esakal | कुरकुरीत - चुरचुरीत : अनारसा अखेर मार्गावर I Anarasa
sakal

बोलून बातमी शोधा

Anarasa

कुरकुरीत - चुरचुरीत : अनारसा अखेर मार्गावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुवर्णा जहागिरदार-सुर्वे, मुलुंड

लहानपणापासून मी आईला स्वयंपाकात आणि दिवाळीला फराळ बनवण्यात मदत करत असे, त्यातूनच नवनवीन पदार्थ करण्याची आवड निर्माण होऊन मी बरेचसे पदार्थ उत्तम आणि रुचकर बनवू लागले आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणींबरोबर रेसिपीज शेअर करण्याचा आनंद लुटू लागले. लग्नानंतर २ वर्षांनी मुलुंडला राहायला आल्यावर पहिल्या दिवाळीला सर्व फराळाबरोबर सर्वांच्या अत्यंत आवडीचे अनारसे करण्यासाठी मी सर्व पूर्वतयारी केली. अगदी तांदूळ ३ दिवस भिजत ठेवून दररोज आधीचे पाणी काढून टाकत, परत तांदूळ नवीन म्हणजे ताज्या पाण्यात भिजत ठेवणे इत्यादी.

अशा प्रकारे सर्व आवश्यक पद्धतींचा अवलंब करून गूळ व तांदूळ पीठ एकत्र करत त्याचा गोळा बनवून १० दिवस मुरत ठेवल्यावर अत्यंत उत्साहात अनारसे थापून घेतले; परंतु पहिला अनारसा तुपात तळण्यासाठी घालताच तो पूर्णपणे विरघळू लागला. नंतर दुसरा, तिसरा, त्यांचीपण तीच गत. माझे धाबेच दणाणले. आता काय? मग बऱ्याच विचारांती तयार अनारसे पिठात पाव वाटी तांदूळ पीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकत्रित करून परत अनारसे थापले. तूप गाळून मंद आचेवर परत केलेला अनारसा तळताना तो व्यवस्थित झाला, नंतर अशा प्रकारे सर्व अनारसे न तुटता, न विरघळता अतिशय सुंदर तयार झाले आणि माझा जीव भांड्यात पडला. गुळाचे प्रमाण थोडे जास्त झाल्याने तांदूळ पिठानं त्याला आपल्यात सामावून घेतलं नाही. शिस्त म्हणजे शिस्त!

loading image
go to top