आजची रेसिपी : भाजणीचे थालीपीठ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

साहित्य - दोन वाट्या भाजणीचे पीठ, दोन चमचे तिखट, पाव छोटा चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कांदा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, एक चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट, एक चमचा सफेद तीळ, तेल, ओवा आणि आपल्याला आवडेल ती पालेभाजी (उदा. मेथी, पालक).

साहित्य - दोन वाट्या भाजणीचे पीठ, दोन चमचे तिखट, पाव छोटा चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कांदा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, एक चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट, एक चमचा सफेद तीळ, तेल, ओवा आणि आपल्याला आवडेल ती पालेभाजी (उदा. मेथी, पालक).

कृती - थालीपीठ करताना दोन वाट्या भाजणीचे पीठ घेऊन त्यात अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, हळद, ओवा, गरम मसाला, तिखट, तीळ, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, बारीक चिरलेली मेथी किंवा पालक, दोन चमचे गरम तेल, थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ घट्ट भिजवून घ्या. एक लहान गोळा घेऊन ओल्या रुमालावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्यावे. नॉनस्टिक पॅनवर थोडं तेल टाकून रुमाल वरच्या बाजूला राहील, अशा प्रकारे थालीपीठ पॅनवर टाकावे. नंतर रुमाल हळूहळू काढावा किंवा केळीच्या पानावर/प्लॅस्टिकच्या कागदावर थापून तव्यावर टाकावे. नंतर बोटांनी थालीपिठाला तीन-चार छिद्रे पाडा म्हणजे वरून मध्यभागी तेल सोडता येईल. 

थालीपिठाच्या बाजूने थोडे थोडे तेल सोडून मंद गॅसवर झाकण घालावे. थालीपीठ एका बाजूने खरपूस पचल्यावर उलथण्याने उलटून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी. थालीपीठ उलटल्यावर पुन्हा झाकण ठेवू नये. अशा प्रकारे दोन्ही बाजूने थालीपीठ खमंग भाजून घ्यावे. थालीपीठ दह्याबरोबर किंवा लसूण चटणीबरोबर सर्व्ह करावे. 

टीप - कांद्याऐवजी उकडलेला बटाटादेखील वापरू शकतो. भाजणीच्या पिठाची उकड काढूनही थालीपीठ करता येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Todays recipe bhajaniche thalipith