‘टिळक, तुम्ही चुकला नव्हतात’ 

- समृद्धी पोरे 
Monday, 26 August 2019

‘टिळक तुम्ही हरला नाहीत’, फक्त एक काळा ढग आपल्या शुद्ध प्रकाशाच्या आड आला होता. पण आता त्याची सोनेरी किनार हळूहळू दिसू लागली आहे. लवकरच प्रकाशाचा उत्सव सुरू होणार आहे. 

श्रावण महिना आला की घराघरांत उत्सवाचे वातावरण दिसू लागते. उत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करणे, छानछान पदार्थ करून खाणे. जुन्याकाळी सगळं कुटुंब एकत्र राहत असताना, मजा करायला काहीतरी निमित्त त्यांना लागत असे. सुनांना माहेरी जायला बहाणा लागत असे, अशा अनेक चालीरीती आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या. पण हळूहळू त्याला काही लोकांनी विनाकारण बिभत्स रूप द्यायला सुरवात केली. याची अनेक उदाहरणे देता येतील. देवाची भीती घालून नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली. माहेरहून अमुक एका गोष्टीची पूर्तता अनिवार्य करणे, सासरच्या लोकांना सोने, चांदी, कपडे, मुलींच्या आईवडिलांनी द्याव्या लागतील अशा चालीरीती सुरू करणे, त्याच्या प्रत्येक गोष्टींमागे देवाची भीती घालणे, आमच्या घरची पद्धत आहे म्हणून मागणे आदी. 

माझ्या माहितीनुसार आजपर्यंत एकही पद्धत मी अशी ऐकली नाही, की ज्यामध्ये सासरच्या लोकांनी सुनेच्या आईवडिलांना बोलावून त्यांचे पाय धुऊन, पाहुणचार करून, साडीचोळी देऊन त्यांना धन्यवाद द्यावे. त्यांना म्हणावे, की एवढी सोन्यासारखी लाडात वाढवलेली मुलगी आपण आम्हाला दान करून टाकली आणि त्या मुलीने आमच्या घराची वंशावळ वाढविण्यासाठी आपले जीवन पणाला लावले. प्रत्येक बाळंतपण म्हणजे पुनर्जीवनच, हे सर्वज्ञातच आहे. पण आहे एकतरी प्रथा अशी? का नसावी अशी कृतकृत होण्याची रीत? आपली मुलीची बाजू... आपली पडती बाजू... जे म्हटले ते सहन करून पुढे नाते सांभाळून घ्यायला पाहिजे, असे मुलीचे आईवडील समजूनच चालतात. बरे असो पण मी बोलत होते आपल्या उत्सवाबद्दल, आपल्या सणवाराबद्दल! 

लो. टिळकांनी असाच एक सण सार्वजनिक करायचा ठरवला. जेणेकरून बायकामुलांना घेऊन घरातली सगळी मंडळी बाहेर दर्शनाला येतील. सार्वजनिक कार्यात भाग घेतील. इंग्रजांविरुद्ध देशाला अशी एकत्रित होण्याची गरज होती. मग हळूहळू त्यात पोवाड्यासारखे करमणुकीचे कार्यक्रम होऊ लागले. ज्यामधून जमलेल्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीचा संदेश बेमालूमपणे दिला जायचा. मग छोटी मुले नाचगाणी करू लागली. त्यांची हौसमौज होऊ लागली. बायकांना चूल आणि मूल यापासून एक करमणुकीची संधी मिळू लागला. मागच्या काही वर्षापर्यंत मोठेमोठे कलाकार गणपतीच्या कार्यक्रमातूनच घडले आहेत. त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली. त्यांच्यातील कलाकार गणेशोत्सवाने शोधून काढलाय. पण गेल्या काही वर्षांपासून खरेच त्याला एक बिभत्स रूप आलंय. त्यात फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय.

पक्षाने गणपती देखील वाटून घेतलाय. ऐन रहदारीच्या रस्त्यावर मंडप, त्यात कोट्यवधींची सजावट. वाहतुकीची कोंडी, एवढंच काय तर रुग्णवाहिका पण जायला जागा मिळत नाही. गाणी लावून विचित्र कपडे घालून विचित्र नृत्य. मग ते सांभाळायला, बाकीची महत्त्वाची कामं सोडून आपली पोलिस यंत्रणा, त्यांच्या घरचा उत्सव सोडून तासन् तास तैनात. गणेशोत्सव व्हावा पण त्याला एक पवित्र रूप असावं. स्पर्धेच्या नावाखाली गणपतीची उंची वाढत जाऊन विसर्जनासाठी मोठा द्राविडी प्राणायाम होऊन बसू नये. यासाठी अतोनात पैसा लागतोच, पण गणपतीची पूजा व्हायच्याऐवजी हातपाय तुटून अपमान होण्याची शक्यता जास्त असते. हा विषय इतका नाजूक आणि धार्मिक आहे, की फारसे कुणी बोलायची हिंमत करत नाही. पण हे कुठेतरी थांबले पाहिजे.

दहीहंडीला नऊ नऊ थर लावून पैज लावणे, टी-शर्ट देऊन आपल्या पक्षाचे प्रमोशन करणे. तरुणांना पैसे देणे, तरुण अभिनेत्रीला बोलावून नुसते हात हलवण्याचे (टाटा करायचे) लाखो रुपये देणे आदी प्रकार सर्रास केले जातात. रस्त्यावर स्वागताचे बॅनर लावलेले असतात, यावर गणपती आणि कृष्णाचा कुठेतरी उल्लेख असतो. पण त्या भागातील भाईचे गॉगल आणि सोन्याचे साखळदंड घातलेले छायाचित्र असते.

परवा एका भाईने हे सगळे रद्द करून त्याच ठिकाणी रक्तदान, नेत्र तपासणी, अवयवदान प्रमाणपत्र, मोफत चष्मे, अपंगांसाठी खुर्च्या असा उपक्रम सुरू केला. एक सुबक अशी, छोटीशी, निसर्गात सहज विलीन होईल अशी मूर्ती बसवून दोन्ही वेळेला गणपतीची आरती पूजा सुरू केली. प्राणायाम, योग यांचे विनामूल्य वर्ग चालू केले व उरलेल्या पैशातून गरिबांसाठी रुग्णवाहिका घेतली. हे ऐकून एक आशेचा किरण परत दिसू लागला. ‘टिळक तुम्ही हरला नाहीत’, फक्त एक काळा ढग आपल्या शुद्ध प्रकाशाच्या आड आला होता. पण आता त्याची सोनेरी किनार हळूहळू दिसू लागली आहे. लवकरच प्रकाशाचा उत्सव सुरू होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrudhi Poray Writes about Tilak And Ganesh Festivales