांबार मिळेल. कोकणी पोहे थोडे गोडसर, त्यावर किसलेले ओले खोबरे आणि पोह्यात थोडा बटाटा असल्यामुळे त्याची चव वेगळी आहे. इथले तर्री पोहे सगळ्यात जास्त खाल्ले जातात. झणझणीत मसाल्यात बनवलेली मटकी आणि पोहे एकदा खाल्ले, की त्यावर खवय्यांच्या उड्या का पडतात, हे लक्षात येईल. इंदौरी पोह्यामध्ये रतलामी शेव असते. पोह्यांमध्ये या शेवेचा एक थर असतो. मूळ मध्य प्रदेशात मिळणाऱ्या पोह्यांची चव थोडी गोडसर असते. इंदौरी पोहे तयार करण्यासाठी इथे स्वतंत्र मसाल्याचा वापरला केला होता. त्यात धनेही असतात. त्यामुळे शेवेसोबत या पोह्यांची चव लक्षात राहणारी आहे. ‘पोहे कुरकुरे’ नावाचा एक प्रकार तुम्हाला इथेच मिळेल, भट्टीतल्या कुरकुरीत पोह्यांचा हा प्रकार तुम्हाला चाट मसाला, डाळिंबाचे दाणे, खोबरे आणि शेवेसोबत खायला मिळतील.
सुदाम्याने कृष्णाला भेटायला जाताना पोहे नेले होते. अनेक वर्षे भेट झाली नसल्याने आपल्या मित्राला काय घेऊन जावे, असा विचार करत सुदामा पोहे घेऊन गेला होता. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. सुदाम्याच्या त्या पोह्यांची सर कुठल्याच पोह्यांना येणार नाही. पण, पुण्यात शनिवारवाड्यासमोर लागून असलेल्या व कसबा पेठेत जाणाऱ्या गल्लीतील सुदाम्याच्या पोह्यांची चव नक्कीच तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.
दडपे पोहे
दडपे पोहे मुळात थोडे कच्चे असतात. पण, इथे नारळाच्या पाण्यात पूर्ण भिजवलेले दडपे पोहे आपल्याला खायला मिळतील. आता पोहे पूर्ण का भिजवतात, यावर ‘दडपे पोहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. ग्राहकाला सहज खाता यावेत म्हणून आम्ही ते पूर्ण भिजवतो,’ असे सांगण्यात आले. कच्चा कांदा आणि वरून फोडणी टाकलेले थंड, गोडसर दडपे पोहे एकदा तरी खावे, असे आहेत.
कुटुंब रंगलंय पोह्यात
संदेश भोसले या तरुणाने ‘सुदाम्याचे पोहे’ हे रेस्टॉरंट सुरू केले. गेली काही वर्षे हॉटेल व्यवसायात असलेल्या संदेशला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. चायनीज रेस्टॉरंट चालवल्यानंतर मराठी खाद्यपदार्थांत पुणेकर खवय्यांना काहीतरी वेगळे द्यावे, या विचारातून हे रेस्टॉरंट उभे राहिले. संदेशची आई आणि वडील दोघेही या व्यवसायात त्याला मदत करतात. सध्या संपूर्ण भोसले कुटुंबच या सुदाम्याच्या पोह्यांत रंगले आहे.