आजची रेसिपी - इन्स्टंट ढोकळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

ढोकळ्यासाठीचे साहित्य - १ कप बेसन पिठ, २ चमचे रवा, १ कप पातळ ताक, २ लहान चमचे साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, २ लहान चमचे इनो, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल आणि चवीपुरते मिठ.

ढोकळ्यासाठीचे साहित्य - १ कप बेसन पिठ, २ चमचे रवा, १ कप पातळ ताक, २ लहान चमचे साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, २ लहान चमचे इनो, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल आणि चवीपुरते मिठ.

फोडणीसाठी साहित्य - १ चमचा तेल, १/२ चमचा मोहोरी, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/२ लहान चमचा हिंग. १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर, २ चमचे पाणी.

कृती - 
वर नमूद केलेले ढोकळ्याचे सर्व साहित्य (इनो वगळता) एकत्र करावे. त्यात एक ते सव्वा कप ताक घालावे. 

वरील मिश्रण तयार झाले की, मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावेत आणि वेगवेगळ्या भांड्यात ठेवावे. 

एक मध्यम खोलीचा पसरट फ्राईंग पॅन घ्यावा. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या पॅनमध्ये राहिल एवढ्या उंचीचे मेटलचे भांडे घ्यावे, त्याला तेलाचा हात लावून घ्यावा. फ्राईंग पॅनच्या झाकणाला स्वच्छ पंचा बांधून घ्यावा म्हणजे वाफेचे पाणी ढोकळ्यात न पडता पंच्यात शोषले जाईल.

एक भाग मिश्रणात १ टी स्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे, वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनिटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो. 

ढोकळा तयार होईपर्यंत फोडणी तयार करून घ्यावी. लहानश्या कढईत किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.

१५ मिनिटांनी ढोकळ्याचा गॅस बंद करावा. १-२ मिनिटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला की सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. ढोकळ्याच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा. हा ढोकळा हिरव्या तिखट चटणीबरोबर झकासच लागतो.

टीप - हा ढोकळा कुकरमध्येसुद्धा करू शकतो. फक्त कुकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा आणि ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कुकर बंद करू नये. किंवा कुकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कुकरवर झाकणासारखी ठेवावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today recipe Instant dhokala