esakal | नमस्ते गणपतये..!
sakal

बोलून बातमी शोधा

 नमस्ते गणपतये..!

नमस्ते गणपतये..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दरवर्षी श्रीगणेशांना आणून त्यांची पूजा करण्यामागे आपण निसर्गाच्या जवळ जाणे हाही एक उद्देश असतो. निसर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दु:खनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्री गणपतीचे पूजन केले जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहाने भारलेले असतात. या दिवसांत पार्थिव गणेशाची पूजा केली जाते. घराघरांत गणपतीची पार्थिव मूर्ती आणली जाते व गणेशोपासना केली जाते. पंचमहाभूतांपासून तयार झालेले वस्तुमान म्हणजे पार्थिव.

आदिशक्ती पार्वतीने एका विशिष्ट प्रकारच्या मातीपासून, सुगंधी उटण्यापासून गणेशाची पार्थिव मूर्ती तयार केली. या मूर्तीला जेव्हा आदिशक्तीने शक्तीचा स्पर्श केला, तेव्हा गणेशदेवता तयार झाली. पार्थिव म्हणजे जड असे वाटले तरी या जडात चैतन्याची सुप्त शक्ती असते आणि म्हणून चराचरांत उपस्थित असलेल्या परमशक्तीचे व परमेश्र्वरी संकल्पनेचे अस्तित्व ज्यांनी स्वीकारलेले आहे, त्यांच्यासाठी हा उत्सव महत्त्वाचा असतो. गणांचा ईश तो गणेश, गणांचा अधिपती तो गणपती.

गण म्हणजे संख्या, गण म्हणजे निरनिराळे विभाग. परमपुरुष परमात्म्याने सर्वप्रथम विश्र्वाची संकल्पना आखली, मग तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगवेगळे विभाग करून जी काही योजना केली त्यात गणेशदेवतेला प्रथम स्थान देण्यात आले. म्हणून श्रीगणेशाला ‘ॐ नमो जी आद्या’ असे म्हटले आहे. तसेच, कोणत्याही उपक्रमाची सुरुवात गणेशपूजनाने करण्याची पद्धत आहे. सृजन करणारेही गणपतीच, विघ्न हरणारेही गणपतीच आणि कार्य तडीस नेणारेही गणपतीच. अशा या गणेशदेवतेच्या उपासनेचा हा गणेशोत्सव. शरीर तयार होताना सुरुवातीला असते फक्त एक पेशी. एकाच्या दोन, दोनाच्या चार असे करत करत संपूर्ण शरीराचा विकास होतो. यात सर्वप्रथम तयार होतो तो मेंदू.

या मेंदूची मुख्य अधिकारी देवता श्रीगणेश आणि म्हणून वेदांमध्ये तिला ‘ब्रह्मणस्पती’ अर्थात बुद्धीची देवता म्हटलेले आहे. श्रीगणेश ही कलियुगाची देवता आहे असे म्हटले जाते. कलियुगात साधारणतः चांगल्या विचारांपेक्षा वाईट विचारांचे प्राबल्य असलेले दिसते, माणसाला अतोनात मानसिक ताण असलेला दिसतो, स्वार्थापोटी चुकीचे निर्णय घ्यायला लावणारी बुद्धी आणि हलके हलके होणारा स्मृतिभ्रंश असे प्रकार वाढत असलेले दिसतात. यालाच अज्ञान, अंधार किंवा कलियुग असे म्हणतात. हे सगळे दूर करण्याची शक्ती एकट्या श्रीगजाननात आहे.

श्रीगणेशांची जन्मकथा लक्षात घेतली तर त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक समजू शकते. माती आणि सुगंधी वनस्पतींपासून श्रीगणेश तयार झाले. त्यांच्या पूजेला एक-दोन नाही तर २१ पत्रींची आवश्यकता असते. दरवर्षी श्रीगणेशांना आणून त्यांची पूजा करण्यामागे आपण निसर्गाच्या जवळ जाणे हाही एक उद्देश असतो. निसर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दु:खनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्री गणपतीचे पूजन केले जाते.

सृष्टीची उत्त्पत्ती झाली ती पंचमहाभूतांपासून. या पंचमहाभूतांवर आपल्या विचारांचा, पूजनाचा, शरणागतीच्या भावाचा संस्कार होत असतो. म्हणून भारतीय शास्त्रांनी गणेशमूर्ती मातीपासून आणि साधारण नऊ इंच उंचीची तयार करावी असे सांगितलेले आहे. अशा गणेशमूर्तीला अर्पण केलेल्या पूजा, प्रार्थना स्वीकारल्या जातात आणि १० दिवसांनंतर ती मूर्ती जलात विसर्जित केली की हे पाणी संस्कारित होते, आकाशापर्यंत जाते, पावसाच्या रूपाने पृथ्वीकडे परत येते आणि या पाण्याचा पुन्हा सर्व विश्र्वात संचार होतो. अशा तऱ्हेने श्रीगणपतींचे आशीर्वाद आपल्याला परत मिळतात.

अर्थातच हे सर्व होण्यासाठी मूर्ती मातीची असणे, ती सुशोभित करण्यासाठी वापरलेले रंग, आभूषणे नैसर्गिक असणे आवश्यक आहे. मूर्ती मातीपासून न बनवता प्लास्टर ऑफ पॅरिस, सिमेंट वगैरे द्रव्यांपासून बनविलेली असेल तर अशा मूर्तीचे जलात विघटन होऊ शकणार नाही, अर्थात या दिवसांमध्ये गणपतीचे केलेले पूजन, उपासना, प्रार्थना वगैरे जे काही केले त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ज्यांना नदी, समुद्र वगैरेंपर्यंत जाण्याची सुविधा नसेल त्यांना घराबाहेरच्या हौदात, घंगाळात विसर्जन करता येईल. मात्र नंतर हे पाणी नदी-समुद्रात सोडावे हे श्रेयस्कर. लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीच्या उद्देशाने गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सध्यासुद्धा समाजरक्षणाच्या जबाबदारीचे भान ठेवून गर्दी न करता, सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणे श्रेयस्कर ठरेल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top